खरे म्हणजे काँग्रेस हा काही एवढा दुबळा पक्ष नाही. तरीही, एक-दोन निवडणुकांमध्ये हार झाली तर लगेच प्रहार करण्याची शक्तीच क्षीण होऊन जावी अशी वेळ काँग्रेसवर आली. विधिमंडळात असो वा निवडणुकीच्या राजकारणात, गेल्या दीड वर्षांत काँग्रेसचे दुबळेपणच नजरेत भरले. हवा गेलेल्या या अवाढव्य फुग्यात पुन्हा नवी हवा फुंकण्याचे त्राण असणारा कुणी सापडेल का, या चिंतेने पक्षाचे दिल्लीश्वर हैराण झालेले असताना इकडे महाराष्ट्रात मात्र उपऱ्यांना गडाचे दरवाजे बंद करण्यासाठी दुबळ्या पंज्यांनी सारी शक्ती एकवटली होती. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत बाहेरच्यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी करणाऱ्यांनी त्यासाठी थेट वपर्यंत मोच्रेबांधणी सुरू केली असली तरी आतल्यांच्या अंगातली ताकद पुरती जोखल्यानंतर अखेर उपऱ्यांच्या खांद्यावरच पक्षाचा भार टाकण्याची सुबुद्धी श्रेष्ठींना झाली. पी. चिदम्बरम हा काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणातला खंदा वीर असला, तरी महाराष्ट्रातील तमाम इच्छुकांच्या आशावादावर फुली मारून जाहीर झालेली त्यांची उमेदवारी म्हणजे, निराश निष्ठावंतांच्या मते, उपऱ्यांचे अतिक्रमणच! नारायण राणे हा कोकणचा सुपुत्रही कालपर्यंत निष्ठावंतांच्या दुनियेत उपरेपणाची उपेक्षाच सोसत होता. जन्मभूमी कोकणाने झिडकारले, नंतर कर्मभूमी वांद्रय़ानेही नाकारले आणि राजकीय विजनवासाच्या वेदना सोसत असतानाच पुत्राच्या आततायी पराक्रमाचे पोवाडे चहूकडे गाजू लागल्याने आणखीनच अडचणीत आलेले राणे राजकारणातून संपल्याच्या आनंदात निष्ठावंतांच्या झुंडी मनात मांडे खात असतानाच, नारायणरावांचे दमदार पुनरागमन म्हणजे, दुखऱ्या जखमेवरचे मिठाच्या पाण्याचे शिडकावे! बिनकण्याच्या नेतृत्वामुळे डळमळलेल्या काँग्रेसचा विधान परिषदेत तरी आवाज उमटावा यासाठी नारायणरावांना संजीवनीची दुहेरी मात्रा मिळाली आहे. आता बंडाची सारी निशाणे गुंडाळून ठेवून मुकाटपणे ‘श्रेष्ठीपूजन संस्कृती’ची कास धरली नाही, तर उरलेसुरले राजकीय भवितव्य पुन्हा अंधारयुगाकडे जाणार ही काळ्या दगडावरली पुसटशी रेघदेखील स्पष्टपणे वाचण्याएवढा डोळसपणा आपल्याकडे आहे, हे नारायणरावांना सिद्ध करून दाखवावे लागले असावे. आपल्या राजकीय इच्छाआकांक्षांवर वेळोवेळी बोळा फिरविणाऱ्या पक्षश्रेष्ठींविरुद्ध टीकेची झोड उठविली असली, तरी प्रहार करणारा आपल्याएवढा तारणहार पक्षाच्या फौजेत नाही, हे श्रेष्ठींना पटवावे लागले असावे. आता काँग्रेसचा आवाज विधिमंडळात बुलंद होईल, अशी दिल्लीश्वरांची ‘मन की बात’ बरोबरच असल्याचा सूर नाइलाजाने निष्ठावंतांनाही आळवावा लागतो आहे. काळ कधी कुणाची कशी कसोटी पाहील ते सांगता येत नाही. एके काळच्या कट्टर विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री कसोटीच्या क्षणी मदतीला धावून येतो आणि एके काळचा स्वपक्षाचा मुख्यमंत्री अशाच क्षणी दुबळा भासू लागतो, हा राजकारणाच्या काळाचाच महिमा असतो. डळमळलेल्या पक्षाची घडी नारायणरावांनी बसविली, तर ते उपऱ्याचे उपकारच ठरतील..