रिक्षा स्टेशनसमोर येताच उडी मारून चिंतूने धावतच फलाट गाठले. लोकल गाडी फलाटावर येत होती. चिंतूने बाह्य़ा मागे सारल्या. कपाळ घामाने थबथबले होते. पण त्याने घाम पुसलाच नाही. ‘घाम गाळण्यासाठीच तर आपण रोज ही सर्कस करतो!’.. चिंतू मनात म्हणाला, आणि त्याने धावती गाडी पकडण्यासाठी ‘पोझिशन’ घेतली. पण गाडी अगोदरच गर्दीने ओसंडली होती. चिंतू हिरमुसला. दरवाजातून आत शिरण्याची धडपड करू लागला. काही सेकंदांत त्याला पावलाचा अंगठा पायरीवर टेकण्यापुरती जागा मिळाली. जिवाच्या आकांताने त्याने दरवाजाचा दांडाही पकडला. गाडी सुरू झाली. कपाळावरचा घाम तर आता थेंबाथेंबाने निथळत होता. पण तो पुसण्यासाठी चिंतूचा हात मोकळा नव्हता. त्याने समोरच्या प्रवाशाच्या पाठीवर कपाळ टेकविले, पण त्या प्रवाशाच्या भिजलेल्या पाठीचा घाम आणखीनच कपाळावर चिकटला. अशा तऱ्हेने घामांची देवाणघेवाण झाली की प्रवाशांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो, असा चिंतूचा अनुभव होता. चिकटलेल्या गर्दीला घेऊन गाडी रडतखडत चालली होती. सांताक्रूझजवळ येताच चिंतूने आकाशात पाहिले. एक विमान हवेत झेपावत होते. चिंतूला बरे वाटले. कधी तरी देशाचे अर्थमंत्री म्हणाले होते, ‘उडेगा देश का आम नागरिक’.. ते आठवून चिंतू स्वत:शीच हसला. त्याला सकाळपासूनचा प्रवास आठवला. घरापासून रिक्षाने स्टेशन गाठत सिग्नल आणि कोंडीचा मुकाबला करताना त्याला रोज एकच विचार सुचायचा. आपण प्रगत होतोय, रिक्षापेक्षाही विमान प्रवास स्वस्त झालाय, मग घरापासून ऑफिसपर्यंत जायला विमान असायला हवे. सरकारने रिक्षावाल्यांना तीन आसनी विमानाचा परवाना द्यावा, ‘शेअर एअर’ नावाची एखादी स्वस्त योजना सुरू करावी, रस्त्याकडेलाच विमान उतरण्याची व उड्डाणाची सुविधा द्यावी, आणि घरातून निघून पाच मिनिटांत ऑफिस गाठावे.. मानवी श्रमवेळाची केवढी मोठी हानी टळेल, खड्डय़ांमधला त्रासदायक प्रवास संपेल, आणि रिक्षापेक्षा कमी पैशात, कमी वेळात थेट ऑफिसपर्यंत हवाहवाई सफर करता येईल. एक ना एक दिवस हे स्वप्न सत्यात उतरेल असे चिंतूला नेहमी वाटायचे. तसा तो ‘भक्त’देखील होताच. त्यामुळे आता हे स्वप्न फार लांब नाही अशी त्याची खात्रीही होती. म्हणूनच, घाम गाळण्याचे दिवस आता फार उरलेले नाहीत, असे मनाला समजावतच तो रोज गर्दीत झोकून द्यायचा.. आजही त्याने ते दिव्य पार पाडले होते. आकाशातले विमान तोवर दिसेनासे झाले होते.. रखडलेल्या  गाडीच्या गर्दीत पायरीच्या कोपऱ्यावर तोल सांभाळताना चिंतूच्या पायाला रग लागली होती. लोकलदांडा पकडण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरूच होता. त्याने नजर डब्यातल्या गर्दीवर फिरवली. त्या गर्दीतही एक जण वर्तमानपत्र वाचत होता, आणि चिंतूला आपले ‘ते’ स्वप्न पेपरच्या  पानावर दिसले. हवाई वाहतूक राज्यमंत्री चिंतूच्याच ‘मन की बात’ सांगत होते. रिक्षापेक्षा देशातील हवाईप्रवास  स्वस्त झाला, म्हणून  पाठ थोपटून घेत होते. चिंतू हसला. त्यानेही नकळत समोरच्या  प्रवाशाची पाठ थोपटली, आणि त्या भिजल्या पाठीवरचा पंजाला लागलेला घाम आपल्या पँटच्या पाठीशी पुसला..