19 November 2017

News Flash

मागण्यांची किणकिण..

अंत:पुरात एक तेज:पुंज व्यक्ती मोर्चेकऱ्यांची वाटच बघत होती.

लोकसत्ता टीम | Updated: April 26, 2017 3:17 AM

 

महानगरातील तो मोर्चा केवळ अभूतपूर्व होता. महानगराने आजवर पाहिलेले मोर्चे म्हणजे मोर्चेकऱ्यांच्या हाती झेंडे, जोरजोराने घोषणा, कुणाचा तरी जयजयकार किंवा कुणाचा तरी निषेध. हा मोर्चा मात्र अत्यंत शिस्तीत निघाला होता. ना कुठली गडबड ना कसल्या घोषणा. ना कुठले झेंडे ना कुठल्या मागण्या. केवळ त्यांच्याकडील छोटय़ा छोटय़ा घंटांचा मंद मंद आवाज तेवढा कानी पडत होता. शिस्तीतला हा मोर्चा शिस्तीतच मायबाप सरकारच्या मोठ्ठय़ा महालापाशी पोहोचला. सुरक्षारक्षकांनी मोर्चेकऱ्यांच्या डोळ्यांतील करुणा पाहून त्यांना लगेचच महालाच्या भव्य अशा अंत:पुरात सोडले. अंत:पुरात एक तेज:पुंज व्यक्ती मोर्चेकऱ्यांची वाटच बघत होती. अत्यंत आदराने लवून त्या व्यक्तीने मोर्चेकऱ्यांचे स्वागत केले. ‘आपण येथे येण्याचे कष्ट का बरे घेतलेत? मीच आपल्याकडे आलो असतो. आपण आम्हाला मातेसमान..’ ती व्यक्ती अत्यंत आस्थेने उद्गारली. ‘तसे काही नाही. तुम्ही आमच्यासाठी एवढे करीत आहात, हे बघून आमचे आधीच मृदू असलेले हृदय अधिकच मृदू झाले आहे. आजवर कुणीही आमच्यासाठी एवढे केले नव्हते. आमच्यासारख्यांना आधारपत्रिका दिल्यामुळे जणू तेहतीस कोटी देवांची कृपाच झाल्याची आमची भावना आहे..’ मोर्चेकऱ्यांमधून आवाज आला. सोबत घंटाही किणकिणल्या. ‘एवढे केले आहेच, तर आणखी काही छोटय़ा छोटय़ा मागण्या आहेत आमच्या..’ मोर्चेकऱ्यांमधून आलेले वाक्य त्या तेज:पुंज व्यक्तीने मध्येच तोडले व ‘तुम्ही काहीही मागणी करा, त्याची पूर्तता करणे हे आमचे महद्कर्तव्य आहे,’ असा शब्द तातडीने दिला. त्यासरशी मोर्चामधून निवेदन करण्यास प्रारंभ झाला. ‘मागण्या तशा फार मोठय़ा नाहीत. आधारपत्रिका मिळाली आहेच, तर शिधापत्रिकाही मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे आम्हाला रेशनवर तूर, हरभरा, मका भरडा असे काही मिळू शकेल. स्वतच्या मालकीचे घर नसलेल्यांचे आमच्यातील प्रमाण मोठे आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या योजनेमध्ये आमच्यासाठी काही घरे राखीव असावीत. निवृत्तीनंतर काय करायचे, पोट कसे भरायचे, हा मोठा गहन प्रश्न आमच्यापुढे असतो. त्यामुळे निवृत्तीनंतरचे आमचे आयुष्य सुखासमाधानात जावे, यासाठी काही योजना आखल्यास आमच्यापुढील प्रश्न मिटेल. बस्स एवढय़ा साध्या मागण्या आहेत आमच्या..’ मोर्चेकऱ्यांचे निवेदन ऐकून तेजपुंज व्यक्ती तिच्या चिरपरिचित शैलीत शांतपणे हसली. ‘या इतक्या साध्या मागण्यांची पूर्तता आम्ही सहजीच करू शकतो. या देशाची संस्कृती तुमच्यावर अवलंबून आहे. असे असताना तुमच्यासाठी एवढेही करू शकलो नाही, तर आमच्यासारखे करंटे आम्हीच,’ असे म्हणत त्या तेज:पुंज व्यक्तीने मोर्चेकऱ्यांना पुन्हा एकदा लवून नमस्कार केला. ‘पुढल्या वसुबारसपर्यंत तुमच्या या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या असतील,’ असे ती तेज:पुंज व्यक्ती वदली, आणि.. मोर्चातील काळ्या, पांढऱ्या, करडय़ा, तपकिरी रंगांच्या तमाम गोमाता जोरजोराने कानांची हालचाल करीत, शिंगे हलवून, शेपटी उंचावून आनंदाने पुन्हा एकमेकांमागे चालू लागल्या..

First Published on April 26, 2017 3:17 am

Web Title: aadhar card for cows