12 December 2017

News Flash

बाळकृष्णलीला!

समाजहितेच्छू संस्थेचें नाव घेणें आह्मांस महत्त्वाचें वाटते.

लोकसत्ता टीम | Updated: July 28, 2017 3:44 AM

पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण. (संग्रहित)

सांप्रती महाराष्ट्रदेशी जें अनेक उत्तमोत्तम पुरस्कार देऊन समाजातील धुरीणांस नावाजण्याचे कार्य चालविणाऱ्या संस्था आहेत त्यांमध्ये लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट या समाजहितेच्छू संस्थेचें नाव घेणें आह्मांस महत्त्वाचें वाटते. या संस्थांमुळे मनुष्यमात्रांतील समाजहिताकरिताने रत होण्याची दैवी प्रेरणा अधिकाधिक बळकट होऊन अंतिमत तें समाजपुरुषाच्या स्वार्थाचेच होते. परमार्थ व स्वार्थ यांचा समसमासंयोग अशा पुरस्कारांतून होत असतो असें आमच्याने येथे म्हणावेंसे वाटते. याची विविध उदाहरणे आपणांस सर्वत्र दिसतीलच, परंतु हल्लींच्या टिळक कुलोत्पन्नांनी घालून दिलेले ताजे उदाहरण हे त्यांतील मेरुमणी शोभावे असे आहे व म्हणून त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणें येथे औचित्यपूर्ण ठरेल. हे उदाहरण म्हणजें कोणते असा प्रश्न यां स्थळी काहींना पडू शकतो. त्यां प्रश्नाचे उत्तर आपणांस अन्यत्र कोठेहीं नव्हें, तर दीपक टिळक या टिळक कुलोत्पन्न सत्पुरुषाने केलेल्या एका जाहीर घोषणेमध्येच आहे व सुदैवाने ही घोषणा काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक यांचेसंबंधाने नसून, ती घोषणा अशी आहे की आचार्य बाळकृष्ण यांस यंदाचे वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर करणेंत आला आहे. हे ऐकून कोणाचें अंतकरणात चित्रविचित्र भाव निर्माण होऊन त्यांचे काळीज पिळवटून जाण्याचा संभव आहे. जेथे फुलांची रास पाहिली तेथे आम्हांस गोवऱ्यांचे ढीग पाहावयास लागतात की काय असे कोणाचे मनात येण्याचीही शक्यता आहे. यापूर्वीचे काळी किती एक थोरामोठय़ांनी या पुरस्काराचा लौकिक वाढविला याच्या स्मृतीही कोणाचें मनीं येऊ शकतील. याचे कारण म्हणजे आ. बाळकृष्ण यांचे कार्य व कर्तृत्व यांबद्दल समाजात असलेले अज्ञान हे होय. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी व्रताचे पालन करणारे जे मोजके नरपुंगव सांप्रती भारतदेशी आहेत त्यांतील राष्ट्रांस ललामभूत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आपुले कार्पोरेटसंत रामदेव हे होत व आ. बाळकृष्ण हे त्यांचे परमशिष्य होत. सांदिपनी-कृष्णाची आधुनिक जोडी असें त्यांस म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरेल काय हें ठरविण्याचे कार्य आम्ही वाचकांवर सोडतो. परंतु भगवंताने सांगितलेला कर्मयोग प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवून योगाची विक्री करणारे व इतकेंच नव्हें, तर योगास आयुर्वेदिक साबूपासून ब्रह्मांडातील तमाम ग्राहकोपयोगी जिनसांपर्यंतची जोड देऊन त्याद्वांरे संपत्तीचे संचयन करण्याचे राष्ट्रकार्य करणारे स्वदेशनिष्ठ संत म्हणून आम्हांस त्यांचे मोठेपण शिरोधार्य वाटते. अशा मनुष्यांचा गौरव करणेंचे कार्य हे राष्ट्रकार्यच असून, त्यांमध्ये कोणांस वेगळाच वास येत असेल वा कोणांस हे वाहत्या गंगेमध्ये हात धुऊन घेण्याचे कर्म वाटत असेल तर तो दोष ज्याचेत्याचे दृष्टीचा आहे. तो दोष टिळक कुलोत्पन्नांस देणें हा घोर अपराध ठरेल व त्यांस टिमविच्या सुसंस्कृत परीक्षेस बसण्याचें प्रायश्चित्तच घ्यावे लागेल, हे आम्ही बजावून सांगतो. आ. बाळकृष्ण यांस सदरहू पुरस्कार देण्याच्या योगानें लो. टिळक यांच्या नावाचे बरेवाईट होत आहे असे म्हणणारे शंकासुरही प्रत्यक्ष पुण्यनगरीतही आहेत. परंतु त्यांस आम्ही सांगून ठेवतो, की त्याची उठाठेव करण्याचे अन्य कोणांस कांही कारण नसून, लो. टिळक यांच्या हल्लीच्या कुलोत्पन्नांनी आपुल्या बाळकृष्णलीलांतून ते कार्य आधीपासूनच नेटाने चालविले आहे. त्यापुढे या बाळकृष्णांस दिलेल्या पुरस्काराची काय बरें मातब्बरी?

First Published on July 28, 2017 3:44 am

Web Title: acharya balkrishna lokmanya tilak smarak trust marathi articles