सकाळी नेहमीप्रमाणे अंगाला आळोखेपिळोखे देत चिंतू उठला, आणि लांबलचक जांभई देत तो पलंगावरून उतरला. ती चिंतूची सवयच होती. समोरच्याच भिंतीवर रांगेने त्याने देवाच्या प्रतिमा टांगून ठेवल्या होत्या. सकाळी झोपेतून उठल्यावर, त्या दिवशीचा वार आठवण्यासाठी चिंतूला नेहमीच मिनिटभर विचार करायला लागायचा. तसा त्याने आजही केला, आणि त्याला आठवले. आज शनिवार. ताबडतोब तो हनुमानाच्या तसबिरीसमोर उभा राहिला. बाकीच्या तसबिरींमधले सहा देव प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे पाहत आहेत असा त्याला भासही झाला. तसे फक्त शनिवारीच होत असे. कारण मारुतीच्या फोटोतला चेहरा काहीसा रागीटच होता. क्रुद्ध नजरेने रावणासमोर उभे राहून छाती फाडून दाखविणाऱ्या हनुमानाविषयी चिंतूच्या मनात नेहमीच एक भक्तीयुक्त आदर होता. त्याला कारणही तसेच होते. त्या भिंतीवर रामाची तसबीरच नव्हती. रामाचा वार कोणता ते त्याला माहीतच नव्हते. अनेक जाणकारांकडे चौकशी करूनही त्याला त्याचे उत्तरही सापडले नव्हते. अखेर एका जाणकाराने सल्ला दिला. ‘छाती फाडून रामदर्शन घडविणाऱ्या मारुतीचा फोटो लावलास की रामाचा फोटो आपोआपच दिसेल!’ चिंतूला ती कल्पना कमालीची आवडली व लगेचच त्याने तसा फोटो लावला. पण आज त्या फोटोकडे पाहताना त्याला कसेसेच होत होते. हा हनुमान कुणी वेगळाच असावा असेही त्याला वाटत होते. त्याच्या क्रुद्ध चेहऱ्याकडे पाहताना थोडी भीतीही वाटली, म्हणून त्याने आज नमस्कार करताना डोळे मिटले. काही वेळानंतर त्याने डोळे उघडले, तेव्हा हनुमानाच्या छातीतून राम-सीता प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे पाहत आहेत असे चिंतूला वाटले. मग त्याने भिंतीवरील सर्वच देवांच्या फोटोकडे कटाक्ष टाकला. सारे जण आपल्याकडेच पाहत प्रसन्नपणे हसत आहेत असा भास चिंतूला झाला. पण लगेचच त्याचे डोळे उघडले. इतर दिवशी, त्या वाराच्या देवाशिवाय आपण कुणाकडे बघतही नाही हे त्याच्या लक्षात आले. तो स्वत:शीच हसला. त्याने पुन्हा हनुमानाच्या चेहऱ्यावर नजर स्थिर केली. क्रुद्ध चेहऱ्यातही एक मिश्कील भाव दडलाय असे त्याला वाटले आणि चिंतूने हनुमानास मनोमन नमस्कार केला. तो वेगळाच कुणी आहे अशी मघाशी आलेली शंका त्याने पुसून टाकली. कालची आदित्यनाथांची बातमी वाचायलाच नको होती, असेही त्याला वाटले. आदित्यनाथांनी नवाच वाद उभा केला होता. रामाचा भक्त असलेला हनुमान दलित होता, की आदिवासी होता यावरून आणि हनुमानाच्या जात आणि गोत्रावरून राजकारण पेटणार अशी भीती चिंतूला वाटू लागली. त्याने हनुमानाच्या फोटोकडे लक्षपूर्वक पाहिले. तो मिश्कीलपणे हसतोय याची त्याला खात्रीच झाली. बाकीच्या फोटोतले देवही मिश्कीलपणे हसतायत असे वाटल्याने चिंतूच्या मनावरचे चिंतेचे ओझे उतरले. आजची शनिवारची सुट्टी मजेत घालवायची असेही त्याने ठरविले, आणि, यापुढे राजकारणातल्या नेत्यांची देव-धर्म, जात-गोत्र याविषयीची मते मानायची नाहीत असे चिंतूने ठरविले. आन्हिके आटोपून चिंतू खाली उतरला. फुलवाल्याकडून दहा रुपयांचा रुईचा हार आणून त्याने हनुमानाच्या तसबिरीवर चढविला आणि पुन्हा नमस्कार केला. आता त्याला खूपच ताजेतवाने वाटत होते!