हजारो वर्षांच्या सवयीमुळे कोणताच सजीव प्राणवायूशिवाय आणि शुद्ध पाण्याशिवाय जगूच शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासारखी वाक्ये नुसती ऐकून सोडून देणे चार-पाच दशकांपूर्वीपर्यंत हे ठीक होते. आता यापुढे शुद्ध हवा, चांगले पाणी, असे नखरे आपल्यालाच नव्हे, तर कोणत्याच सजीवाला परवडणारे नाहीत. मिळेल तो वायू आणि मिळेल ते पाणी पिऊन जगण्याची सवय यापुढे लावून घेतली नाही, तर जगणे मुश्कील होणार आहे. आणि त्यातूनही, शुद्ध हवेचा आणि शुद्ध पाण्याचा हट्टच असेल, तर त्यासाठी  खिशात पैसा खुळखुळता हवा. तिकडे चीनमध्ये प्रदूषणाचा एवढा कहर झाला आहे की, राजधानी बीजिंगमध्ये कॅनडाच्या उंच पर्वतरांगांवरील शुद्ध हवेचे डबे आयात करण्याची वेळ आली आहे. काही गल्ल्याही शुद्ध हवा प्रभाग म्हणून राखून ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रदूषणाचा मुद्दा निघाला की, दिल्लीतील सम-विषम तोडग्याची आपल्याला आठवण येते. पण दिल्ली-मुंबईच नव्हे, सगळीकडेच प्रदूषणाचा कहर सुरू आहे. मुंबईच्या हवेने प्रदूषणाची कमाल पातळी कायमच राखण्यात कमालीचे यश मिळविले आहे आणि सरकार किंवा प्रशासन त्यावर काहीही करू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मध्यंतरी, शिशाचा वापर प्रमाणाहून अधिक केल्याच्या आरोपावरून एका कंपनीच्या नूडल्सवर बंदी आली, त्याच वेळी मुंबईच्या चेंबूर-शीव परिसरात हवेतील कार्बनचे प्रमाण कमालीचे वाढल्याने तेथील हवेवरही बंदी घातली जाणार की काय, अशी भीतीही वाटू लागली होती. पण सुदैवाने, हवेतील उरलासुरला प्राणवायू शोषून घेण्याची शक्ती शाबूत असल्याने ती वेळ ओढवलीच नाही. हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता प्राणवायूऐवजी कार्बन डायऑक्साइडवर जगण्याची सवय करून घ्यावी लागेल किंवा शुद्ध हवा आयात करावी लागेल. या आयातीसाठी प्रत्येकाला आपली क्रयशक्ती कमालीची वाढवावी लागेल. कारण मागणी वाढली की, साठेबाजी होते, काळाबाजार होतो आणि महागाई वाढते. प्राणवायूचा किंवा शुद्ध हवेचा व्यापार सध्यापुरता बीजिंग-कॅनडापुरता मर्यादित असला, तरी मुंबईलादेखील कधी ना कधी शुद्ध हवेची गरज भासणारच. गेल्या काही आठवडय़ांत मुंबईच्या हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यामुळे एक तर जुन्या, प्राणवायूवरच जगण्याच्या सवयी तरी सोडून द्याव्या लागतील किंवा आयात प्राणवायूसाठी किंमत मोजायची तयारी तरी ठेवावी लागेल. योगायोगाने अशाच वेळी, ‘मेक इन इंडिया’चे एक पर्व देशात सुरू होत आहे. त्यामुळे जगातील कोणतीही वस्तू आता देशात बनविता येईल. त्यामुळे हाती पैसा खुळखुळू लागेल.. पण शुद्ध हवा मात्र देशात कुठेच बनवता येणार नसल्याने ती आयातच करावी लागेल. ‘मेक इन इंडिया’मुळे होणाऱ्या विकासातून येणाऱ्या समृद्धीचा वापर करून शुद्ध हवा खरेदी करण्यासाठी क्रयशक्ती वाढेलही. पण तोपर्यंत, शुद्ध हवेवर आणि प्राणवायूवर जगण्याची जुनी सवय बदलता आली तर बरेच की!..