मन आनंदी असण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टींची गरज असते, हे जरी सापेक्ष असले, तरी सामाजिक स्तरावर पाहता, ज्या सर्वसाधारण स्थितीस आनंदी वा समाधानी जगणे म्हणता येईल, ती स्थिती आता महानगरी मुंबईच्या वाटय़ास आली आहे. असे कोण म्हणते असा प्रश्न पडणे साहजिक असले, तरी एक दिवसापूर्वीच्या बातम्या ज्या मुंबईकराने आस्थेने न्याहाळल्या असतील, त्यास त्याचे उत्तरही लगोलग मिळून गेले असेल. अर्थात, आहे त्यात समाधानी राहावे अशी शिकवणच तुम्हाआम्हास आपल्या पूर्वसुरींकडून मिळालेली आहे. म्हणून, आपल्या जीवनमानाचे मूल्यमापन जेव्हा कोणा परदेशीकडून केले जाते, तेव्हा ते अधिक निरपेक्ष आणि वस्तुनिष्ठच असते. तसेच झालेले असल्यामुळे मुंबईकर अगोदरच आनंदी ठरला असून आता त्या आनंदात भर पडण्याचे दिवस जवळ आले आहेत. मुंबई महापालिकेने मुंबईकरास अधिकाधिक आनंदाचे दिवस दाखविण्याचा विडा उचलला आहे. मुळात मुंबईकर हा अनंत यातना सोसूनही आनंदी कसा हा प्रश्न त्यासाठी काही वेळ बाजूला ठेवावा लागेल. समाधानाचे, आनंदी जीवनाचे जे मापदंड मुंबईसारख्या महानगराकरिता लावावयास हवेत, त्याचे केवळ स्वप्न पडणे हीदेखील भावी आनंदाची एक आगळी चुणूकच! अगोदरच मुंबईकराच्या जगण्यात अमाप आनंदाची कारंजी दररोज थुईथुई नाचत असताना, त्यावर कळस चढविणारी एक घटना अलीकडेच घडून गेली. ती म्हणजे, मुंबईकर- मुंबईत जन्मलेला- मुख्यमंत्री महाराष्ट्रास मिळाला. या घटनेमुळे मुंबईच्या आनंदी आयुष्याला एक अनोखी झालर लागली आहे. मुंबई शहराला आनंदी शहर बनविण्याची यापेक्षा वेगळी संधी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना याआधी कधीच प्राप्त झाली नव्हती. या घटनेमुळे अगोदरच आनंदी झालेल्या शहरास आता गतिमान प्रवास, शुद्ध पाणी, उत्तम शैक्षणिक सुविधा, निरोगी आरोग्यमान, हरित उद्याने, अशा पंचसूत्रीचे पाठबळ मिळणार, असा आयुक्तांचा दावा आहे. रोजगार व व्यवसायासाठी पोषक शहर अशी मुंबईची ओळख बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आयुक्तांनी महापालिकेतील नोकरभरती रोखल्याबद्दल मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या असल्या, तरी आनंदी शहरनिर्मितीचे हे स्वप्न दीर्घकालीन आहे, याची जाणीव ठेवल्यास, महापालिकेतील रोजगारसंधींना आयुक्तांनी वेसण घातल्याच्या वेदना महानगरातील रोजगारेच्छुकांस जरादेखील जाणवणार नाहीत. या सुविधा पुरविल्यास नागरिकांच्या आनंदाचा आलेख उंचावता येईल, असे आयुक्तांनी नमूद केल्यावर तर, ‘या सुविधा असल्यास आनंदाचा स्तर उंचावेल’ हे आयुक्तांनी कशाला सांगावयास हवे असे विचारही अनेकांच्या मनी अवतरले असतील.. पण मुंबईकर माणूस कोणत्याही त्रासातदेखील आनंद शोधत असतो. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलगाडीत बाकडय़ाचा कोपरा किंवा हातपाय हलविता येतील एवढी उभे राहण्याची जागा मिळाली तर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. अशा स्थितीत, सुखसुविधांचे निव्वळ स्वप्नदेखील त्याच्या मनावर आनंदाच्या गुलाबपाण्याचे शिंपण करणारे ठरेल यात शंका नाही. सध्या तरी, मुंबईचा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही एकच आनंदाची बाब मुंबईकरास पुरेशी आहे.