06 March 2021

News Flash

या ‘डोळ्या’चे एक पाखरू..

सऱ्या डोळ्याचे पाखरू गुन्हेगाराभोवती फिरत राहील आणि त्याची नजर जेथपर्यंत पोहोचते तेथवर पाठलागही करत राहील

 

जुनाट रोगावरचा जालीम इलाज सापडल्यावर जो आनंद आजारी माणसाला होतो तशाच आनंदाच्या उकळ्यांनी सध्या समाजमन उचंबळू लागले असावे असा आभास होण्याचे दिवस आता सुरू झाले आहेत. याआधी कधी कोणत्याही गुन्ह्य़ाची उकल करायची म्हणजे पोलीस दलास कोण यातायात करावी लागायची! त्यातून एखादा गुन्ह्य़ाचा गुंता सोडविला की, लगेच स्कॉटलंड यार्डाच्या रांगेत बसवून आपणही पोलिसांची पाठ थोपटत असू. पण अलीकडे सगळीकडे नवतंत्राचा तिसरा डोळा जागृत झाल्यापासून तपासातला सारा थरार जणू संपतच चालला आहे. हा तिसरा डोळा म्हणजे जणू, शिवशंकराने नवसमाजास बहाल केलेले वरदान, असा विश्वास दिसून येतो आहे. हा डोळा गुन्हे शोधण्यापुरताच कामाचा ठरला आहे. गुन्हेगाराचा शोध आणि गुन्ह्य़ाची उकल या गुन्हे घडून गेल्यानंतरच्या प्रक्रियेत हा तिसरा डोळा -म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा- कामाचा ठरला; पण या डोळ्याला डोळा भिडवून गुन्हा करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजलही वाढू लागल्याने, गुन्हा घडूच नये यासाठी मात्र अजूनही हा डोळा मिणमिणताच राहिला आहे. तरीही या डोळ्याला काही तरी दिव्य दृष्टी आहे हे खरे! डान्स बारबंदी उठवल्यानंतरच्या नव्या धोरणातही सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर एवढी मोलाची कामगिरी सोपवण्याचे ठरले की, तमाम पोलीस ठाण्यातील रात्रपाळीच्या अंमलदारांची मने बसल्या जागीच मोहरू लागली. ‘लेडीज बारमध्ये अश्लीलता नाही’ याची खातरजमा हे सीसीटीव्ही करणार होते! चौकाचौकात सीसीटीव्ही, दुकानात सीसीटीव्ही, इमारतीत सीसीटीव्ही आणि आता न्यायालयाच्याच सूचनेप्रमाणे शाळाशाळांतही सीसीटीव्हीचा तिसरा डोळा नजर ठेवणार असल्याने, निसर्गाने दिलेल्या दोन डोळ्यांचे काम थोडे हलके होणार हे नक्की. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे योग्य स्थितीत चालू आहेत की नाही, याची काळजी घेण्याचा ताण मानवी डोळ्यांस पडेल, तेवढाच. पण सीसीटीव्ही कॅमेरा सुरू ठेवा आणि खुशाल निर्धास्त राहा, हा आजच्या काळाचा मंत्र आहे.. भले पोलिसांचा धाक उरलाच नसला तरी बेहत्तर. भररस्त्यात अतिप्रसंग घडताना समाजही सीसीटीव्हीसारखाच बघत राहतो हे खरे, पण लोक साक्षीदार म्हणून उभे राहण्यासही तयार होत नसताना सीसीटीव्ही मात्र पाठ फिरवत नाही हे अधिक खरे. गुन्हा घडून गेला की त्याची उकल करणे आता   केवळ एका क्लिकचे काम आहे. तिसऱ्या डोळ्याचे पाखरू गुन्हेगाराभोवती फिरत राहील आणि त्याची नजर जेथपर्यंत पोहोचते तेथवर पाठलागही करत राहील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 5:44 am

Web Title: article cctv cameras
Next Stories
1 भक्त असावा तर असा!
2 आत्मघातक आत्ममग्नता
3 एक अस्मितादर्शी थरारपट!
Just Now!
X