‘मित्रों, कल मेरी हेमंतजी से बात हो रही थी… आणि अचानक मला मी गुजरात कॅबिनेटमध्ये राबवलेल्या ‘शून्यप्रहर’ संकल्पनेची आठवण झाली. चला आज आपण ही संकल्पना इथेही राबवून पाहू या…’

मध्यवर्ती खुर्चीतून हे वाक्य ऐकताच उपस्थितांपैकी अनेक सहकाऱ्यांना भांबावल्यासारखे झाले. ते निमित्त साधून नितीनजींनी राजनाथजींकडे बघून डोळे मिचकावले. मग विश्वगुरूंनी सर्वात ज्येष्ठ असलेल्या सिंहांवर नजर रोखली. त्यासरशी तर्जनी व अंगठ्याचा प्रत्यंचा ताणून राजनाथ म्हणाले, ‘‘आपल्या सरकारची प्रतिमा अशी झाली आहे की केवळ दोघेच मिळून सारे निर्णय घेतात (हे ऐकताच दोघे एकमेकांकडे कटाक्ष टाकतात) इतरांना विचारात घेतले जात नाही. त्या विमानखरेदीत आपण आणखी पारदर्शी असायला हवे होते असे लोकांना वाटते. चीनवर आपण डावपेचात्मक यश मिळवले असले तरी प्रारंभीची निवेदने चुकली असे आजही अनेक जण बोलून दाखवतात.’’ ते थांबताच खुर्चीच स्वत:ला सावरून घेत नितीनजी बोलू लागले, ‘‘आपण विरोधकांना फारच कस्पटासमान वागवतो असा सार्वत्रिक समज आहे. विरोधी सरकारे असलेल्या राज्यांशी आकसाने वागण्याची काही गरज नाही. यात आपलेच नुकसान होते. लोकशाहीत सर्वांनाच संधी मिळत असते. त्याचा आपण आदर करत नाही असे आपल्याच परिवारातले लोक बोलून दाखवतात. निवडणुकीपुरते ठीक, पण सदासर्वकाळ सामाजिक दुभंग निर्माण करण्याने सरकारच्या प्रतिमेला तडा जात आहे. शेतकरी आंदोलन आपण योग्य प्रकारे हाताळले नाही.’’ हे ऐकताच तोमर पाण्याचा एक घोट घेत खाली मान घालून बोलू लागतात, ‘आपल्या सुधारणा चांगल्या होत्या, पण आंदोलन  नीट न हाताळल्यामुळे जगभर प्रतिमा खराब झाली. आंदोलनजीवी म्हणून खिल्ली उडवल्याने अनेक जण नाराज झाले. गैरसमजातून एक मोठा समूह आपल्यापासून दूर जाईल, अशी भीती आहेच’ दीर्घ श्वास घेऊन ते थांबताच वाद घालण्याच्या मुद्रेत रविशंकरजी सुरू होतात, ‘‘आधीचेही सरकार स्वायत्त संस्थांच्या कामात हस्तक्षेप करतच होते, पण आपण तो अधिक केला व त्यामुळे या संस्थांची व पर्यायाने सरकारची विश्वासार्हता कमी झाली असा समज आहे. संपूर्ण बहुमताचा गर्व आपण कायम बाळगत असतो व त्यातून हे घडते असेही लोक बोलून दाखवतात.’’ ते थांबताच निर्मलाताई एकेका शब्दावर भर देत सांगू लागतात, ‘आजही मला नोटाबंदीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रकरण आपण योग्यरीतीने हाताळले नाही अशी अनेकांची समजूत आहे. पीएफवरील व्याजदराच्या मुद्द्याचेसुद्धा तसेच झाले. सरकारच्या घोषणा जास्त व अंमलबजावणी कमी असेही अर्थविश्वात बोलले जाते.’ प्रतिमा डागाळण्याचा विषय असूनही उशिरा बोलायला मिळाले म्हणून काहीसे खट्टू झालेले प्रकाशजी वर्षभरात देशभर घेतलेल्या पत्रपरिषदांची संख्या सांगतात; पण मतप्रदर्शन करण्याचे टाळतात. मग घसा खाकरून डॉ. हर्षवर्धन  बोलण्यास सुरुवात करतात, ‘लसीकरणाचा मुद्दा…’  असे म्हणून पुन्हा खाकरण्यासाठी ते थांबतात तोच अमितजी म्हणतात, ‘‘गेल्या सात वर्षांपासून मी नकारात्मक असे काही ऐकलेच नाही, त्यामुळे तसे बोलण्याची माझी सवय तुटली आहे.’’

अखेर मध्यवर्ती खुर्चीवरून आवाज येतो… ‘मित्रो, मी सगळ्यांचे ऐकले. या प्रहरात लोकांचे समज तुम्ही सांगितलेत, पण स्वत:ची मते  शून्य! ही संकल्पना राज्यापुरती ठीक आहे. देशपातळीवर नाही असे आता माझे मत झाले आहे. त्यामुळे आपण भेटू पण शून्य प्रहराशिवाय. सबको नमस्कार!’