19 October 2019

News Flash

शिस्त कोणास लावता?

आता कोणताही कांगावा न करता, या कारवाईमागचा आपला नेमका हेतू पोलिसांनी पुणेकरांना सांगून टाकावा.

(संग्रहित छायाचित्र)

आता कोणताही कांगावा न करता, या कारवाईमागचा आपला नेमका हेतू पोलिसांनी पुणेकरांना सांगून टाकावा. कारण या कारवाईआधी पोलिसांनी जी काही कारणे दिली आहेत, ती कोणाही पुणेकरासच नव्हे, तर पुण्याची ओळख असलेल्या पुण्याबाहेरच्या- म्हणजे बावधन, पिंचवड वगैरे नव्हे, तर मुंबई, औरंगाबाद वगैरे- शहरांतील जनतेसही पटणारी नाहीत. त्यातील पुणे पोलिसांनी दिलेले पहिले कारण तर अगदीच कचकडी, तकलादू आणि त्यामुळे हास्यास्पदही आहे. म्हणे, आम्ही पुणेकरांना शिस्त कालण्यासाठी हेल्मेटसक्तीची मोहीम हाती घेतली. जे शहर अगोदरपासूनच ज्या ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे, आणि ज्या गोष्टीचा खुद्द पुणेकर जिवापाड अभिमानही बाळगतात, त्यांमध्ये शिस्त हा मुद्दा अंगभूतच असताना, पोलिसांनी पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी मोहीम उघडावी म्हणजे काय?..  ज्यांच्या रक्तातच शिस्त असते, त्यांना शिस्त लावणे म्हणजे अगोदरच स्मार्ट असलेल्या शहरास स्मार्ट सिटी बनविण्याचाच प्रकार की हो!.. तर, असा आगाऊपणा न करता, हेल्मेटसक्तीची खरी कारणे पुणे पोलिसांनी, किंवा ज्यांच्या आशीर्वादाने हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू झाली आहे त्यांनी, स्पष्टपणे सांगून टाकावीत हेच चांगले!  एक तर, पुणेकरांचा हेल्मेटला नव्हे, तर ते वापरण्यासाठी सक्ती करण्याला आणि न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यालाच विरोध आहे, हेच मुळी पोलिसांच्या लक्षात आलेले नाही. हेल्मेट वापरणे हे दुचाकीस्वाराच्या सुरक्षिततेसाठी योग्य असते, यात कोणाचेच दुमत नाही. त्यामुळे अर्थातच, पुणेकरांमध्येही याबाबत दुमत नसणार हे स्पष्ट आहे. पण आपली सुरक्षितता कशात आहे, याचे धडे पोलिसांकडून घेण्याएवढी वेळ पुणेकरांवर आलेली नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून बुद्धिमंतांचे शहर म्हणून ख्यातनाम असलेल्या या शहरातील प्रत्येकास काय करावे व काय करू नये हे सांगण्यासाठी अन्य कोणा यंत्रणांकडून धडे घेण्याची वेळ आलेली नाही, उलट या शहरानेच समाजास शहाणपणाचा मार्ग दाखविला हा इतिहास आहे. असे होण्याचे कारण, पुण्याच्या पाण्यात आणि पुण्याच्या मातीत असलेली विद्वत्तेची बीजे ज्या डोक्यात रुजलेली असतात, ती डोकी आजही तेवढय़ाच अस्मितेने आणि बुद्धिमत्तेने तेजाळलेली आहेत. अशा डोक्यांच्या सुरक्षिततेची काळजी स्वतहून अन्य कोणास अधिक असावी हे कोणा सामान्य माणसासदेखील पटेल काय? त्यामुळे, शिस्त, सुरक्षितता, आदी बाबींवर पुण्यात येऊन पुणेकरांना धडे शिकविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सोडून द्यावेत. गेल्या दोनतीन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा हाच संदेश आहे. आमच्या सुरक्षिततेचीच नव्हे, तर आमच्या जगण्या-मरण्याचीही काळजी इतरांनी घ्यावी एवढे बुद्धिमांद्य या मातीला अद्याप शिवलेले नाही. आमच्या जगण्याचे निर्णय जसे आम्ही घेणार, तसे आम्ही कसे मरावे हेदेखील आम्ही ठरविणार..  पारंपरिक पुणेरी पगडय़ांखालच्या डोक्यांत एवढा सारासार विचार करण्याची बुद्धी शाबूत आहे, हे सांगण्यासाठीच पुणेकरांनी वेगवेगळ्या पगडय़ा घालून हेल्मेटविरोधी कारवाईचा निषेध केला, एवढे समजून घ्या, आणि समंजसपणाने काय करायचे ते ठरवा. याआधीच्या अनुभवातून पोलिसांना एवढा समंजसपणा आला असेल, एवढीच पुणेकरांची अपेक्षा आहे!

First Published on January 4, 2019 1:18 am

Web Title: article on helmet compulsory in pune