News Flash

असे दिवस कोरडे..

आता त्यांनाही ड्राय डेचा अर्थ काय, हाच प्रश्न पडला होता. तो कुणाला विचारावा याचा विचार करीत ते कान खाजवू लागले..

(संग्रहित छायाचित्र)

गेले तीन दिवस आपला बाप दिवस मावळायच्या आत घरात येतोय, त्याची पावलं वाकडी पडत नाहीयेत, त्याची जीभ जड झालेली नाहीये, संध्याकाळी तो आपल्याशी गप्पा मारतोय, टीव्हीसमोर बसून सीरियल पाहतोय, हे सगळेच बंडय़ाला नवीन होते. त्याने खूप विचार केला. हा चमत्कार कसा झाला असेल हे तपासण्यासाठी बातम्याही पाहिल्या आणि त्याच्या लक्षात आले. निवडणुकीमुळे गावातली दारूची दुकाने, बार, अड्डे सगळीकडे कडकडीत बंद होता. त्याला ड्राय डे असे म्हणतात हे बंडय़ाला माहीत होते. आता मात्र, गुरुजींना आपल्या मनातल्या शंका पुन्हा विचारायच्याच असे गण्याने ठरविले. मतदानामुळे शाळेला सुट्टी असल्याने, गुरुजींच्या घरी शिकवणीच्या तासांतच शंकांचा सोक्षमोक्ष लावायचा असे ठरवून बंडय़ा संध्याकाळी शिकवणीस गेला. थोडी शिकवणी झाल्यावर बंडय़ाने तोंड उघडले. ‘गुर्जी, एक शंका आहे.. विचारू?’

बंडय़ाने शंका काढली की गुरुजी आधीच सावरून बसायचे. आता हा आपल्याला अडचणीत आणणार, हे त्यांना माहीत असूनही त्यांनी होकार दिला.. ‘‘गुर्जी, ड्राय डे म्हणजे काय हो?’’ बंडय़ाने निरागस चेहऱ्याने विचारले आणि गुरुजींचा चेहरा पडला. हाच प्रश्न मागेही एकदा बंडय़ाने विचारला तेव्हा उडालेली तिरपीट गुरुजींना आठवली. ‘‘ड्राय डे म्हणजे कोरडा दिवस,’’  कोरडय़ा चेहऱ्याने गुरुजी म्हणाले. ‘‘गुर्जी, काय कळलं नाही. नीट सांगा.’’ बंडय़ा म्हणाला आणि गुरुजी बोलू लागले.. ‘‘अरे, या दिवशी दारूची दुकाने बंद असतात..’’ बंडय़ा भांबावला. ‘‘का बरं?’’  त्याने विचारले. ‘‘अरे, या काळात आचरण शुद्ध राहावे, नैतिक व्यवहारांना चालना मिळावी आणि गैरव्यवहारांना आळा बसावा, सारे व्यवहार पूर्ण शुद्धीवर असताना केले जावेत अशी सरकारची अपेक्षा असते. शिवाय, महापुरुषांच्या स्मृतिदिनीही ड्राय डे घोषित केला जातो.’’ एका दमात बोलून गुरुजींनी बंडय़ाकडे बघितले. त्याचा चेहरा कोरडाच होता. आता तो ‘स्मृतिदिन म्हणजे काय’ वगरे विचारणार असे वाटून गुरुजींनी मानेवरचा घाम पुसला.. ‘‘पण गुर्जी, ३१ डिसेंबरला सरकार दारूचे परवाने का वाटते?’’ बंडय़ाचा दुसरा प्रश्न.. ‘‘अरे, नव्या वर्षांचे स्वागत उत्साहात व्हायला हवे म्हणून..’’ गुरुजी म्हणाले.

‘‘म्हणजे, उत्साह यावा यासाठी दारू प्यायला हरकत नाही ना?’’ बंडय़ाच्या या प्रश्नावर पुन्हा घाम पुसत गुरुजी मानेनेच हो म्हणाले. ‘‘मग गुर्जी, स्वातंत्र्य दिन, निवडणुका, प्रजासत्ताक दिन हे दु:खाचे दिवस असतात का? निवडणुकीत उत्साह वाटायला नको असतो का?’’ बंडय़ाने विचारले आणि गुरुजी वैतागून म्हणाले, ‘‘हा तुझा विषय नाही रे बंडय़ा.. तू पीत नाहीस ना, मग जाऊ दे,’’ तरी बंडय़ाचे प्रश्न सुरूच होते. ‘‘गुर्जी, आता एकच प्रश्न.. आचारसंहिता म्हणजे काय हो?’’ ‘‘अरे बाबा, मतदारांना उमेदवारांनी प्रलोभने दाखवू नयेत म्हणून आयोगाने घातलेल्या बंधनांना आचारसंहिता म्हणतात’’.. करवादल्या सुरात गुरुजी म्हणाले. ‘‘मग ड्राय डे जाहीर केल्यावरही गावागावांतून लाखो रुपयांची दारू जप्त कशी होते?.. कोरडा पडलेला घसा ओला करायला कार्यकत्रे संध्याकाळी बसतात कसे?’’

बंडय़ा एकामागून एक प्रश्न विचारू लागला आणि दारूच्या दुकानाबाहेर ड्राय डेच्या तारखांचे फलक का लावतात, याचे उत्तरही त्याला सापडले. ‘‘साठा करण्याचे नियोजन सोपे व्हावे म्हणून तर नव्हे?’’ बंडय़ा स्वत:शीच पुटपुटल्यागत बोलला.

गुरुजी चपापले.

आता त्यांनाही ड्राय डेचा अर्थ काय, हाच प्रश्न पडला होता. तो कुणाला विचारावा याचा विचार करीत ते कान खाजवू लागले..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 12:07 am

Web Title: article on dry day in election
Next Stories
1 ऐसा गा तो ज्वर..
2 हीच खरी ‘पुण्याई’!
3 डास वाढवा, नाती जडवा!
Just Now!
X