‘आता काहीही झाले तरी आपल्याला आणखी सतरंज्यांची सोय करावी लागेल.. स्वयंसेवकांनी सतरंज्यांची शोधाशोध सुरू करावी. यापुढे सभांना गर्दी वाढणार, मातबर नेते पक्षात येत असल्याने त्यांच्या साथीदारांचा, अनुयायांचा आणि समर्थकांचा सन्मान राखला गेला पाहिजे. सभेच्या मंचाची लांबीरुंदीही वाढविली पाहिजे. कोणीही नाराज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.. प्रत्येक वक्ता भाषण सुरू करण्याआधी मंचावरील प्रत्येक नेत्याचे नाव घेईल याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मंचावरील मान्यवरांची यादी तयार करून ती माईकसमोर ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. नव्याने पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचा फोटो बॅनर, पोस्टरवर छापला जायलाच हवा. ती त्यांची मूळ संस्कृती आहे, आणि ते आपल्या पक्षात आले असल्याने त्यांच्या मूळ संस्कृतीचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.. कारण पक्षात दाखल होणाऱ्या प्रत्येकासच, त्याच्या घराण्याची थोर राजकीय परंपरा आहे. त्यांच्या पूर्वजांनीच त्यांच्या मूळ राकीय संस्कृतीची जडणघडणही केली आहे. त्यामुळे, त्या घराण्यांची राजकीय प्रतिष्ठा सांभाळणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पाहुण्यांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, हे विसरू नका.. आपल्या पक्षाचे भवितव्यदेखील त्यांच्याच हाती असणार हे आता स्पष्ट झालेले असल्याने व हे नेतेच आपल्या पक्षाचे उद्याचे आधारस्तंभ असल्याने, मूळ कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी विनम्रतेने वागावे.’

..कार्यकर्त्यांच्या बठकीत प्रचारप्रमुखाचे भाषण सुरू होते, आणि मोरू उगीचच चुळबुळ करत होता. सतरंज्या अंथरण्याच्या आपल्या अनुभवाची आता खरी कसोटी आहे, असे त्याने स्वतस मनाशीच बजावले, आणि शेजारी बसलेल्या पन्नाप्रमुखांकडे पाहिले. त्यांच्याही मनात बहुधा तोच विचार सुरू असावा. सगळ्यांनी नजरेनेच एकमेकांशी सहमती दर्शविली. पलीकडच्या रांगेतला एक कार्यकर्ता मात्र, अस्वस्थ दिसत होता. नव्याने पक्षात आलेल्या मातबरांमुळे पक्षाची ताकद किती वाढली, असा बंडखोर विचार त्याच्या मनात घोळत असावा, हे मोरूने ओळखले. हा कार्यकर्ता मातृसंस्थेचा निष्ठावंत असला तरी भलताच शंकेखोर असून, पक्षात दाखल होणाऱ्या मातबरांच्या हेतूबद्दल संशय व्यक्त करत असतो, हे मोरूला माहीत होते. तसा संशय मोरूच्याही मनात अधूनमधून येई. आपण खरोखरीच पक्ष वाढवतोय, की आपल्या पक्षाच्या मुखवटय़ाआडून ते सारे जण आपला मूळ पक्ष वाढवताहेत, असे कधी कधी मोरूच्याही मनात येई. पण पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिलेल्या घोषणेनुसार, काँग्रेसमुक्तीच्या प्रक्रियेचाच भाग असलेला कार्यक्रम पक्ष राबवत आहे, अशी स्वतचीच समजूत घालून मोरू गप्प बसत असे. काहीही झाले तरी आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकत्रे असून मातृसंस्थेच्या आदेशाविरोधात ब्रदेखील काढावयाचा नाही, असा मोरूचा निर्धार होता. त्याने काहीसे रागानेच तिसऱ्या रागेतील त्या शंकेखोर कार्यकर्त्यांकडे कटाक्ष टाकला..

नेमकी त्याच वेळी त्या कार्यकर्त्यांची अन् मोरूची नजरानजर झाली, आणि ‘या हृदयीचे त्या हृदयी’ झाले.. नव्याने दाखल झालेल्या मातबरांच्या मुखवटय़ाआड काही तरी

कट तर नाही ना, अशी शंका मोरूलाही येऊ लागली. त्याने अस्वस्थपणे एका मातबराच्या पक्षप्रवेशाची जुनी व्हिडीओ क्लिप उघडली. मुख्यमंत्री जातीने त्या नव्या मान्यवराच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन त्याचा हात उचलून उंचावत असल्याचे पाहून मोरूच्या मनातील शंका फिटली, आणि काँग्रेसमुक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी तिसऱ्या रांगेतील कार्यकर्त्यांस नजरेने दटावून मोरूही गप्प बसला..