कोणत्याही निमित्ताने असो, पश्चिम रेल्वेने प्रवाशांना दिलेले आश्वासन वाचून, विशेषत: मुंबईच्या उपनगरांतील रेल्वे प्रवाशांचा ऊर गदगदून गेला असेल यात शंका नाही. निमित्त होते पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इंदूर स्थानकांवरून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये प्रवाशांना मालीशची सुविधा पुरविण्याच्या प्रस्तावाचे! आता प्रवाशांच्या मस्तकाला आणि पदकमलांना मालीशसुख देण्याची कल्पना पश्चिम रेल्वे प्रशासनास का सुचली असावी आणि त्यावर तातडीने अंमलबजावणीच्या हालचाली का सुरू झाल्या हा अनाकलनीय विषय असल्याने त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. कदाचित, प्रवासातील असंख्य अडचणी आणि कटकटींना करवादलेल्या प्रवाशांना होणारा डोकेदुखीचा त्रास थोडासा सुसह्य़ करावा असा रेल्वे प्रशासनाचा प्रामाणिक हेतू असावा. तो प्रस्ताव प्रशासनाने सपशेल मागे घेतला असला तरी तसा विचार तरी केला याबद्दल प्रवाशांनी प्रशासनाप्रति कृतज्ञता तरी व्यक्त करावयास हवी.

प्रवाशांच्या पायाला मालीश करून देण्याचाही प्रशासनाचा विचार होता. पण याची खरी गरज मुंबईच्या उपनगरी प्रवाशांना आहे, हे प्रशासनास उमगलेले नाही हीच मुळात आश्चर्याची गोष्ट आहे. इंदूर स्थानकावरील प्रवाशांना आपली गाडी अचानक ठरलेल्या फलाटाऐवजी भलत्याच फलाटावर येणार असल्याची उद्घोषणा ऐकून बाडबिस्तरा सावरत पळापळ करण्याचा अनुभव क्वचितच येत असेल. हा अनुभव हवा असेल तर मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या काही ठरावीक स्थानकांवर गाडीसाठी थांबावे. एकाच गाडीसाठी ऐन वेळी होणारी फलाटबदलाची उद्घोषणा ऐकून जिवाच्या आकांताने पळापळ करीत जिन्यांची चढउतार करणारा मुंबईकर पाहिला, की पायाच्या मालीशसाठी पुन्हा कधी प्रशासनाने विचार केलाच तर त्यावर पहिला हक्क मुंबईकराचाच असला पाहिजे यात कोणाचेच दुमत असणार नाही. उलट ही सेवा गाडीत आणि सोबतच फलाटावरही मिळावी असेच कोणाही मुंबईकरास वा मुंबईकर प्रवाशाविषयी सहानुभूती असलेल्या कोणासही वाटेल यातही शंका नाही.

डोकेदुखी आणि पायदुखीचे मूळ मुंबईच्या रेल्वेत आणि फलाटांवर असताना इंदूरच्या गाडय़ांमधील प्रवाशांच्या मस्तक आणि पायास मालीश करणे म्हणजे, ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ असाच द्राविडी प्रकार झाला. अशा मालीशची खरी गरज मुंबईकरांना आहे हे कुणा सहृदय प्रवाशांना जाणवले असावे. त्यामुळेच त्यांनी रेल्वेच्या या प्रस्तावास आक्षेप घेतला असावा. काहीही असले तरी पश्चिम रेल्वे प्रशासनाने आपला तो प्रस्ताव आता गुंडाळला आहे. अर्थात पश्चिम रेल्वेच्या मुंबईकर उपनगरी प्रवाशांना अशा उपायाची कितीही गरज असली आणि रेल्वे प्रशासन कितीही कनवाळू असले, तरी तो अमलात आणणे रेल्वे प्रशासनास कदापि शक्य नाही, हे मुंबईकर प्रवाशासही माहीत आहे. एक तर सकाळी आणि संध्याकाळी गाडीच्या गर्दीत स्वत:स झोकून दिल्यावर चहूबाजूंनी होणाऱ्या चेंगराचेंगरीकडे सकारात्मक भावनेने पाहिल्यास, तेदेखील एक सर्वागसुंदर मालीशच ठरू शकते. आणि तसा सकारात्मभाव रोजच्या चेंगराचेंगरीमुळे मुंबईकर प्रवाशाच्या अंगी आपोआपच रुजलेला असतो. त्यामुळे मालीशची गरज नाही. उरला प्रश्न डोकेदुखीचा.. तर उपनगरी प्रवासातल्या हलाखीमुळे उद्वणाऱ्या डोकेदुखीवर जगातील कोणाही तज्ज्ञाकडे मालीशचा उपाय नाही, हे जगजाहीर आहे. तेव्हा, इंदूरच्या गाडीतील प्रवाशांना मालीश करण्याचा प्रस्ताव बासनात गेला हे बरेच झाले, आणि मुंबईच्या उपनगरी प्रवाशांसाठी असा काही प्रस्ताव नाही हेही बरेच झाले.

आता उरला प्रश्न, सुखसुविधांचा!.. तर, त्या पुरविण्यास आम्ही बांधील आहोत असे आश्वासन पश्चिम रेल्वे प्रशासनाने याच निमित्ताने दिले आहे. ऊर भरून आल्यासारखे वाटावे असे काही, ते हेच!!