शनिवार असल्याने बंटी अंमळ उशिराच उठला. गेल्याच आठवडय़ात आठव्या बर्थडेची पार्टी झाल्यापासून, आपण आता मोठे झालो आहोत, असं बंटीला वाटत होतं. आज उठल्याबरोबर बंटी भिंतीकडे गेला आणि कालनिर्णयच्या तारखेवर बोट ठेवून हिशेब करू लागला. आज-उद्या सुट्टीच आहे. परवा एक दिवस दांडी मारली, तर पुन्हा बुधवारी सुट्टी.. बंटीने चुटकी वाजवत डॅडीकडे पाहिलं. डॅडीनं बंटीची ‘मन की बात’ लगेच ओळखली. बर्थडे झाल्यावर दोन-चार दिवस लाँग ड्राइव्हला जायचं, असं त्यानं प्रॉमिस केलं होतं. वर्तमानपत्र बाजूला ठेवून तो निमूटपणे तयारीला लागला. तीन-चार दिवसांच्या प्रवासाचं सामान गोळा केलं. सनग्लासेस, शाल, स्वेटर, छत्री, रेनी शूज, चप्पल.. सगळं बॅगेत भरून झालं. बंटी हे अचंब्याने पाहात होता. सामान भरलं, तो डॅडीसोबत गाडीत बसला आणि दोघं लाँग ड्राइव्हसाठी मुंबईबाहेर पडले. सकाळ असूनही कमालीचं उकडत होतं. डॅडनं गाडीचा एसी फुल्ल केला. ट्रॅफिकमधून कसेबसे बाहेर पडून गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. पुणं जवळ आल्यावर डॅडने बॅगेतून स्वेटर काढले. बंटीचा स्वेटर त्याच्या हातात दिला. नोव्हेंबर आला की पुण्यात थंडी असतेच, असं डॅडनं सांगितलेलं आठवून बंटीनं अंगावर स्वेटर चढवला. गाडी पुण्यात पोहोचली आणि खरंच, हिवाळा सुरू झाला असं बंटीला वाटू लागलं. डॅडला मस्त मूड लागला होता. ‘‘अजून पुढे जाऊ या..’’ तो बंटीला म्हणाला आणि बंटी हरखला. आता डॅड कोल्हापूरकडे निघाला होता. अचानक दोन-तीन तासांत आकाशात ढग जमा झाले. वाराही सुटला आणि जोरदार पावसाचा मारा सुरू झाला. वाटेत थांबून चहा घेऊ, असे सांगून बंटीच्या डॅडने छत्री बाहेर काढली. गाडी थांबली आणि एकाच छत्रीतून ते बाहेर पडले. उभाआडवा कोसळणाऱ्या पावसाने छत्री असूनही दोघांना चिंब केले होते, पण मजा आली. बंटी खूश झाला.. चहा घेऊन डॅडने गाडी सुरू केली. कोल्हापूर गाठेपर्यंत पावसाची भुरभुर सुरूच होती. कोल्हापूरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कोकणात जायचं, असं डॅडनं सांगितल्याने बंटी जाम खूश होता. सकाळी उठून तो तयार झाला आणि गाडी कोकणाकडे निघाली. हवेत मस्त गारवा होता. कालच्या पावसामुळे सगळी हिरवाई आणखी चकचकीत दिसत होती. गाडीने घाट ओलांडून कोकणात प्रवेश केला. आता कमालीचं उकडत होतं.. बंटीने स्वेटर काढून टाकला             आणि सनग्लासेस चढवून तो बाहेर पाहू लागला.. काही वेळ तसाच गेला आणि अचानक पुन्हा आभाळ भरून आलं.. बघताबघता पावसाने झोडपायला सुरुवात केली.. बंटी वेगळाच   विचार करीत होता. ‘‘डॅड, तुझं वय काय?’’ अचानक बंटीनं विचारलं. डॅड हसून ‘४०’ म्हणाला. मग बंटीनं आकडेमोड केली. ‘‘म्हणजे तू एक्केचाळीस पावसाळे बघितलेस.. माझं वय आठ, म्हणजे मी नऊ पावसाळे, नऊ हिवाळे आणि नऊ उन्हाळे बघितलेत!’’.. बंटी काय म्हणतोय हे ओळखून डॅडला हसू आलं. ‘‘बंटी, हा पावसाळा नाही. हा नवा, चौथा ऋतू आहे.. याला हिवसाळा किंवा अवकाळा म्हणायचं!’’.. डॅड म्हणाला आणि दोघंही खदखदून हसले. गाडी पुढे जात होती. आता  दहा-पंधरा मलांवर कोणता ऋतू भेटेल याची बंटीला उत्सुकता होती..