20 November 2019

News Flash

हुकमाचे पान!

ट्रम्पतात्यावर एका ओळीचा अविश्वास ठराव टाकायचा हाय’ असं सरपंच म्हणाला आणि गावकऱ्यांनी माना हालवत होकार भरून टाकला.

(संग्रहित छायाचित्र)

उजाडायच्या आधीच सरपंचाने ‘सुलभ’मध्ये प्रवेश केला आणि स्थिरस्थावर होताच मोबाइल उघडला. अशा निवांत वेळी मोबाइलवर बातम्या वाचायची सरपंचाला सवयच होती. दोन वर्षांपूर्वी, ट्रम्प कोण हे सरपंचाला माहीतदेखील नव्हते. स्वच्छ भारत मोहीम सुरू झाली, त्यात गावाने पहिला नंबर पटकावला. मग ‘सुलभ’वाल्यांनी गावाचं नावच बदलून टाकलं. गावकऱ्यांना ट्रम्पच्या एका दांडग्या फोटोसमोर उभं करून फोटोही काढला आणि जाहीर करून टाकलं. आजपासून या गावाला ट्रम्पगाव म्हणायचं! सरपंचानं मान डोलावली, गावाचं नाव बदललं. मग लोकांना कळलं, ट्रम्प नावाचा एक माणूस आहे तिकडं अमेरिकेत.. तेव्हापासून सरपंचाला अमेरिकेतल्या बातम्या वाचायची आवड लागली. आज मोबाइलवर ट्रम्पतात्याचीच बातमी. मोदीबाबांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला सांगितलंय असं ट्रम्पतात्या म्हणाल्याची बातमी आल्यावर इकडं गदारोळ सुरू झाला होता. मग लगोलग, ट्रम्पतात्यानं उलटय़ा मनगटाला थुकी लावून ‘टैम्प्लीज’ म्हणल्याच्या बातम्या आल्या. सरपंच बसल्या जागी लई चरफडलं.. ह्य़ो ट्रम्पतात्या कोन आमच्या आपसातल्या भानगडीत पडनारा, असं त्यानं बसल्या जागी रागारागानं स्वत:लाच इच्यारलं.. आत्ताच्या आत्ता पंचायतीची तातडीची जनरल मीटिंग बोलावून ट्रम्पतात्यावर अविश्वासाचा ठराव पास करून टाकायचा असं ठरवत सरपंच बाहेर  आला आणि त्याने तलाठय़ास सांगावा धाडला. दुपारच्याला पंचायतीची मीटिंग भरली. ‘ट्रम्पतात्यावर एका ओळीचा अविश्वास ठराव टाकायचा हाय’ असं सरपंच म्हणाला आणि गावकऱ्यांनी माना हालवत होकार भरून टाकला. सरपंच कमळवाला असल्यानं, काय, कशापायी, आसं काय इच्यारायची सोय नव्हतीच. सरपंचानं ठराव वाचून दाखविला. ‘काश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य भाग असून भारताच्या पंतप्रधानांनी विनंती केल्याचा ट्रम्पतात्याचा दावा झूट असल्याने, ही सभा ट्रम्पतात्याचा निषेध करते, तसेच त्याच्यावर अविश्वास व्यक्त करते’.. सरपंचानं ठराव वाचून कागद तलाठय़ाच्या हाती दिला. लगोलग उपसरपंचानं अनुमोदनासाठी हात वर केला. मग ठरावावर चर्चा सुरू झाली. अशी चर्चा सुरू झाली, की आपण लोकसभेत आहोत असं सगळ्यांना वाटायचं. आपोआप दोन गट तयार झाले. उपसरपंचानं अनुमोदन दिल्यानं त्याच्या पाठीशी काही जण बसले, उरलेले समोर बसले. गदारोळ सुरू झाला. ट्रम्पतात्या नेमकं काय बोलला, ते कुणालाच माहीत नव्हते. सरपंचानं तलाठय़ाकडे बघितलं. अशा अडचणीच्या वेळी तलाठय़ालाच काही माहीत असतं, असा सरपंचाचा अनुभव होता. पण तलाठय़ाचाचेहरा कोरडाच होता. अखेर एक पोरगेला  सदस्य उठला. ‘तिकडं इलेक्शन हायेत काय?’.. त्यानं तलाठय़ाला विचारलं. ‘पुढच्या वर्षी  हायेत.. नोव्हेंबरात’.. मोबाइलमधे वाचत तलाठी म्हणाला. ‘मग बरोबर हाये. इलेक्शन असल्या की आसं कायतरी बोलायचं आसतंय.. आपल्याकडं बी हेच केलं व्हतं’.. सरपंच म्हणाला. ‘आसं उलटंसुलटं बोललं, की माणसं वाद घालत्यात, आणि इलेक्शन धूमधडाक्यात पार पडत्यात.. आता काश्मीरच्या नावानं अमेरिकेच्या इलेक्शन जिंकायची ट्रम्पतात्याची आयडिया असणार’.. सरपंच म्हणाला. ‘न्हाई तर ट्रम्पतात्याला ‘शांततेचं नोबेल’ मिळवायचं आसंल’.. आणखी एक  जण म्हणाला. ‘कुणाच्या हातात कुठलं हुकमाचं पान येईल काय सांगता येत न्हाई.. तात्याला काश्मीर कुठं हाये ते ठावं हाय, का?’.. तो म्हणाला, आणि ठरावावर मतदान झालं. ट्रम्पतात्याला फार गांभीर्याने घेऊ नये असं ठरलं आणि ट्रम्पगाव पंचायतीच्या सभेतील ट्रम्पतात्यावरील अविश्वासाचा ठराव फायलीत बंद झाला!

First Published on July 24, 2019 12:02 am

Web Title: article on kashmir issue is ready for trumps intervention abn 97
Just Now!
X