पहाटे पेपरवाल्याने दरवाजाची बेल मारून वर्तमानपत्रांचा गठ्ठा दरवाजातून आत फेकला अन् चिंतूला जाग आली. अंगाला आळोखेपिळोखे देत पलंगाच्या कठडय़ाचा आधार घेत तो अंथरुणावरून उठला. काही वेळातच त्याने आन्हिके आवरली आणि नेहमीप्रमाणे तो देवासमोर बसला. सकाळी आवरून घराबाहेर पडण्याआधी हे केले म्हणजे दिवसभर आधार वाटतो, अशी त्याची श्रद्धाच होती. त्याने कपाटातून तुकाराम गाथा काढली, कपाळाला लावली आणि डोळे मिटून खुणेचे पान उघडून तो वाचू लागला. दोन-तीन ओळींनंतर एका जागी तो थबकला. ‘तुका म्हणे भवसागरी उतार, कराया आधार इच्छितसे’.. ही ओळ वाचताच चिंतूला अचानक आठवण झाली. ‘आधार क्रमांक’ मोबाइलशी आणि बँकेच्या खात्याशी जोडायची मुदत संपत आली होती आणि आजच ते करायचे असे त्याने ठरविले होते. मनातल्या मनात तुकोबारायांचे आभार मानून गाथा कपाळाला लावून पुन्हा गुंडाळून ठेवली आणि चिंतू घाईघाईने उठला. वर्तमानपत्र उघडून त्याने सवयीने नेहमीचे नेमके पान उघडले. राशी भविष्याचे पान. ‘कोणतेही टोक गाठू नका’ असा सल्ला त्याच्या आजच्या राशी भविष्यात वाचून चिंतू चिंतेत पडला. आता ‘कराया आधार, इच्छितसे’.. म्हणजे आजच आधार क्रमांक जोडायचे काम केले पाहिजे, तर भविष्य सांगते ‘कोणतेही टोक गाठू नका’.. चिंतू डोके खाजवू लागला आणि शेवटी त्याने ज्योतिषाचा सल्ला मानायचा निर्णय घेतला. आपल्या राशीचे आजचे भविष्य आपल्याला काही तरी संकेत देत आहे, असे वाटून त्याने मनातल्या मनात तुकोबारायांची क्षमाही मागितली आणि आधार क्रमांक जोडण्यासाठी करायची धावपळ वाचली असा विचार करून चिंतू काहीसा निर्धास्त झाला. आता आरामात ऑफिसला जाता येईल असे वाटून त्याने स्वयंपाकघरात कामात गुंतलेल्या कुटुंबास थोडीफार मदतही केली. त्यामुळे घरातील वातावरणही मोकळे झाले असा अभूतपूर्व अनुभव आल्याने चिंतू सुखावला. आपल्या राशीचे भविष्य खरे ठरणार याची त्याला खात्री पटली. त्याच आनंदात तो ऑफिसला गेला. आज कमालीचे काम करून साहेबास खूश करावे, असे त्याला वाटू लागले होते; पण कोणतेही टोक गाठू नका, हे भविष्य पुन्हा आठवल्याने त्याने तो निर्णय रद्द केला व नेहमीप्रमाणे टेबलावर फायलींचा ढिगारा समोर ठेवून तो दात कोरत बसला. आज साहेबांनी राऊंडदेखील घेतला नाही, हे संध्याकाळी लक्षात आल्यावर, वर्तमानपत्रातील रोजचे भविष्य हाच आपला मोठा आधार आहे, अशी त्याची खात्रीच पटली. टेबलाच्या टोकाचा आधार घेऊन चिंतू उठू लागला, पण ‘कोणतेही टोक गाठू नका’ असा सल्ला त्याला आठवला. आधाराशिवायच आज उठायचे, असा धाडसी निर्णय घेत तो कसाबसा खुर्चीतून उठला, बाहेर पडला. गाडी पकडून त्याने घर गाठले आणि निवांतपणे चहा घेत त्याने टीव्ही लावला. समोर ब्रेकिंग न्यूज झळकत होती. मोबाइल, बँक खात्याला आधार क्रमांक जोडण्याची सक्ती टळली होती.. चिंतूने आनंदाने टिचकी वाजविली आणि त्याला नामदेवांचा अभंग आठवला.. ‘आता मी करावा, कायसा आधार, चरण विर्धार  देवपूजा’.. नामदेवांना नमस्कार करून चिंतू सायंपूजेच्या तयारीला लागला..