गेल्या तीन वर्षांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तब्बल तीस पत्रे लिहिली. अखेर, हा भारत महात्माजींच्या स्वप्नातील नव्हे, म्हणून टाहो फोडला आणि दिल्लीचा राजघाट पुन्हा एकदा थरारून गेला. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे अण्णा हजारे आहेत कुठे, असा सवाल अलीकडे देशातील जनता करू लागली होती. यादवबाबाच्या मंदिरात चटईवर मनगटाची उशी करून पहुडलेले अण्णा गप्प झाले असेही लोकांना वाटू लागले होते; पण शिशुपालाला योग्य वेळी धडा शिकविणाऱ्या यादवबाबाची मूर्ती अण्णांच्या ध्यानस्थ नजरेसमोर तरळत होती. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अण्णा कोशात गेले, असे वाटत असतानाच हा आधुनिक गांधीबाबा सरकारशी संघर्षांस तयार झाला आहे. गांधी जयंतीदिनीचे एक दिवसाचे प्रतीकात्मक उपोषण ही तर अण्णांच्या आगामी लढाईची सुरुवात आहे. अण्णांच्या आमरण उपोषणाने देश कसा ढवळून निघतो, ते याआधी राजधानीने अनुभवलेले आहे. गांधीजींच्या साक्षीने त्या लढय़ाचा दुसरा अंक आता अण्णा पुन्हा सुरू करतील, तेव्हा त्यांच्या पाठीशी केजरीवाल असतीलच असे नाही. नवा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधातील असल्याने आता अण्णांच्या सोबतीला नवे शिलेदार कोण असतील याची उत्सुकता आणखी वाढणार आहे. ज्यांनी अण्णांच्या मागच्या लढाईत त्यांना साथ दिली, त्यांना सत्तेची फळे चाखावयास मिळाली आहेत. तीच फळे त्यांच्या हाती सोपवून अण्णा पुन्हा यादवबाबाच्या देवळात फकिरी करू लागले, तेव्हा अण्णांचा आवाज आता संपला असा जनतेचा समज झाला. आज अण्णा पुन्हा उभे राहिले आहेत. त्यांची मूठ वळली गेली आहे. देशात लोकपाल विधेयक हवे, असा आग्रह धरणाऱ्या अण्णांनी गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारला तीस पत्रे लिहिली. याचा अर्थ, दर वर्षी दहा पत्रे राळेगणसिद्धीतून पंतप्रधान कार्यालयात गेली. दर सव्वा महिन्याच्या अंतराने गेलेल्या एकाही पत्रास पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तरही न देणे हे म्हणजे अण्णांसारख्या परिवर्तनाची ताकद असलेल्या नायकाचीदेखील पत्रास ठेवली जात नाही यापेक्षा दुसरे काय असू शकते? अण्णा हजारे नावाची ताकद दुबळी ठरविण्याचा हा सरकारी कांगावा हाणून पाडण्यासाठी आता अण्णा सरसावले आहेत. राजघाटावर पोहोचताच समोर आलेल्या टीव्ही कॅमेऱ्यांसमोर अण्णांनी डोळे मिटून हात उंचावत मूठ वळली, तेव्हाच संघर्ष अटळ असल्याची साक्ष देशाला पटली आहे. आता नव्या संघर्षांत अण्णा माघार घेणार नाहीत, कारण अण्णा आंदोलनात उतरतात, तेव्हा त्यांच्यासमोर सरकारने झुकायचेच असते. या वेळीही सरकार झुकेल आणि अण्णा मूठ सोडवून दोन बोटांचे विजयचिन्ह देशाला दाखवत पुन्हा यादवबाबाच्या मंदिरात परततील. त्या दिवसाची देश वाट पाहात आहे. त्याच मागणीसाठी तेच आंदोलन पुन:पुन्हा करण्यासाठी अण्णा, देशाला तुम्ही हवे आहात.. अण्णा, तुम आगे बढो.. देश तुमच्यासोबत आहे की नाही याची आता कसोटी लागणार आहे!