डावोससारख्या थंड हवेच्या रमणीय स्थळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दाखल झाले तेव्हा वातावरण काहीसं कुंद होतं. जागतिक अर्थव्यवस्था अपेक्षेइतक्या विस्तारत नसून, कित्येक तर आक्रसत आहेत, असं नाणेनिधीच्या वतीने डावोस महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच सांगण्यात आलं होतं. थंड हवेच्या रमणीय स्थळी अशी नकारात्मक, नैराश्यवादी चर्चा कशासाठी करावी, असाही विचार ट्रम्प यांनी केला असावा. त्यात पुन्हा ती मुलगी.. हो, तीच ती! ग्रेटा थनबर्ग. जगाच्या नजरेतून एक हुशार, तळमळीची पर्यावरणवादी युवा कार्यकर्ती, वयाच्या पलीकडले शहाणपण दाखवणारी. पण ट्रम्प आणि त्यांच्या समविचारींच्या नजरेतून सर्वनाशाची दूत! या वयात नेटफ्लिक्स आणि आइसक्रीमचा आनंद घेण्याचं सोडून नसती उठाठेव करणारी आगाऊ पोर. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत न्यू यॉर्कला बोलली. इथंही बोलते. डावोसमध्ये ग्रेटानं जगभरच्या नेत्यांना आणि उद्योगपतींना फटकारलं होतं.. ‘जग अजूनही जळतंय याची कल्पना आहे ना?’ असं विचारलंन. हा काय प्रश्न झाला? शिवाय किती हा कुत्सितपणा! ज्याला तुम्ही जळणं म्हणता, त्याला आम्ही झळाळणं म्हणतो, असं ट्रम्प यांनी सांगून टाकलं. जळतंय काय? पृथ्वी. झळाळतंय काय? अमेरिका! कशी? माहीत नाही? ट्रम्प यांच्या शब्दांत ऐकाच :

‘दोन वर्षांपूर्वी मी बोललो होतो अमेरिकी पुनरुत्थानाविषयी. दोन वर्षांनी जाहीर करायला आनंद होतो, की जगानं आधी कधीही पाहिली नव्हती अशा वेगाने अमेरिकी अर्थव्यवस्था विस्तारत आहे.’(२००९ ते २०१७ या काळात अमेरिकेचा विकासदर २.२ टक्के होता. ट्रम्प अध्यक्ष बनल्यानंतरच्या काळात २.६ झाला. ट्रम्प यांनी तो ४ टक्क्यांवर नेण्याचं वचन दिलं होतं. ऐतिहासिक? १९४७ ते १९७३ या काळात सरासरी विकासदर ४ टक्के होता. १९९७ ते २००० मध्ये ४.५ टक्के होता!)

‘सरासरी बेरोजगारी दर माझ्या कारकीर्दीत इतर कोणत्याही अध्यक्षाच्या अमदानीत नव्हता इतका घटलेला आहे.’(मुळात बराक ओबामा यांच्या कार्यकाळातच तो कमी म्हणजे ४.१ टक्के होता. ट्रम्प यांच्या कार्यकाळात तो ३.५ टक्के आला असला, तरी त्यांच्याच काळात नवीन रोजगार निर्माण होण्याचा दर घटलेला आहे.)

‘मध्यमवर्गाचा उत्कर्ष होत आहे. घरटी उत्पन्नात वाढ झालेली आहे. अमेरिकन स्वप्न आणखी वेगाने मोठे होत आहे.’(विकासदर आणि बेरोजगारी दर यांच्याप्रमाणेच हा निर्देशकही ट्रम्प सत्तेवर येण्याआधीपासून वाढत आहे. ओबामा काळात वेतनवाढ होण्यास सुरुवात झाली. याचं कारण कामगार मिळवणे कंपन्यांसाठी अवघड ! अशा वेळी अधिक वेतनांचे प्रलोभन दाखवूनच कामगार आकर्षित करावे लागतात.)

ट्रम्प यांच्या या ऐतिहासिक भाषणाच्या काही तास आधीच तिकडे अमेरिकेत त्यांच्याविरोधातील महाभियोगाच्या हालचाली एक टप्पा पुढे सरकल्या होत्या. इतक्या यशस्वी अध्यक्षाला सत्ताभ्रष्ट करण्याचा पाहा कसा कट अमेरिकेत सुरू आहे, हे सांगण्यासाठी डावोसपेक्षा उत्तम व्यासपीठ आहेच कुठे? असं काही तरी सांगायचं सोडून उगीच काही तरी आपलं पृथ्वी जळत असल्याचं अभद्रपुराण.. काय म्हणावं या करंटेपणाला?