टीव्ही सुरू करताच तात्यांचे डोळे चमकले, पण लगेच चेहरा आंबट झाला.. कालपासून वाजत असलेली बातमीच ‘सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज’ म्हणून वाजत होती. तरीही त्यांनी टीव्ही बंद केलाच नाही. तात्यांनी चॅनेल बदलले. तिथेही तीच बातमी सुरू होती. तात्या वैतागले. टीव्ही बंद करून कामाला लागावे असा विचार करीत असतानाच आवाज आला, ‘कोठेही जाऊ नका!’.. तात्या चपापले. कसंनुसं हसत पुन्हा झोपाळ्यावर बैठक मारून तात्यांनी पुन्हा टीव्हीकडे नजर लावली. आता टीव्हीवर जाहिरात सुरू होती. ‘जाहिरातींच्या ब्रेकमुळे ब्रेकिंग न्यूज सहन तरी होतात’.. तात्या स्वत:शीच म्हणाले. तोवर निवेदिकेने नवी बातमी सुरू केली होती. ‘या ठिकाणी आमचे प्रतिनिधी हजर आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या’.. असे म्हणत तिने प्रतिनिधीशी संपर्क साधला.. ‘काय सांगशील, काय चालले आहे तिकडे?’.. निवेदिकेने थेट प्रश्न केला आणि पलीकडून प्रतिनिधी बोलू लागला, ‘नक्कीच, या ठिकाणी विरोधी पक्ष जो आहे त्याचे नेते जे आहेत ते दाखल झाले असून राज्यपाल जे आहेत त्यांची भेट घेण्यासाठी थोडय़ाच वेळात ते रवाना होतील अशी माहिती मिळत आहे.. आपण पाहू शकतो की साऱ्या नजरा राजभवन जे आहे तेथे खिळल्या असून, सरकार कोणाचे हे स्पष्ट होत नसले तरी तीन किंवा चार शक्यता ज्या आहेत त्या वर्तविल्या जात असून त्यापैकी काहीच घडले नाही तर नक्कीच राष्ट्रपती राजवटदेखील लागू होऊ शकते असे या ठिकाणी सूत्रांचे मत आहे. काय होते हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरेल!’.. नक्कीच काही तरी घडत असले पाहिजे, एवढा निष्कर्ष तात्यांनी काढला. पुन्हा निवेदिकेने सांगितले, ‘कुठेही जाऊ नका, पाहात रहा!’.. आता तात्या उत्सुकतेने चुळबुळ करत होते. जाहिरात संपली आणि तो आवाज घुमला, ‘सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज’.. निवेदिकेच्या आवाजातील उत्साह लपत नव्हता.. ‘सरकार स्थापनेच्या हालचाली ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या नावास सर्वाची मंजुरी मिळाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी आहे तिला उपमुख्यमंत्री पद देणार असल्याची माहिती जी आहे, ती मिळत आहे!’.. निवेदिकेने पुन्हा प्रतिनिधीशी संपर्क साधला होता. ‘काय सांगशील, काय सुरू आहे तिकडे?’.. तिने प्रतिनिधीस विचारले. ‘नक्कीच, आता पाहायला गेले तर असे दिसते की या ठिकाणी सरकार स्थापनेच्या हालचाली पूर्ण झाल्या असून पाठिंब्याचा फॅक्स जो आहे तो  राजभवनवर पोहोचला असल्याने सरकार स्थापनेची घोषणा होईल असे सूत्रांनी सांगितले आहे!’.. ‘धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल!’.. हलकेसे हसून निवेदिका म्हणाली.. तोवर नवी ब्रेकिंग न्यूज सुरू झाली होती. ‘सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजभवनावर फॅक्स जो आहे तो पोहोचला नसल्याने सरकार स्थापनेच्या हालचाली ज्या आहेत त्या थंडावल्या असून आता काय होते ते पाहाणे औचित्याचे असणार आहे!.. नेते जे आहेत ते चर्चा करणार असून तिढा जो आहे तो वाढलाच आहे’.. एवढे बोलून निवेदिकेने पुन्हा ब्रेक जाहीर केला.. ‘कुठेही जाऊ नका’ असेही तिने बजावले आणि तात्यांनी टीव्ही बंद करून टाकला!