काय आज खुशीत? आणि इंग्लिश पेपर का?

पवळ्याच्या या प्रश्नांकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष न करता ढवळ्या म्हणाला, ‘हो ना.. न्याहारीपेक्षा वाचनामुळे खुशीत आहे..’ काय वाचत होता ढवळ्या, म्हणून पवळ्या कुतूहलाने जवळ  येऊ लागला. आता हा नक्की खाण्यातही तोंड घालणार, हे जणू ओळखून ढवळ्याही थोडा चालत ढवळय़ाकडे आला. ‘या पाहा, तमाम गोवंशाला अभिमान वाटेल अशा दोन बातम्या..  आपल्याला जे दत्तक घेतील, त्यांचा राजस्थान सरकार सत्कार करणार १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला. दुसरी बातमी.. आपल्या माताभगिनींची हत्या हा आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारा विषय ठरलाय!’

‘हँ: ती बुलंदशहरची बातमी ना? मराठीत वाचली मी ती! तिथे पोलीस निरीक्षकाला जिवे ठार मारलं ना, म्हणून राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला तीच बातमी ना?’ हे विचारणाऱ्या पवळ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून ढवळ्या प्रतिप्रश्नांची सरबत्ती करू लागला, ‘बुलंदशहरातला जमाव पोलीस ठाण्यावर चाल करून का गेला? तर गोवंश हत्या झाल्यामुळे. मग त्या जमावाने किती माणसं मारली ही पुढली गोष्ट. पण मुळात गोहत्या झालीच नसती तर? तर पुढला प्रसंग टळलाच असता की नाही?’

पवळ्या एव्हाना पुरेसा गोंधळल्याची खात्री करून घेऊन ढवळ्या पुढे म्हणाला, ‘म्हणजे गोवंश हत्या करणाऱ्यांनीच राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आणली. माणसं भले दुसऱ्या कुणी मारली असतील, त्यासाठी निराळ्या ३५ जणांवर छोटेमोठे गुन्हे दाखल झाले आहेतच.. पण ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’? तो फक्त आणि फक्त, गोवंश हत्या करणाऱ्याच तिघांना लावला गेलाय!’

ढवळ्याच्या या आनंदाला टाचणी कशी लावावी, हे पवळ्याला सुचेना. तो फुरफुरू लागला, ‘पण ती राजस्थानची बातमी जुनी आहे.’

‘जुनी म्हणजे कालची ना?’ ढवळ्याचा सूर चढाच होता.. ‘अरे पवळोबा, काल राजस्थानात झालं, ते आज ना उद्या आपल्या महाराष्ट्रात होईलच की नाही? सरकार कोणाचंही असो..’

नेहमीच, नेहमीच आपल्याला ढवळ्याच्या युक्तिवादांपुढे शेपूट पाडावी लागते, याचा विषाद पवळ्याच्या अंगांगांत दाटून आला.  ढवळ्याशी बोलण्यात अर्थच नसतो, असं पवळ्या अगणिताव्यांदा ठरवणार; इतक्यात समोरच डबक्यात बसलेला जानू आपल्या काळ्या अंगाला लागलेला चिखल शेपटीनं सावरत, दात विचकत म्हणाला, ‘ओ ढौळ्याभौ, काहून खूष व्हायले? चाराछावण्या झाल्या काय सुरू.. तठे आमाले यन्ट्रीच नाई, तुमाले यंदा छावणीच नाई, खावा पेपरच खावा..’