News Flash

करोना आणि करुण विनोद..

गेल्या चार वर्षांत ट्रम्प यांनी ‘अमेरिकेला प्राधान्य’ देण्याच्या नादात अमेरिकेला एकाकी करून सोडले.

संग्रहित छायाचित्र

२२ जानेवारी २०२० रोजी करोना विषाणूविषयी जाहीरपणे भाष्य करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, ‘‘एव्हरीथिंग अंडर कंट्रोल. हा तर सामान्य फ्लू आहे.’’ त्याच्या काही दिवस आधीच या विषयावर त्यांचे मत जरा वेगळे होते. त्यावेळी करोना विषाणू म्हणजे ‘डेमोक्रॅट्स मंडळींनी निष्कारण उभा केलेला भयसूचक बागुलबुवा’ होता. ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली; पण ती अमेरिकेत शे-दोनशे करोनाबळी गेल्यानंतर! अमेरिकेवरल्या या संकटाबद्दल कोणाला तरी जबाबदार धरायला पाहिजेच ना? त्यांच्या डोक्यात लख्ख टय़ूब पेटली. अरे हा तर चिनी विषाणू. ते नाही का सतत आपल्याकडून सवलती पदरात पाडून घेत. लुच्चे लेकाचे. आता थेट विषाणूच पाठवतात म्हणजे काय? ही जरा गंमतच होती. कारण ३१ जानेवारी रोजी याच ट्रम्पनी फुशारकी मारली होती- ‘‘चीनमधून विषाणूला युरोपमार्गे अमेरिकेत येण्यापासून आम्ही रोखले आहे! ’’ श्वसनयंत्रणेवर हल्ला करणाऱ्या या विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी आरोग्य व्यवस्थेला मोठय़ा प्रमाणात कृत्रिम श्वसनयंत्रांची (व्हेंटिलेटर्स) गरज पडणार आहे. त्यावर अशी काही गरज नाही आणि विनाकारण याविषयी घबराट निर्माण करू नये, असे.. ट्रम्प नाही बोलले, पण त्यांचे जावई बोलले. जॅरेड कुश्नर. तेच ते, ज्यांनी इस्रायल-पॅलेस्टाइन शांतता करार (बि)घडवून आणला. हल्ली ते करोनाविरोधात मोहिमेचे प्रमुख समन्वयक आहेत.

गेल्या चार वर्षांत ट्रम्प यांनी ‘अमेरिकेला प्राधान्य’ देण्याच्या नादात अमेरिकेला एकाकी करून सोडले. प्रत्येक बहुराष्ट्रीय संघटनेला खिळखिळी करून टाकले. पॅरिस वातावरण करारातून बाहेर, जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर, इराण करारातून बाहेर, ‘नाटो’च्या फौजा तैनात आहेत अशा अनेक युद्धजर्जर देशांतून बाहेर. अमेरिकेला आज मोजकेच मित्र. त्यांपैकी एक ब्रिटन. पण त्यांचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन स्वतच करोनापीडित. आणखी एक मित्र सौदी अरेबिया. पण त्या देशाकडून आखातातील पुंडाई आणि गेलाबाजार एखाददुसऱ्या पत्रकाराचा (ही जमात फारच बुवा देशद्रोही) खून करण्याखेरीज काय मदत मिळणार? पडद्यामागचा मित्र रशिया. पण त्याची गरज निवडणुकीदरम्यान. आता तो काय करणार?

मग उरले मोदी. त्यांच्याकडे करोनावर रामबाण औषध उपलब्ध आहेसे कानावर आले. मोदी हे तर ट्रम्प यांचे परममित्रच. ते नव्हते का मागे बोलले, ‘अब की बार ट्रम्प सरकार’? काही तरी विचित्र नावाचे औषध त्यांच्याकडे आहे. त्याने करोना रुग्ण वाचवले जात आहेत. ‘तेवढे ते औषध आम्हालाही द्या की जरा. पाठवा नक्की हां. नाही तर..’ ‘घणो मित्रो’ ट्रम्प यांनी अशी आर्जवे केल्यावर आमची काय बिशाद की नाही म्हणणार! गेली चार वर्षे ‘न ऐकावे जनाचे, करावे केवळ मनाचे आणि स्व-हिताचे’ याच न्यायाने वागलेल्या या अमेरिकी अध्यक्षाने काळाची पावले आणि करोनाचा धोका ओळखला नाही. त्याला निवडून देणारे कित्येक जण पश्चात्ताप करण्यासाठी आणि त्याचा दुस्वास करणारे हजारो जण शिव्याशाप देण्यासाठीही जगात उरले नाहीत. परवा एका पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले होते, ‘मी डॉक्टर नाही. पण माझ्याकडे कॉमनसेन्स आहे.’ यांतील पहिला भाग खराच, कारण अमेरिकेतील विद्यापीठे अद्याप कुणालाही कोणत्याही पदवीचे प्रमाणपत्र देण्याइतपत प्रगत नाहीत. पण दुसरा भाग? तो करुण विनोदच म्हणावा लागेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 12:00 am

Web Title: article on corona and pity jokes abn 97
Next Stories
1 आरोग्य दिनानंतरच्या शुभेच्छा..  
2 आमच्याच नशेला बंदी?
3 त्यांचेही हात साफ..
Just Now!
X