अहमदाबाद विमानतळावर परवा सर्वच विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त गरबा सादर केला. ‘फ्लॅश मॉब’च्या धर्तीवर ‘फ्लॅश गरबा’ झाला, म्हणे. ठरवलेल्या ठिकाणी ठरवलेल्या वेळी ठरवलेल्या गोष्टी करायची क्षमता संपली, की हा असा ‘फ्लॅश’ खुळचटपणा सुचतो की काय ते न कळे. पण त्या ‘फ्लॅश’ गरब्यानिमित्तानं एक ‘फ्लॅशबॅक’ आम्हाला अगदी अलीकडच्या काळात झालेल्या घटनांचे स्मरण करून गेला. त्या स्मरल्यावर आमचे काळीजच गरबा खेळू लागते!

जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानात उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातले प्राणवायू मुखवटे खाली आले. काय होतंय हे कळायच्या आत अनेकांचे कान दुखू लागले. नाकांतून रक्त येऊ लागलं. याचं कारण नंतर कळालं ते म्हणजे, वैमानिक विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारं बटण सुरू करायला विसरले होते!

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या त्रिची-दुबई विमानानं उड्डाण केलं आणि ते दुबईच्या दिशेनं झेपावू लागलं. उड्डाणानंतर ३०-४० मिनिटांनी बेंगळूरु हवाई वाहतूक नियंत्रकाला त्रिची विमानतळाकडून बातमी मिळाली, की त्या विमानानं उडताना त्रिची विमानतळाच्या कुंपणभिंतीला धडक दिली आहे. बेंगळूरुपाठोपाठ मुंबई हवाई नियंत्रकानेही वैमानिकांना याविषयी इशारा दिला. पण विमानातली उपकरणे नियमित सुरू आहेत असं सांगून वैमानिकांनी उड्डाण सुरूच ठेवले! अखेरीस एअर इंडिया व्यवस्थापनाकडून इशारा मिळाल्यानंतर विमान मुंबईकडे वळलं! त्या विमानाच्या फ्युसलाजचा एक तुकडा धडकीमुळे उडाला होता.

एअर इंडियाच्या एका विमानाचे दार लावताना पायरी चुकल्यामुळे एक हवाई सेविका ३० फूट खाली पडली आणि तिला गंभीर इजा झाली. कधी विमानातील दोन वैमानिक कॉकपिटमध्येच गुद्दागुद्दीवर येतात. कधी खास जोधपूरची कांदा कचोरी घेण्यासाठी एक वैमानिक मुंबई-दिल्ली थेट उड्डाण करण्यास नकार देते.

तरीही, सर्वाधिक वेगानं वाढणारी बाजारपेठ म्हणून भारतीय प्रवासी विमान वाहतूक क्षेत्राकडे पाहिलं जातं! बोइंग आणि एअरबस त्यांची अत्याधुनिक विमानं विकण्यासाठी येथील विमान कंपन्यांचे उंबरठे झिजवतात. या क्षेत्राची वाढ होतेय पण विकास होतोय का, प्रश्न मात्र उरतो. अर्थात, काहीही झाल्यानंतर ज्या स्थितप्रज्ञ कोरडेपणाने विमान कंपन्या – सरकारी नि खासगी अशा दोन्ही – निवेदनं प्रसृत करतात, त्याबद्दल त्यांच्याकडून मानसिक संतुलनातले धडेच घेतले जावेत असे वाटून जाते. उदा. आज आमच्या विमानाचा खालील भाग उड्डाण करताना एका भिंतीच्या संपर्कात (धडकले नव्हे!) आला. त्याविषयी वैमानिकांना कळवल्यानंतर त्यांनी विमान परत अमक्या एका ठिकाणी सुखरूप परत आणले. सगळे प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना चार तासांनी (प्रचंड मनस्तापाला सामोरे गेल्यानंतर हे कधीही न सांगता!) नवीन विमानात बसवून ईप्सित स्थळी धाडण्यात आले. वैमानिकाला इतके तास आणि सहवैमानिकाला तितके तास उड्डाणाचा अनुभव आहे (ही गौरवाची बाब की नामुष्कीची?) तरी चौकशी संपेपर्यंत त्यांना ‘डीरोस्टर’ (घरी बसवण्यात आले आहे नव्हे!) करण्यात आले आहे.

तरीही गरबा-बिरबा झोकात झालाच पाहिजे ना? तेव्हा शुभेच्छा.. दसऱ्याच्या सणासाठी नव्हेत, तर एवढे होऊनही निर्धास्त प्रवास करणाऱ्या भारतीय विमान प्रवाशांसाठी!