19 December 2018

News Flash

रावतेजींची गारपीट

आता अक्षरश: डोक्यावरून पाणी गेले आहे. कृतघ्नपणाची कमाल झाली आहे.

दिवाकर रावते, परिवहन मंत्री

आता अक्षरश: डोक्यावरून पाणी गेले आहे. कृतघ्नपणाची कमाल झाली आहे. हे कोण करीत आहे ते सगळेच जाणतात. परंतु आजवर कोणी त्याबाबत बोलत नव्हते. आता मात्र बोललेच पाहिजे. अन्यथा या राज्यातील हे तमाम शेतकरी उद्या मायबाप सरकारच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाहीत. आज त्यांनी आपले लाडके नेते मा. ना. दिवाकरराव रावते साहेबमजकूर यांच्यावर टीका सुरू केली आहे. तत्पूर्वी राज्यात ज्यांच्यामुळे जिकडेतिकडे कमलशेती फुलली असे महाकर्तबगार नेते मा. ना. रावसाहेबजी दानवे साहेबमजकूर यांच्याविरोधात रान पेटवले होते. आता साहेबांची वाणी म्हणजे कमलपुष्पाहून कोमल. तिच्यातून शिवीसुद्धा ओवी बनून बाहेर येते, ही त्यांची ख्याती. आणि तरीही त्यांच्याविरोधात कुभांड रचले गेले. आणि आता शेतकऱ्यांचे कैवारी, दिंडीभूषण रावतेसाहेब यांच्यावर एका शेतकऱ्याला अद्वातद्वा बोलल्याचा आरोप होत आहे. राज्यातील तद्दन लोकहितवादी सरकारमधील एका मंत्र्यावर असे आरोप करावेत या लाभार्थ्यांनी? किती कनवाळूपणे गेले होते ते त्या गारपीटग्रस्ताच्या सांत्वनासाठी. तेथे आडवा झालेला गहू पाहून दोन दिवस चपातीवर मन गेले नसेल त्यांचे. तर तेथे तो शेतकरी हंबरडाच फोडू लागला. कोणी तरी मंत्रीमहोदयांना थेट, नुकसानभरपाईचे पैसे आणलेत का म्हणून सवाल केला. अरे, ज्या शेतकऱ्यांसाठी या सरकारने एवढी मोठी पारदर्शक कर्जमाफी जाहीर केली, गेले सहा की आठ महिने ती कर्जमाफी दिलीच जात आहे, त्या सरकारला सवाल करता तुम्ही? किती कष्टाने अभ्यास करून आणली ती कर्जमाफी याचा त्या आळश्यांना पत्ता तरी आहे का? आता गारपिटीने पिके मातीमोल झाली हे खरे. सरकारला दु:ख आहे त्याचे. त्याबद्दल चार-दोन ट्विटसुद्धा करील सरकारचा आयटीसेल. पण ही गारपीट का सरकारने आणली? आता मंत्रालयातील साहेबलोक मागतात का सरकारकडे नुकसानभरपाई, की कामावर येताना पावसाने आमचे कपडे खराब झाले म्हणून? अखेर ज्याचे नुकसान त्यानेच सहन करायला हवे. पण नाही. या शेतकऱ्यांना काम करायला नको. मौजमजा करायला कर्ज काढतात.  काहींनी आपल्या मुलीबाळींची लग्ने लावून दिली आहेत. आता लग्नात पाचशे-पाचशेच्या भारी साडय़ा खरीदण्याची गरज आहे का त्यांना? पण सरकार देते ना कर्जमाफी? ती घ्या. नाही दिली, तर आत्महत्या करून सरकारला त्रास द्या. मंत्रालयात जाळ्या बसवण्याचा खर्च करायला लावा. या सगळ्यावर आता अंकुश ठेवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. या शेतकऱ्यांना खरे तर सेडिशनच लावण्याची गरज आहे. म्हणजे मग ते अशा कनवाळू सरकारविरोधात कटकारस्थाने करणार नाहीत. रावतेजी एवढी लाल दिव्याची गाडी घेऊन त्या शेतकऱ्याच्या बांधावर गेले. तर त्यांच्याकडेच शेतकरी नुकसानभरपाई मागतात. ती काय अशी तत्काळ देता येते का? मोठी लाइन असते त्याची. आधी आधीचे दुष्काळग्रस्त आहेत. मग बोंडअळीग्रस्त आहेत. मग कीडनाशकग्रस्त आहेत. आत्महत्याग्रस्त तर नेहमीचेच. हे झाल्यावर गारपीटग्रस्तांचा क्रमांक येणार. या सगळ्याचा अभ्यास सुरूच आहे. पण त्यांना घाई झालीय. पैसे आणलेत का म्हणतात. हे या राज्यात चालू देता कामा नये. रावतेसाहेबांनी त्या शेतकऱ्यावर चांगलीच रागपीट केली हे बरेच झाले. मंत्र्यांना काय मनिऑर्डर आणणारा पोस्टमन समजता काय? अखेर मंत्री म्हणजे राजा असतो, लोक हो, राजा! त्याच्याकडे याचना करावी अन् लाभार्थी बनावे!!

First Published on February 19, 2018 2:54 am

Web Title: article in marathi on diwakar raote