‘रेल्वे अपघात’ हे दोन शब्द दसऱ्यापासून जणू अमृतसरलाच स्थायिक झालेत. आमच्या राणीला अपघात झाला, तर कुणाचं लक्षच नाही. ही राणी रायगड जिल्ह्य़ातली, माथेरानची. महाराष्ट्रातली थंड हवेची ठिकाणं म्हणवणाऱ्या महाबळेश्वर, चिखलदरा, सापुतारा.. अशा कोणत्याच ठिकाणी नसलेलं एक वैशिष्टय़ माथेरानला आहे. आदमजी पीरभॉय यांनी दिलेल्या १६ लाख रुपयांतून, त्यांचे सुपुत्र अब्दुलहुसेन पीरभॉय यांनी नेरळ ते माथेरान अशी रेल्वेसेवा सुरू केली, त्याला २००७ सालीच शंभर वर्षे पूर्ण झाली. अर्थात एवढय़ा काळात या गाडीचे रूळ बदलले, १९८३ पासून वाफेची इंजिनंही निवृत्त होऊन डिझेल इंजिनं आली आणि डबेही बदलत जाऊन अखेर अलीकडेच, ‘वातानुकूल डबाही जोडला जाणार’ अशा बातम्या आल्या. त्या बातम्यांनी लावलेली सुखाच्या प्रवासाची आशा रविवारी भेलकांडून गेली.. पावसाळ्यानंतर कशीबशी अमन लॉज ते माथेरान एवढय़ाच प्रवासापुरती पुन्हा सुरू झालेली माथेरानची राणी, पहिल्याच रविवारी रुळांवरून घसरली. डब्यातले सुमारे ३० प्रवासी बचावले. अमन लॉज ते माथेरान मार्गात दरीजवळचं वळण एकच आहे; पण नेरळ ते माथेरान प्रवासात, जुम्मापट्टीनंतर सतत दरीला खेटून राणी जात असते.. त्यापैकी एखाद्या वळणावर हे झालं असतं तर?

माथेरानच्या राणीला रुसण्याची सवयच लागली आहे, तिचं वय ९८ होतं तेव्हापासून. सन २००५ सालचा ‘२६ जुलै’चा प्रलय मुंबईकरांसाठी जेवढा भीषण होता, त्याहून अधिक रायगड जिल्ह्य़ातलं त्याचं तांडव होतं. माथेरानच्या राणीचे रूळ जागोजागी उखडले, डोंगरच खचल्यानं रुळांखालची जमीन धुपून गेली. तेव्हापासून राणी आजारीच असते. शंभरीनंतर तर तिनं नेरळपर्यंत पूर्ण २१ किलोमीटरच्या प्रवासाचा धसकाच घेतलाय. हिंडणंफिरणं बंद झालेल्या आजीबाईसारखी भासते ती. कहर म्हणून २०१६ साली ती दोनदा घसरली. त्यानंतर मात्र रेल्वेनं तिचा कायाकल्प करायचं ठरवलं.

मग गेल्या सहा महिन्यांत या कायाकल्पाच्या बातम्या येऊ लागल्या. म्हणे राणीसाठी तीन-तीन नवी इंजिनं आणणार, एका वातानुकूल डब्यासाठी नवं इंजिन लागणार, डबे पारदर्शक- म्हणजे फक्त मोठय़ा खिडक्यांचे नव्हे, छप्परसुद्धा काचेचं असलेलं होणार.. असं बरंच काही काही.

यातली एकही बातमी, राणीचे रूळ पक्के करण्याबद्दल नव्हती. राणीच्या सुरक्षेसाठी नेमकी काय काय व्यवस्था आहे, याबद्दल नव्हती.

पण त्याचं काय एवढं? डबे झकपक असले की झालं! आणि इंजिनंही आली ना.. वातानुकूल डबा नाही आला, पण तोही येईलच ना..

तरीही राणी रुसली. ती जुन्या वळणाची. सगळं तिला जागच्या जागी हवं. दासदासी एकनिष्ठ नाहीत अशी शंका जरी आली तरी राण्या रुसतात. तशीच ही. तोलामोलाचंच हवं तिला सगळं.

यावर एक स्वप्नाळू उपाय म्हणजे प्रवाशांनीच आता समजूत काढावी राणीची. म्हणावं, अगं राणी, कशाला एवढी रुसतेस.. आम्हाला सवय आहे पूर्ण न झालेल्या आश्वासनांची, न मिळालेल्या निधीची आणि अर्धवट कामांमुळे वाढलेल्या धोक्याचीसुद्धा.. तशी सवय आता राणीनंदेखील करून घ्यावी, हेच बरं!