आता आपण टीव्हीसमोर बसून सभागृहातील भाषण ऐकणार आहोत, असे साहेबांनी सांगताच माध्यम सल्लागारास घाम फुटला. त्याने घाईघाईने मुखपत्राची जुनी कात्रणे मागविली. भवनातील कार्यकर्तेही कामाला लागले. तिकडे सभागृहात नरेंद्रभाई जोरजोरात बाकडे वाजवत असल्याचे दृश्य वारंवार दिसू लागल्याने, ‘यंदाचा अर्थसंकल्प विक्रमी आहे’, अशी प्रतिक्रिया माध्यमांना देण्याचा निर्णय साहेबांनी लगेच घेऊन टाकला होता. तरीही कुणा बूमधारीने सविस्तर प्रतिक्रिया मागितलीच, तर आणखी चार-पाच वाक्ये असावीत असे ठरवून साहेबांचे माध्यम सल्लागार कात्रणे चाळतच होते. कात्रणांची चाळण झाली, पण त्यांना साहेबांच्या तोंडी घालता येतील असे शब्द जुन्या नोंदीत सापडलेच नाहीत. त्याने हताशपणे साहेबांकडे पाहिले. साहेबांच्या नजरेत तर वेगळीच चमक उमटली होती. यंदा अर्थसंकल्पाचे स्वागत करावयाचे असल्याने चांगली प्रतिक्रिया द्यावी लागणार हे साहेबांच्या माध्यम सल्लागाराने ओळखले. ‘आमची मर्दाची औलाद आहे, जे बोलतो ते करून दाखवितो हे सिद्ध झाले आहे. हे भगवे वादळ देशाला नवी दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मर्द मावळ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सज्ज झाले पाहिजे. सभागृहात आई जगदंबा अवतरली असाच भास झाला. हा अर्थसंकल्प म्हणजे आई जगदंबेचा आशीर्वाद आहे’.. अशा ओळी त्याने कागदावर खरडल्या आणि साहेबांसमोर धरल्या. साहेबांनी तो कागद वाचला आणि मनापासून मान हलवून सल्लागारास दाद दिली. लगेचच त्याने घाईघाईने साहेबांची ही प्रतिक्रिया माध्यमांकडे व्हॉटसअ‍ॅप केली. पुढच्या क्षणाला ती टीव्हीवर दिसू लागली. पहिल्यांदाच आपल्या नावाने टीव्हीवर दिसणारी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया पाहून साहेबही सुखावले. एव्हाना प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला होता. गरिबांना अधिक गरीब करणारा व श्रीमंतांना श्रीमंत करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका करताना राष्ट्रवादी दादांच्या चेहऱ्यावरच्या आठय़ांचे जाळे अधिकच गडद झाले होते, तर शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली असून हा तर भांडवलदारधार्जिणा अर्थसंकल्प आहे, अशी टीका करताना सीतारामभाऊंचा चेहरा कडवट झाला होता. सत्ताधारी बाजूचे सारे नेते तोंडभर स्तुतिसुमने उधळत होते. अर्थसंकल्पावरदेखील एवढय़ा प्रतिक्रिया येतात, हे साहेबांनी प्रथमच पाहिले होते. त्यांना गंमत वाटू लागली. आता आपणही पुढे नियमित प्रतिक्रिया द्यायच्या असे ठरवून, ‘पुढच्या वर्षीची प्रतिक्रिया तयार ठेवा, आयत्या वेळी गडबड नको’, असेही त्यांनी माध्यम सल्लागारास बजावले. पुन्हा एकदा माध्यम सल्लागारास घाम फुटला. आजची परिस्थिती पुढच्या वर्षी कायम राहिली तर.. एक शंका उगीचच त्याच्या डोक्यात वळवळून गेली.. मग त्याने पुन्हा एकदा मुखपत्राच्या जुन्या कात्रणांचा गठ्ठा उघडला. एक पान पालटताच त्याला बातमीचे एक कात्रण दिसले. ‘गरिबांची थट्टा कराल तर तुमची सिंहासने खाक होतील’.. साहेबांचा हा इशारा त्याने लगेचच डायरीत नोंदवून ठेवला..

तिकडे राष्ट्रवादीच्या दालनातही सारे नेते भाषण पाहात होते. आता प्रतिक्रिया द्यावी लागणार हे लक्षात आल्यावर अण्णांनी पाच वर्षांपूर्वीची जुनी कात्रणे मागविली. आताचे सत्ताधारी नेते विरोधी पक्षात असताना अर्थसंकल्पावर खरमरीत टीका करायचे. त्यातलीच एखादी प्रतिक्रिया निवडण्यासाठी त्यांनी भराभरा पाने पालटली आणि त्यांना मनासारखे वाक्य सापडले. ‘जुन्या बाटलीत नवी दारू.. हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ विनोद आहे!’ आपल्या प्रतिक्रियेवर खूश होऊन अण्णांनी सध्या सत्तेवर असलेल्या त्या नेत्याचे मनातल्या मनात आभार मानले!