ठाणे नगरीचे प्रधानसेवक आणि याच पालिकेची प्रशासकीय गाडी हाकणाऱ्या म्होरक्यांपैकी एक अशा दोघांमध्ये परवाच्या मंगळवारी निविदेच्या विषयावरून म्हणे चांगलीच जुंपली होती. जुंपल्यानंतर नगरीच्या प्रधानसेवकांनी म्हणे त्या प्रशासकीय म्होरक्याच्या दिशेने पाण्याची बाटली आणि काही टोकदार शब्द भिरकावले. शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचा दर्जा सुधारण्याबाबतच्या दौऱ्यानंतर हे रामायण घडले. ते घडावे आणि दुसऱ्याच दिवशी, कालच्या बुधवारी एका खेळाडूने मांडलेली कैफियत प्रसिद्ध व्हावी, हा योगायोगच. अग्रता मेलकुंदे ही १३ वर्षांची गोळाफेकपटू. पाच राष्ट्रीय स्पर्धामध्ये तिने तीन सुवर्णपदके पटकावली आहेत. तिचा आणि दादोजी कोंडदेव स्टेडियमचा संबंध काय? तर ती या स्टेडियममध्ये गोळाफेकीचा सराव करीत असे. ‘असे’ म्हणण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी ती ओळखपत्र न्यायला विसरली आणि तिचे तेथील शुल्कही भरायचे राहिले होते. या कारणांमुळे तिला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला. त्याने ती खूप दुखावली गेली आणि मांडली तिने कैफियत. आता खरे तर नियमांची कसून अंमलबजावणी केल्याबद्दल ठाणे महापालिकेचा सत्कारच करायला हवा. मिळवली असतील अग्रताने तीन सुवर्णपदके, पण म्हणून काय झाले? नियम म्हणजे नियमच. आता काही छोटय़ाछोटय़ा गोष्टी नियमांना वळसा देऊन होत असतात, पण त्यामागे हेतू असतो विकासाचा,  लोक उगीच त्याकडे छिद्रान्वेषी दृष्टीने बघतात. खरे म्हणजे अग्रताच्या बाबतीत जे घडले ते तिच्यासाठी इष्टापत्तीच. ती आपला गोळाफेकीचा सराव आता कळव्यातील एका मैदानावर करतेय. कचरा, अस्वच्छता, इतस्तत: पसरलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या अशा गोष्टींनी युक्त असे ते मैदान. त्यात सराव करताना अग्रतापुढे अडचणी येणारच. पण त्यांचा सामना करताना तिची जिंकण्याची जिद्द आणखी बळकट होत जाईल, हे कसे कळत नाही कुणाला? आगीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला झळाळी येणार कशी? अग्रताने त्याच मैदानात सराव करावा. वाटल्यास तिने शहराच्या प्रधानसेवकांकडूनही गोळाफेकीच्या काही मौलिक सूचना मिळवाव्यात. आता एवढय़ाशा उदाहरणावरून काही लोक भलतेच विषय उपस्थित करतील. म्हणजे, ‘बघा आपल्याकडे खेळाडूंची किती उपेक्षा होते’ वगैरे. मग ते थेट ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीवर घसरतील. रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक मिळवलेली साक्षी मलिक हिनेही, ‘पदक मिळवण्याच्या आधीही खेळाडूंकडे लक्ष द्या’, अशी विनंती सरकारांना, क्रीडाप्रेमींना पदक मिळवल्यानंतर केली होती. साक्षीनेही हीच गोष्ट लक्षात घ्यायला हवी. तुमची उपेक्षा झाली, तुम्हाला आवश्यक सोयीसुविधा मिळाल्या नाहीत की तुमच्यातील जिद्द अधिक उफाळून येते, तुम्ही लढवय्ये होता व त्यातून तुमची कामगिरी उंचावते. अतिशय साधे, पण मौल्यवान सूत्र आहे हे. त्यामुळे तमाम खेळाडूंनी त्याचा नीट अभ्यास करावा. तो केला की उद्याचा सुवर्णकाळ त्यांचा झालाच म्हणून समजा.