06 April 2020

News Flash

‘मूल’मंत्र!

पांडुरंगाची माफी मागून प्रबोधनाचा नवा अध्याय महाराजांनी सुरू केला.

‘टिकटॉक’, ‘यू-टय़ूब’वर ४० लाखांहून अधिक चाहत्यांची संख्या असणाऱ्या महाराजांनी दिवसभरातील तिसरं कीर्तन आटोपलं. राज्यात कोठेही कीर्तन होवो, रात्री चारचाकी गाडीने प्रवास करून मुक्कामी गावी परत जाताना आणखी एक कीर्तन रंगवायचं होतं. अभंग निवडला होता कीर्तनाचा. ‘तुफान विनोदी’ अशी बिरुदावली मागं लागल्यानं महाराज अंमळ खुशीतच असतात अलीकडं. विठोबाचं नामस्मरण करताना कीर्तनात चुकीचा शब्द गेला. महाराज कानाला हात लावायचे आणि मग फिस्सकन हसायचे. त्यांचं हसणं पाहून मग मृदंग वाजायचा. टाळकरी हळूच टुणकन उडी मारून पावली घालून दाखवायचे आणि महाराज पुन्हा ‘समे’वर यायचे. ग्रामीण भागातील बापाच्या इज्जतीला पोरींनी कसं जपावं हे सांगताना आपण ‘समे’वर यायला चुकलो, हे महाराजांना कळलं. त्यांनी जीभ चावली. हात कानाला लावले, पण लोक हसलेच.

आंबा खाल्ल्याने पुरुषार्थ वाढतो असं अगाध ज्ञान पूर्वी सांगलीत काम करणाऱ्या एका ‘गुरुजीं’नी दिलं होतं. तो उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाशीचा आंबा भलता भारी, पुरुषार्थ वाढविणारा होता म्हणे. तसं सम-विषम संख्येचं ज्ञान फार तर रतन खत्रीच्या मटक्यापुरतं शोधणारा समाजही गर्दी करून कीर्तनाला येत असल्यानं चांगल्या-वाईटाचं ज्ञान करून देण्याचा विडा उचलत महाराजांनी कीर्तनाचा फड रंगवला. तसं टिकटॉक पद्धतीचं कीर्तन पांडुरंगचरणी ठेवत त्यांनी ‘मूल’मंत्र दिला- ‘ये, पोरहो शिकले की नाय कधी?- मोबाइल ठिवा बाजूला. सम- विषम काय कळतं का तुमाली? आरं तुजी गाडी कधी रांकेला लागणार? मोबाइलवर पबजी खेळून काय हाशील? आई-बाप म्हातारी झाली. थकली बिचारी. त्यांच्याकडं लक्ष द्या. आता दुसऱ्याच्या गाडीला हात दाखवून जाणारा तू, पण थाटात लगीन लावलं तुजं. म्हातारी बघत्येती, आता येईल वंशाचा दिवा. लई घोळय राव तुमच्यात. आरं, समेला पोरगं आणि विषमला  पोरगी.’ महाराजांनी जीभ चावली. फिस्सकन हसले. सम- विषमचं अल्पज्ञान असणारं पब्लिकही हसलं. पांडुरंगाची माफी मागून प्रबोधनाचा नवा अध्याय महाराजांनी सुरू केला. तसं महाराज कीर्तनाला विषय बरीक भारी निवडायचे.  प्रबोधन करायचं तर सम-विषम कळायला हवं, असं दिल्लीच्या राज्यकर्त्यांलाही कळलं होतं. ते सम-विषमही बरंच गाजलं. आता ‘या’ सम-विषमचे दिवस आले आहेत. पण ‘मूल’ मंत्र सर्वानी ऐका. कोणी-कोणी? टाळकरी, माळकरी, टिळेकरी, वीणेकरी, भालदार, चोपदार, दिंडय़ा काढणारे, एका दिंडय़ाचे दोन-दोन दिंडय़ा करणारे, मोक्कार (भरमसाट) दिंडय़ा काढणारे, काशीला जाणारे, बायकोला घाबरणारे (यात सगळे आले) म्हणून  सगळ्यांनी ऐका. जे ‘गुरुजींचा आंबा’  विसरले ते हरले. त्यांचा पुरुषार्थ पत्रके वाटण्यापुरताच. त्यामुळं किमान आकडय़ांमधला सम-विषमचा भाग तरी लक्षात ठेवा. पोरा-पोरींचं लक्ष मोबाइलमधून काढा आणि आकडय़ांवर आणा. त्याच्याशिवाय लोकसंख्येचा आकडा काही वाढायचा नाही. खरं तर आकडय़ांचा हा संग निर्थक असला तरी महाराजांनी सांगितलंय, एवढं तरी लक्षात ठेवा आणि घ्या देवाचं नाव!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 1:07 am

Web Title: article about indurikar maharaj statement on girl and boy birth zws 70
Next Stories
1 चिंतनाचे सार..
2 ‘दंडबंधना’च्या उकलतां गाठी..
3 ‘लोकनेत्यां’ची सुरक्षा..
Just Now!
X