सांप्रतकाळात देशात राष्ट्रभक्तीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत, हे पदोपदी अनुभवता येते. लोकांच्या मनात राष्ट्रवाद रुजविण्याची सुरुवात इतरांपासून व्हावी या हेतूने अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे भक्तगण वेगवेगळ्या मार्गानी प्रयत्नशील असतात. या महान कार्यात कुणा एकाच पक्षाने किंवा त्यांच्या भक्तपरिवाराने योगदान द्यावे हे सामाजिक संस्कृतीस साजेसे नसल्याने, जमेल त्याने आपापल्या परीने या कार्यात उतरावे आणि आपलाही वाटा उचलून राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात जागी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे असते. नेमके हेच कार्य सध्या महाराष्ट्रात नव्याने सुरू झाले आहे. राजकारणातील राष्ट्रवाद हा एक स्वतंत्रपणे अनुभवण्याचा मुद्दा असतो. तो केवळ स्वत:च्या नावाभोवती राष्ट्रवादाचे वलय निर्माण करून साध्य होत नसतो, तर राष्ट्रवादाचे धडे देण्याच्या मोहिमेत प्रत्यक्ष उतरावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेल्या सरकारने स्वत:हून ही मोहीम हाती घेतली हा महाराष्ट्राचा भाग्ययोग म्हणावयास हवा. जनतेच्या मनात राष्ट्रभक्ती जागी राहावी यासाठी चित्रपटगृहांमध्ये सुरुवातीस राष्ट्रगीत म्हटले जाते. विद्यार्थ्यांच्या मनात ही ज्योत जागी करण्यासाठी विद्यार्थिदशेपासूनच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविण्याचे कार्य निष्ठावान शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हाती घेतले आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये होणाऱ्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानेच झाली पाहिजे, असा फतवा काढण्याचा शिक्षण खात्याचा विचार आहे, असे सामंत यांनी पत्रकारांनी आयोजित केलेल्या एका समारंभात बोलताना काढले. साहजिकच, सामंत यांचे हे विचार तातडीने समाजापर्यंत पोहोचविणे हे माध्यमांचे कर्तव्यच ठरते. त्यानुसार ते झाले. या नव्या मोहिमेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता राष्ट्रभक्तीचे प्रखर बाळकडू मिळेल व देशाची भावी पिढी राष्ट्रभक्तीच्या रसाने रसरशीत होईल. सध्या सर्वत्रच राष्ट्रभक्तीचे मळे फुलल्याने, महाराष्ट्रातील या कळ्यांची जेव्हा फुले होतील, तेव्हा त्यांच्यावरही राष्ट्रभक्तीचे तेज चढलेले दिसेल. या प्रयत्नांसाठी सरकारी सहकार्य लाभणे हा दुर्मीळ दैवयोग असून महाराष्ट्राने तो ‘करून दाखविला’ आहे. राष्ट्रभक्तीसोबतच मातृभाषेचा अभिमान फुलविण्याचे कार्यदेखील सामंत यांच्या हातून घडणार आहे, हा आणखी एक सुवर्णयोग! अलीकडच्या काळात राजकीय पक्षांचे प्रादेशिक दृष्टिकोन राष्ट्रीय पातळीपर्यंत विस्तारू लागल्यापासून मातृभाषा मराठी पुन्हा डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर लक्तरे लेऊन मंत्रालयासमोर करुणपणे उभी राहणार की काय, अशी शंका मूळ धरू लागली असतानाच, खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच मराठीच्या अस्मिता संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. शाळा-महाविद्यालयांचे फलक मराठीतूनच लावणे सक्तीचे करण्याचा त्यांचा मानस असल्यामुळे, मायमराठीविषयीची अस्मिता जागी ठेवण्याचे महत्कार्य त्यांच्या हातून घडणार आहे. राष्ट्रभक्ती व अस्मिता संवर्धनाच्या या राष्ट्रवादी कार्यक्रमास महाराष्ट्रातील जनतेची भरभरून साथ मिळाली पाहिजे. कारण, प्रश्न राष्ट्रभक्तीचा आणि मातृभाषा मराठीच्या अस्मितेचा आहे. अस्मिता संवर्धनाची मक्तेदारी कुणा एका झेंडय़ाखाली राहणार नाही, तर आता ती सरकारची सामूहिक जबाबदारी झाली आहे, यापेक्षा आनंदाची बाब, अन्य नाही!