किती वर्ष तेच तेच दुष्काळाचे दाहक, उपहासी गाणे ऐकवून पाहुणचाराची संधी हिरावली जाणार?.. तब्बल नऊ वर्षे ज्यासाठी अट्टहास सुरू ठेवला होता, ते स्वप्न आता साकारणार आहे. शब्दांची दिंडी आता उस्मानाबादेच्या दिशेने प्रस्थान ठेवणार म्हणजे ठेवणारच, ही काळ्या दगडावरची रेघ! होतील नाशिककर नाराज, होऊ देत! पाणीटंचाई तर उस्मानाबादेच्या पाचवीलाच पुजलेली असल्याने, या संधीवर पाणी फिरवण्याची टाप आहे कुणाची? संमेलनाची परंपरा नाही, संमेलन भरविण्यासाठी अनुकूल सांस्कृतिक वातावरण नाही, बेरोजगारी, दुष्काळ आहे, उद्योग-व्यापारातही उत्साह नाही, साहित्यिक वारसा नाही, अशा रूक्ष गावात साहित्य संमेलन भरविण्यात काय हशील, असे खवचट सवाल आता कायमचे शांत होतील. गावात आता ग्रंथदिंडीची तयारीही सुरू झाली असेल.. मावळ्यांचे, मराठमोळ्या संतांचे, इतिहासपुरुषांचे वेश, मराठमोळी नऊवारी लुगडी, पगडय़ा-फेटे-पागोटय़ांचीही जमवाजमव सुरू झाली असेल.. आता तालमी रंगात येतील.. होऊ द्या ढोल-ताशांचा कडकडाट, घुमू द्या तुतारीचे नाद, गाजू द्या लेझीम, टाळ-झांजांचा किणकिणाट, निघू द्या गौरवयात्रा.. येत्या तीन-चार महिन्यांत सारी नगरी साहित्यशारदेच्या या उत्सवासाठी सज्ज होईल. सातशे वर्षांपूर्वी कधी तरी या नगरीने संतसाहित्य संमेलनाचा सोहळा अनुभवला होता. संत गोरोबा काका त्या वेळी स्वागताध्यक्ष होते, असे म्हणतात. पुढे सारेच बदलत गेले. स्वागताध्यक्षापासून संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीवर वाद झडू लागले. गेल्या ९२ वर्षांत अनेक नव्या परंपरांचा जन्म झाला. नवे वाद निर्माण झाले. झगमगाटी संमेलने भरवायला केवळ आलंकारिक आणि मखमली शब्दांची संपत्ती पुरेशी नसते. तेथे पशाचाच रुबाब चालतो. पिपंरी-चिंचवडमधील त्या भपकेबाज संमेलनाच्या आठवणी साहित्यक्षेत्राच्या मनात आजही रुंजी घालत असताना, तेथल्या चटकदार पक्वान्नांची आणि जागोजागीच्या नव्या-जुन्या संमेलनांतील चविष्ट मेजवान्यांची अमीट चव अजूनही जिभेवर जशीच्या तशी घोळत असताना, केवळ सदिच्छा आणि सेवाभावाने भारावलेल्या या संमेलनाचे सूप यंदा पिठलं-भाकरी आणि मिरच्यांचा ठेचा चाखत वाजणार असेल, तर हे संमेलन ऐतिहासिक होईल. ते तसेच करायचे आणि तसेच पार पाडायचे असा चंग बांधूनच मराठवाडय़ाने मराठी सारस्वतांच्या पाहुणचारासाठी कंबर कसली आहे.. संमेलनांच्या भपकेबाजीच्या परंपरेला पानं पुसून, प्रतिभेच्या मखमली पंखांनी भराऱ्या मारणाऱ्या साहित्यसृष्टीला जळजळीत वास्तवाचे भान द्यायचा पहिला प्रयोग या निमित्ताने होणार असल्याने, पुढे येणारे कोण आणि पाठ फिरविणारे कोण, याचीही चर्चा आता सुरू होईल. जे येतील, ते ‘दुष्काळातही माणसं जगतात’ या जिवंत अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन घरोघरी परततील. कदाचित त्यांच्या पुढच्या साहित्याचे शब्द जगण्याच्या वास्तवाची धग सोबत घेऊनच जन्माला येतील.. उस्मानाबादेत उमटणाऱ्या शब्दांना शेतकऱ्यांच्या समस्यांची झालर आहे, इथल्या दुष्काळात उमटणाऱ्या गाण्याला वेदनांचा सूरही आहे. समस्यांची तीच झालर आणि वेदनांचे तेच सूर संमेलनाची शोभा वाढवतील.. वादाच्या परंपरागत झालरी तात्पुरत्या दूर करून या नव्या झालरींनी संमेलनाचा मंडप सजविण्याची मराठवाडय़ाची संकल्पना पुढच्या प्रत्येक संमेलनास हजेरी लावणाऱ्या सारस्वतांच्या प्रतिभेला वास्तवाचे भान देणारी ठरणार असेल, तर उस्मानाबादेत सातशे वर्षांनंतर होऊ घातलेल्या या शारदेच्या उत्सवाचे ते वेगळेपण ठरेल.. शब्दांच्या दिंडीने आता प्रस्थान तर ठेवले आहे! आता माघार नकोच!