खलबते आटोपून रात्री राजे पलंगावर पहुडले. शांत झोपेत चांगली स्वप्ने पडतात आणि तीच स्वप्ने दिवसा उराशी बाळगता येतात हे राजेंना माहीत होते. काही वेळातच राजेंचा डोळा लागला आणि अपेक्षेप्रमाणे स्वप्न सुरू झाले.. राजे स्नानगृहात दाखल झाले होते. सुगंधी पाण्याने काठोकाठ भरलेल्या टबमध्ये राजेंनी स्वत:स झोकून दिले आणि त्या भांडय़ातील पाण्याचा मोठा झोत बाहेर सांडला. तसे हे काही नवे नव्हते. पण राजे ‘युरेका-युरेका’ म्हणत टबातून तसेच बाहेर पडून राजे बंगलाभर धावू लागले. स्वप्न संपले. सकाळी राजेंना जाग आली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गगनातही न मावणारा आनंद उमटला होता. काही वेळाने राजे नेहमीप्रमाणे सुस्नात होऊन दिवाणखान्यात दाखल झाले.. लगेचच सारे मनसबदारही आपापल्या आसनांवर येऊन बसले. राजेंच्या डोळ्यापुढे रात्रीचे ते स्वप्न तरळत होते.. राजेंनी बोलावयास सुरुवात केली. ‘जमलेल्या माझ्या बांधवांनो, तुम्हास माहीतच आहे, की एका ठिकाणी पोकळी निर्माण झाली, की दुसरीकडे वादळ माजते. समुद्रात भराव टाकून जमीन निर्माण केली, की तेथील पाणी दुसरीकडे कोठे तरी घुसते!’.. लांब कोठे तरी नजर स्थिर करून राजे बोलत होते आणि आजूबाजूस सगळे गोंधळात पडले. राजेंना काय म्हणायचंय ते कुणालाच समजत नव्हते. एका नजरेतच राजेंनी हे जाणले. आता अधिक ताणण्यात अर्थ नाही, हे ओळखून ते म्हणाले, ‘एका ठिकाणी निर्माण झालेला खड्डा हा दुसऱ्या ठिकाणी निर्माण होणारा भराव असतो!’.. राजेंचा सूर आता सर्वाच्याच लक्षात आला होता. सारे चेहरे खुलले.. ‘खड्डे ही क्षणांची समस्या आणि अनंतकाळच्या रोजगाराची संधी असते,’ असा विचार राजेंनी बोलून दाखविताच दालनातील सर्वानी दाद दिली. ‘खड्डे हे रोजगाराचे साधन आहे. खड्डय़ांमुळे अर्थव्यवस्थेसही चालना मिळते. जितके खड्डे अधिक, तेवढे ते बुजविण्यासाठी तिजोरीतून अधिक पैसा बाहेर निघेल आणि अनेक हातांना खड्डे बुजविण्याचे काम मिळेल. रोजगाराच्या संधी वाढतील. हाती पैसा आल्याने क्रयशक्ती वाढून व्यापारक्षेत्रातील उलाढाल वाढेल. सध्याच्या मंदीच्या वातावरणात अर्थव्यवस्थेस चालना देण्याकरिता खड्डय़ांव्यतिरिक्त अन्य उपयुक्त मार्ग मला तरी दिसत नाही.. तेव्हा, खड्डे वाढवा, खड्डे बुजविण्यासाठी अधिकाधिक निधीची तरतूद करा आणि अधिकाधिक लोकांना रोजगार मिळेल याची व्यवस्था करा!’.. राजेंनी अधिकाऱ्यांकडे पाहत आदेश दिला आणि एक अधिकारी नम्रपणे बोलू लागला, ‘गेल्या वर्षी आपण एका खड्डय़ामागे १७ हजार ६९३ रुपयांची तरतूद केली होती. तिजोरीतून जवळपास आठ कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी बाहेर काढल्याने, गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेस आठ कोटींचा हातभार लागलाही होता. आपण म्हणता, तसे, खड्डे हा अर्थव्यवस्थेचा आधार आहे, हे गेल्या वर्षीच सिद्ध झालेले असल्याने आणि या वर्षीची अर्थव्यवस्थेची मंदावलेली अवस्था पाहता, खड्डे बुजविण्यासाठी अधिक निधी देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे शक्य आहे!’ राजेंनी समाधानाने मान हलविली, आणि सर्वानी आपापले खिसे चाचपले. ‘एका ठिकाणी निर्माण होणारा खड्डा हा दुसरीकडचा भराव’, हे राजेंचे वाक्य सर्वाच्या कानात रुंजी घालत होते. ‘आता मोठय़ा खिशांचे कपडे शिवून घेतले पाहिजेत’.. एक जण उठताउठता म्हणाला आणि राजेंसकट सारे हास्यरसात बुडून गेले. बाहेर पडताना आणखी एकाने घोषणाही दिली, ‘खड्डेरायाच्या नावानं चांगभलं!’..