22 October 2019

News Flash

विठ्ठल बरवा.. आणि ‘बडवा’!

उत्पातांनी उभारलेले रखुमाईचे मंदिर आणि बडव्यांच्या कुळाचारपूर्तीसाठी त्यांनी उभारलेले खासगी विठ्ठल मंदिर हा काही संभ्रमाचा प्रश्नच नव्हे

(संग्रहित छायाचित्र)

पुंडलिकाच्या भेटीसाठी, भिवरेच्या काठी, अठ्ठावीस युगे कटेवर कर ठेवून विटेवर उभ्या असलेल्या ‘बरव्या’ विठ्ठलाला आता नवी गंमत पाहावयास मिळणार आहे. हा विठ्ठल, एरवीही, वेगवेगळ्या रूपाने भक्तांची कसोटी पाहातच असतो. ‘वारी वारी जन्म मरणाते वारी.. ’ म्हणत, वारावादळाची पर्वा न करता शेकडो मैल पावलाखाली तुडवत मुखाने हरिनामाचा गजर करीत चंद्रभागेतीरी वाळवंटावर पथारी पसरणाऱ्या आणि ‘पाहीन श्रीमुख आवडीने’ म्हणत, विठुरायाच्या दर्शनासाठी रांगा लावणाऱ्या, तुकोबारायाच्या कळसाला दुरूनच नमन करून धन्यभावाने स्वत:भोवती प्रदक्षिणा घालत पुण्यसंचय करणाऱ्या भोळ्या, गरीब भक्तांच्या नव्या कसोटीची आता वेळ आली, असा एक आभास उगाचच उभा राहिला आहे.. आता आषाढी कार्तिकीस भक्तजनांनी कोणत्या विठुरायाच्या दर्शनास जावयाचे, चंद्रभागेमध्ये स्नान करावयाचे, तर मग कोणत्या मंदिरदर्शनाने ‘मुक्तीचा सोहळा’ साजरा करावयाचा?.. कोणत्या पावलावर मस्तक ठेवायचे?.. कोणत्या माऊलीला आर्त साद घालायची, आणि कोणत्या मंदिराच्या पायरीला ‘नामदेवाची पायरी’ समजून त्यापुढे झुकायचे, ही नवीच समस्या उभी राहील, असे उगाचच अनेकांना वाटू लागले आहे. ‘बरव्या विठ्ठला’ने ‘बडव्या विठ्ठल’रूपात याच चंद्रभागेतीरी नवअवतार घेऊन भक्तांची कसोटी आरंभिली आहे, असेही काहींना वाटू लागले आहे. त्या, युगे अठ्ठावीस विटेवरी उभ्या असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या हजारीपार वयोमानाकडे झुकणाऱ्या मंदिरातील ‘नामदेवाची पायरी’ खरी, की बाबा बडव्यांच्या नावाने कालपरवा उभ्या राहिलेल्या नवमंदिरातील काँक्रीटची पायरी खरी, हा प्रश्न वारकरी भक्तास पडेल, असेही बोलले जाऊ लागले.. पण असेच घडेल असे अजिबातच नाही. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या वारीची परंपरा तहानभूक, वय-वृद्धत्व विसरून पुढे चालविणाऱ्या त्या भोळ्या भक्ताची विठु माउली त्याच, पुंडलिकाने दिलेल्या विटेवर, शेकडो वर्षांपासून धीरगंभीर मुद्रेने भक्तांसाठी काया शिणवीत उभी आहे. त्याच विटेचा स्पर्श कपाळी झाल्याने मोक्षप्राप्तीच्या परमानंदात ‘परतवारी’ सुरू करण्यापरता आनंद नाही, हे ज्या भक्तांना माहीत आहे, त्यांना या, बडव्यांनी उभारलेल्या नव्या विठुमंदिरापुढे हात जोडण्यात तसे काहीच गैर वाटणार नाही. कारण भागवत धर्माची तर ती शिकवणच आहे. पण ‘त्यांचा विठोबा’ मात्र, त्याच, जुन्याच मंदिरात आहे, हेही त्यांना नेमके ठावके असेल. आता बडव्यांनी उभारलेल्या नव्या मंदिरामुळे, पंढरीच्या वाटेवर, नित्यभेटीसाठी येणाऱ्या देव-सुरवरांनाही संभ्रम पडावा अशी परिस्थिती नव्या पंढरीत निर्माण होईल, आणि, कोठे जावे, कोणाच्या पायी मस्तक ठेवावे असा प्रश्न पुढे उभे असलेल्या गरुड हनुमंतासही पडेल, असा समज होण्याचेही काहीच कारण नाही. त्यांनी तर आपली उभी आयुष्ये त्याच, युगे अठ्ठावीस विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेली आहेत. उत्पातांनी उभारलेले रखुमाईचे मंदिर आणि बडव्यांच्या कुळाचारपूर्तीसाठी त्यांनी उभारलेले खासगी विठ्ठल मंदिर हा काही संभ्रमाचा प्रश्नच नव्हे. त्या मंदिरातील विठ्ठलासही ते नेमके ठावके असेल.. आपण भक्तांची परीक्षा पाहूच नये, असेही त्याने ठरविले असेल.

एक मात्र खरे, की, ‘ज्ञानदेवे रचिलेल्या’ पायावर भक्तिमार्गाचा ‘कळस’ होऊन उभ्या राहिलेल्या तुकोबारायाला पंढरपुरातील या ‘नव-द्वैतभावा’कडे पाहताना नेमके काय वाटत असेल, ते मात्र कोणासच सांगता येणार नाही. कदाचित, शेक्सपियरच्या भेटीत त्याने व्यक्त केलेल्या मनोगताचेच तो आज पुन्हा पारायण करत असेल..

‘विठ्ठल अट्टल,

त्याची रीत न्यारी,

माझी पाटी कोरी,

लिहोनिया!’

First Published on May 14, 2019 12:07 am

Web Title: article on another vitthal temple built in pandharpur