22 January 2018

News Flash

दांडी : मारणे आणि उडणे

नरेंद्रजी मोदीजी हे मात्र त्या गांधीजींचे परमभक्त दिसतात.

लोकसत्ता टीम | Updated: August 3, 2017 4:46 AM

Amit Shah: अमित शहा यांना भाजप अध्यक्षपदाची धुरा सांभाळून तीन वर्षे झाली आहेत. विशेष म्हणजे या खास क्षणी गुजरातमधील आमदारांनी राज्यसभेत पाठवून त्यांना विशेष भेट दिली आहे.

ज्यांना शहाणीसुरती माणसे राष्ट्रपिता वगैरे म्हणत असतात त्या एम. के. गांधी यांच्याबद्दलचे आपले आणि आपल्या भाईंचे म्हणजे पूज्य अमित शाह यांचे मत सारखेच असले, तरी आपले प्रिय प्रधानसेवक नरेंद्रजी मोदीजी हे मात्र त्या गांधीजींचे परमभक्त दिसतात. सतत आपले गांधीनाम जपत असतात. आता आपले जे नेते असतात त्यांचे सगळेच काही आपण ऐकायचे नसते, हे अगदी व्हाट्सअ‍ॅप विद्यापीठाच्या तमाम स्नातकांना लाभणारे ज्ञानगोमूत्र राज्यसभेतील आपल्या नेत्यांना चाखण्यास मिळू नये ही खरे तर आश्चर्याचीच बाब; परंतु आहे हे असे आहे. बरे या खासदारांना मोदींप्रमाणे गांधीभक्ती करायचीच असेल, तर त्यांनी ती खुशाल करावी. म्हणजे प्रात:काली स्मरण करावे, झालेच तर कॅलेंडरांवर आपली चरखासेल्फी छापावी, स्वच्छता मोहिमेत कोणी ‘भय्याजी. ई-स्माईल’ म्हणताच छानशी गांधीवादी पोज द्यावी.. त्यांनी गांधीजींच्या ‘दांडी’यात्रेचे अनुकरण करण्याची काय आवश्यकता होती? पण बहुधा शाळेपासूनचे संस्कार नडत असावेत त्यांना. त्यामुळेच त्यांनी परवाचे दिवशी चक्क राज्यसभेला दांडी मारली. तेही एक महत्त्वाचे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार असताना. आता तशी त्यांचीही फार काही चूक नाही. संसद हे लोकशाहीचे मंदिर. त्यासमोर त्यांनीही सुरुवातीला लोटांगण घातले होते. आणि एकदा मंदिरात जाऊन आले की, नंतर मग दुरून कळसाला नमस्कार केला तरी चालते, हा पाठ तर त्यांनी खुद्द प्रधानसेवकांकडूनच घेतलेला. तर आपल्याला हळूहळू अशा संस्थांचे महत्त्वच कमी करायचे आहे असे त्यांना वाटले आणि त्यांनी काढली दांडीयात्रा. आता आपल्या त्या दांडीने तिकडे विधेयकाची दांडी उडेल याचा त्या बिचाऱ्यांना तरी काय बरे अंदाज? पण भाई भडकले त्याने. आता त्यावर या दांडीबहाद्दरांनी कारणे तरी नीट द्यावीत की नाही? पण कोण म्हणतोय पोट दुखत होते, कोण म्हणतोय आम्हाला माहीतच नव्हते. शाळेतले संस्कारच हे. पण त्याने भाई बधतात की काय? त्यांनी चांगलेच वाभाडे काढले त्यांचे. तुम्ही खूप थोर आहात असे समजू नका. तुम्हाला पक्षाने ही संधी दिलीय, असे म्हणाले ते. फारच मनाला लागले ते या दांडीबहाद्दरांच्या. परंतु भाईंचेही बरोबरच आहे ना. अजून या संस्था आपण मोडीत काढलेल्या नाहीत. तेव्हा त्या आहेत तोवर शिस्त पाळायलाच हवी ना. आपण म्हणजे का सचिनसारखे क्रिकेटपटू आहोत का, राज्यसभेत अशा दांडय़ा काढायला? मग?..

First Published on August 3, 2017 4:46 am

Web Title: amit shah wants written explanation from mp who missing in rajya sabha
  1. No Comments.