माणसे तशी रेशनच्या रांगेतही मरतात. काही तर तशीच मरतात. तेव्हा त्याचे फारसे दु:ख मानायचे कारण नाही. तेव्हा हरयाणातील कर्नाल येथील एक साखरपुडय़ाच्या कार्यात एक व्यक्ती मेली म्हणून देशाने हळहळायचे कारण नाही. सीमेवर आपले जवान रोज पापी शत्रूच्या गोळ्या झेलत असताना तर एखादी व्यक्ती गोळी लागून मेली म्हणून त्याचा शोक करण्याचेही कारण नाही. परंतु सतत नकारात्मकता अंगी बाणवलेल्या प्रसारमाध्यमांना हे कोण सांगणार? एक साधी घटना ती. परमपूज्य साध्वी देवा ठाकूर या आपल्या अंगरक्षकांसह कर्नालमधील त्या मंगल सोहळ्यास गेल्या काय, तेथे आनंदाच्या भरात त्यांनी त्यांच्याकडील बंदुका चालविल्या काय आणि पाहता पाहता त्यात नवरदेवाची मामी गोळी लागून मरते काय.. दुर्घटनाच ती. तिला कोण रोखणार? अखेर मरण हे काही कोणाच्या हातात नसते. साध्वी देवा ठाकूर यांना विवाह सोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून बोलावणाऱ्यांना तर हे नक्कीच माहीत असणार की, जे दैवात लिहिलेले असते तेच घडते. नवरदेवाच्या मामीचा- सुनीता रानी यांचा मृत्यू जर साध्वीच्या गोळ्यांनीच होणार असे लिहिले असेल, तर त्यास साध्वी तरी काय करणार? परंतु माध्यमांनी ही बातमी दिली. अशा बातम्या देणे हे नकारात्मकतेचेच लक्षण. पत्रकार जर निर्भीड आणि नि:पक्षपाती असते तर त्यांनी हे वृत्त किती वेगळ्या पद्धतीने दिले असते, की मामींना सद्गती प्राप्त झाली. साध्वींच्या अंगरक्षकाच्या गोळीमुळे मामींचा आत्मा थेट परमात्म्यास जाऊन मिळाला, किंबहुना असे घडावे म्हणूनच अंतज्र्ञानी साध्वींनी गोळीबार करविला. स्वत: त्यांनीही पिस्तूल आणि बंदुकीने बार काढले. खरे तर, साध्वींनी केलेला हा चमत्कारच! परंतु माध्यमांमध्ये एवढी नकारात्मकता भरलेली आहे की, त्यांनी या घटनेबद्दल साध्वींवर टीका केली. या साध्वी द्वेषाने कशा बरबटलेल्या आहेत, त्या मोदींपासून मुस्लिमांपर्यंत कोणावरही कशा तोंडसुख घेतात, त्यांची विचारसरणी कशी फॅसिस्ट आहे याची उदाहरणे बातम्यांतून सादर केली. काहींची मजल तर थेट या साध्वींना बंदुका बाळगण्याची गरजच काय, असा तुच्छ सवाल विचारण्यापर्यंत गेली. दुसऱ्या साध्वी, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना मालेगाव बॉम्बस्फोटांच्या खटल्यात आजही जामीन मिळालाच नाही, ही बातमी तोंड वर करून सांगणारी हीच ती माध्यमे. देशातील सभ्यता, सुसंस्कृतता, विवेकबुद्धी यांचा पूर्ण विनाश झाल्याचेच हे लक्षण. हा देश आधुनिक संत आणि साध्वींचा आहे. ते मोठे धार्मिक कार्य करीत आहेत. त्यातून चार-दोन जणांना असा मोक्ष मिळाला, तर बिघडले कुठे? वास्तविक पाहता साध्वी देवा ठाकूर यांच्यासारख्यांचे धडे पाठय़पुस्तकात समाविष्ट केले पाहिजेत. ते व्हॉटस्अ‍ॅपवरून फॉरवर्ड झाले पाहिजेत. सुदैवाने अलीकडच्या काळात या साधू-संत-साध्वींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. कारण समाजास आता हे कळून चुकले आहे, की यापुढील काळात या देशाचा विचारगाडा आता यांच्याच हाती आहे. या मोक्षदात्यांस सर्वाचा प्रणाम असो.