07 December 2019

News Flash

राजीनाम्याची तांत्रिक बाजू

सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे पाठवून दिला होता आणि तसे जाहीरही केले होते.

(संग्रहित छायाचित्र)

‘डिजिटल इंडिया’च्या स्मार्ट शहरांमध्ये राहण्यास भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षातील मंडळी कशी लायक नाहीत, याचा पुरावा मोठा  रविवारी संध्याकाळी मिळाला. निमित्त साधेसुधे नव्हते. या सर्वात जुन्या पक्षाचा सर्वात जुना रोग जो गटबाजी आणि अंतर्गत बंडाळय़ांचा, त्याचा एक मोठा फैसला खरे तर रविवारी विजेच्या वेगाने होऊन गेला असता. पण नाही. एकेकाळचे फलंदाज, त्याहीनंतरच्या काळात चित्रवाणीचा छोटा पडदा गाजवणारे आणि त्याच्याहीनंतर भाजपमधून काँग्रेसमध्ये येऊन स्थिरावलेले आणि पंजाबात वीजमंत्रीपद सांभाळणारे नवजोतसिंग सिद्धू यांचा त्या राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी १४ मे पासून सुरू झालेला वाद १४ जुलै रोजीच तडीस गेला असता. सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे पाठवून दिला होता आणि तसे जाहीरही केले होते. पण कॅप्टनसाहेब मात्र सोमवारची दुपार कलली, तरीदेखील हा राजीनामा मंजूर करीनात. ‘तुझं माझं जमेना’ ही स्थिती कॅप्टन अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात नक्कीच आहे, त्यात ‘तुझ्यावाचून करमेना’ हा नवा अंक कॅप्टनसाहेब कधीही लिहिणार नाहीत आणि सिद्धूदेखील त्यांना तसे करू देणार नाहीत, अशी खात्रीच सर्वाना असताना असे काय घडले असेल की सिद्धू यांचा राजीनामा मंजूरच न व्हावा? राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये सुरू केलेली नवी चळवळ ही पक्षांतर्गत पदे सोडण्याची आहे. मंत्रिपदे सोडण्याची नव्हे, हे सिद्धू यांना माहीत नसावे काय? बरे समजा माहीत असले, तरी आता पद सोडण्याची तयारी दाखवताहेत तर राजीनामा मंजूर करून टाकावा की नाही? पण नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तेवढेदेखील सोमवारी दुपापर्यंत केले नाही.

यामागचे जे कारण पंजाबातील काँग्रेसजनांनी- त्यातही कॅप्टनसाहेबांचे समर्थक म्हणवले जाणाऱ्यांनी दिले आहे, ते अधिकच धक्कादायक म्हणायला हवे. ‘डिजिटल इंडिया’शी काँग्रेस पक्ष किती फटकून आहे आणि हे अमरिंदर समर्थकही त्यास अपवाद कसे नाहीत, याचा भरभक्कम पुरावाच तो! काय तर म्हणे, ही काही पद सोडण्याची पद्धत नव्हे. वास्तविक कोणत्याही पद्धतीने का होईना, राजीनामा दिलाच आहे तर मंजूर करण्यात काय अडचण? सिद्धू काँग्रेसचे विधानसभा सदस्य असले तरी ते काही कर्नाटकातील नव्हेत आणि अमरिंदर सिंग हेही काही कर्नाटक विधानसभेचे सभापती नव्हेत. राजीनाम्यात काही तांत्रिक बाजू वगैरे असण्याची शक्यता कर्नाटकात फार असते, पण पंजाबातही ती असावी?

असलीच तर तांत्रिक बाजू अशी की, संगणकीय तंत्राद्वारे सिद्धू यांच्या राजीनाम्याची वाच्यता झाली. सिद्धू ट्वीटद्वारेच सांगतात की आपण आपला राजीनामा लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धाडला आहे. पण ट्विटरचे तंत्र निराळे  आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचणाऱ्या कागदांचे तंत्र निराळे. ही दोन्ही तंत्रे जेव्हा एकमेकांशी जुळतील, तेव्हाच सिद्धू मंत्रिमंडळाच्या बाहेर जातील.

First Published on July 16, 2019 12:02 am

Web Title: article on navjot singh sidhu resignation punjab minister abn 97
Just Now!
X