नव्या, सुसज्ज, संपूर्ण भारतीय बनावटीच्या आणि वर्तुळाऐवजी त्रिकोणी आकाराच्या संसद भवनाची आपण सारेच जण वाट पाहात असलो, तरी त्या प्रस्तावित इमारतीच्या जागेला अद्याप पर्यावरण प्राधिकरणाचा हिरवा कंदील मिळालेला नाही. त्याऐवजी आजही आणि ‘पिछले सत्तर साल’ जी इमारत संसद भवन म्हणून वापरली जाते, तिचे १९२१ मध्ये सुरू झालेले बांधकाम सहा वर्षांत पूर्ण होऊन १९२७ साली ‘इम्पिरियल कौन्सिल’ म्हणून तिचा वापरही सुरू झाला होता. ‘ल्यूटन्स दिल्ली’ म्हणून ओळखला जाणारा परिसर त्याहीअगोदरचा. सन १९११ मध्ये पंचम जॉर्ज यांचा दरबार भरला, तेव्हाचा. पतियाळा हाऊस, जयपूर हाऊस, बरोडा हाऊस, बहावलपूर हाऊस या इमारतीही तेव्हापासूनच्या.. सम्राटाच्या दरबारासाठी भारतीय उपखंडातले, विशेषत: मध्य भारतातले सारे संस्थानिक उपस्थित राहिले, त्यांची राहण्याची सोय म्हणून या जागा तयार झाल्या. अगदी सांगली संस्थानचा ‘सांगली प्लॉट’सुद्धा तेव्हाचाच, म्हणे. आज ११९ वर्षांनंतर सारेच बदलले, असे कुणाला वाटेल.. उदाहरणार्थ जयपूर हाऊसमध्ये कधीपासूनच राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय आहे, बरोडा हाऊस हे रेल्वे मुख्यालय तर पतियाळा हाऊस हे दिल्लीचे सत्र न्यायालय आहे, बहावलपूर हाऊस हे राष्ट्रीय नाटय़ विद्यालय किंवा एनएसडी म्हणूनच आज ओळखले जाते, वगैरे.. पण इतिहास असा नावे बदलून किंवा जागेचा वापर पालटून बदलतो का? इतिहासाचे पुनर्लेखन करणारे कितीही करोत, पण इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते हे वैश्विक सत्य नव्हे काय? एकशे एकोणीस वर्षांपूर्वी पंचम जॉर्जला आपण सम्राट आहोत आणि सारे संस्थानिक आपले मंडलिक आहेत असे वाटून तो सिंहासनाधीश्वर झाला, तेव्हा दरबाराची रचना चौकोनी होती. पुढे दरबार वगैरे नाहीसा होऊन लोकशाहीला वाव मिळून वर्तुळाकार रचना झाली, पण यापुढे ती त्रिकोणी होणार असल्याने त्याहीपुढे पुन्हा एखादा कोन वाढवून चौकोनी होणारच नाही कशावरून? असो. भविष्यात कशाची पुनरावृत्ती होते हे एक वेळ बाजूला ठेवू. पण इतिहास जिवंत राहतो, एवढे लक्षात ठेवू. इतिहास जर मर्त्य असता तर ज्योतिरादित्य शिंदे  हे ‘माधवरावांचे सुपुत्र, विजयाराजे यांचे नातू आणि वसुंधराराजेंचे भाचे’ आहेत, हे आज कुणाला आठवले असते का? उदयनराजे भोसले हे नाव घेताच प्रतापसिंहराजे, अभयसिंहराजे, शिवेंद्रराजे अशी सुमित्राराजे भोसलेंपर्यंतची नावे आठवली तरी असती का?

ही घराणेशाही आहे, असे कुणी म्हणेल. वर्षांनुवर्षे काँग्रेसच्या घराणेशाहीची सवय झाल्यामुळे लोकांना जिथेतिथे घराणेशाहीच दिसते, त्याला काही उपाय नाही. सकारात्मक दृष्टीने पाहिले तर मात्र ही घराणेशाही नसून, इतिहास जिवंत राहणार असतोच, हे मान्य करण्याचा हा एक विनम्र असा प्रयत्न आहे. आज इथे कुणी पंचम जॉर्ज नाही हे खरे, पण सम्राट आणि मंडलिक यांमधले नाते हे आपापली सत्ता वाढवून, दुसऱ्यालाही सत्तेत सहभागी करून घेण्याचे असते, हे सत्य वैश्विकच नव्हे काय?