जेमतेम ५२ जागांवर विजय मिळविणाऱ्या काँग्रेसने आपला पराभव खरोखरीच मनावर घेतला आहे. पराजयानंतर आत्मचिंतन करणे ही एक प्रथा असते. काँग्रेसने ती गांभीर्याने सुरू केली आहे. या आत्मचिंतनामुळेच, माध्यमांपासून दूर राहणे सध्या श्रेयस्कर असल्याचा साक्षात्कार काँग्रेसला झाला. हे निवडणुकोत्तर शहाणपण असले, तरी अद्याप उशीर झालेला नाही. आपण पुन्हा हिमतीने उभे राहू ही उमेद प्रत्येक काँग्रेसजनांच्या मनाच्या तळाशी जागृत आहे, याचे कौतुकच केले पाहिजे. येत्या महिनाभरात काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी कोणताही प्रवक्ता माध्यमांसमोर जाणार नाही. सध्या माध्यमांद्वारे समाजासमोर मांडण्यासाठी काँग्रेसकडे बाजूच नाही का, असा प्रश्न पडणे साहजिकच असले, तरी ते तितके खरे मात्र नाही. कारण, माध्यमांच्या माध्यमातून समाजासमोर कोणती बाजू मांडावयाची हे निश्चित करण्यासाठी आत्मचिंतन गरजेचेच असते आणि सध्या त्याचीच मोठी गरज असल्याने त्याकरिता माध्यमांपासून दूर राहणे हीदेखील एक गरजच असते. निवडणुकीच्या काळात माध्यमांचा वापर करण्यात झालेल्या चुकांचा पाढा वाचणे हादेखील या आत्मचिंतनाचा एक भाग असू शकतो. कदाचित त्यामुळेच, दिव्या स्पंदना या धडाडीच्या काँग्रेसी समाजमाध्यमकर्मी कार्यकर्तीनेदेखील ट्विटरसारख्या माध्यमापासून संन्यास घेतला आहे.

काँग्रेसला समाजमाध्यमांतून चर्चेत ठेवण्यासाठी दिव्या स्पंदनाच्या ट्विप्पण्यांनी निवडणूकपूर्व काळात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण निकालानंतर काँग्रेसच्या पदरी जो जनादेश पडला, तो पाहता, दिव्याची भूमिका महत्त्वाची असली तरी मोलाची होती किंवा नाही याची शहानिशा करणे आता काँग्रेसला किंवा खुद्द दिव्या स्पंदना यांनाही गरजेचे वाटले असावे. ज्या माध्यमातून दिव्या स्पंदना यांनी काँग्रेसी स्पंदने समाजासमोर मांडली त्याच माध्यमाचा वापर करून त्यांनी निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रिपद मिळाल्याबद्दल आनंद आणि कौतुकही व्यक्त केले, हा केवळ कालपरत्वे निर्माण झालेला योगायोग मानला तरी राजकारणात त्याचे वेगवेगळे अर्थ लावण्याची स्पर्धा नेहमीच सुरू असते. याच नोंदीनंतर दिव्या स्पंदना यांनी ट्विटरपासून फारकत घेणे आणि त्याच काळात, काँग्रेसने तमाम माध्यमांपासून तात्पुरते दूर राहण्याचा निर्णय घेणे या निव्वळ योगायोगाने एकाच वेळी घडलेल्या गोष्टी असाव्यात. निवडणुकीच्या काळात, माध्यमांवर व समाजमाध्यमांवर काँग्रेसची जी फळी जोमाने कार्यरत होती, त्यामध्ये दिव्या स्पंदना आघाडीवर होत्याच. पण अनेक वाचावीरांची फळी काँग्रेसतर्फे माध्यमांना मसाला पुरविण्यात अग्रेसर होती. निवडणूक निकालांनंतर दारुण पराभवाची मीमांसा करणे भाग असल्याने त्या नेत्यांना माध्यमांपासून तात्पुरते दूर राहावेच लागेल. त्यालाच पक्षशिस्त म्हणतात. दिव्याने स्वत:हून ती पाळली की तिला शिस्तीचा बडगा दाखविला गेला ते कळावयास मार्ग नाही. मात्र, समाजमाध्यमांवरून तिचे दूर होणे हा चर्चेचा विषय व्हावा हेच तिच्या त्या वेळच्या कामगिरीचे फळ आहे. काँग्रेसची अशी फळी माध्यमे किंवा समाजमाध्यमांपासून काही काळ किंवा कायमची दूर राहिली, तर त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होणार की भाजपचे यावर आता समाजमाध्यमांवर खल सुरू होणे अपरिहार्य आहे. प्रचारकाळात काँग्रेसच्या याच फळीने भाजपला हात दिला असा सूर आता समाजमाध्यमांवर उमटू लागला आहे. त्यामुळे चिंतन तर होणारच! तोवर मुखाला आणि मनालाही वेसण बसणार असल्याने, मनातील वैचारिक स्पंदनांना बांध घालून गप्प राहणे किती अवघड जाणार याची कल्पनादेखील करणे अवघडच आहे..