भारताचे मित्र आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कीव करावी की त्यांच्या देशातील लोकांची, असा प्रश्न अशा वेळी पडतो. आपल्या देशात पाश्चात्त्य प्रभावाखाली वाहावत गेलेले, स्वत:ला शहाणे समजणारे लोक नेत्यांकडे नेहमी नकारात्मक दृष्टीने पाहतात हे तर आपल्याला माहीतच आहे.. पण ट्रम्प यांचा अख्खा देशच पाश्चात्त्य. म्हणजे तिथे बाकीचे सारे दोष आलेच. वास्तविक ट्रम्प किती उमदे आहेत.. भारतात असते तर नेते नव्हे पण योगगुरू म्हणून तरी नक्की यशस्वी झाले असते. आपल्याकडल्या यशस्वी योगगुरूंनाही ट्रम्प यांनी मागे टाकलेच असते. ते कसे काय, हा प्रश्न काही शंकासुरांना पडेल, त्यांना गप्प बसवण्यासाठी गेल्या तीन दिवसांतल्या बातम्यांची आठवण द्यायला हवी. ट्रम्प यांनी त्यांना सुचलेला इलाज शुक्रवारी सांगितला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी आपल्याकडल्या यशस्वी योगगुरूंनी त्यांचे उपाय सांगितले. ट्रम्प आणि आपले रामदेवबाबा, त्यांना वाटेल तेव्हा चित्रवाणीवर येऊ शकतात. म्हणजे दोघांना समान संधी होती. पण करोनावर नवा इलाज सुचवण्यात ट्रम्प पुढे गेले. आपल्या योगगुरूंनी ‘नाकावाटे मोहरीचे तेल आत सोडल्यास शौचावाटे विषाणू निघून जातो’ हा जो उपाय सांगितला, तोही नवाच होता हे खरे; पण पहिलेपणाचा मान ट्रम्प यांचाच! ट्रम्प यांनी एक बिगरआयुर्वेदिक, पण तरीही अत्यंत मूलभूत असा उपाय सुचवलेला होता. ‘जंतुनाशक टोचून घ्यायचे आणि बरे व्हायचे’ हा तो उपाय करोना विषाणूवर रामबाण ठरलाही असता, पण दुर्दैव असे की लगोलग आधी जंतुनाशक कंपन्या ट्रम्प यांच्या बदनामीसाठी सरसावल्या. ‘‘आमची उत्पादने शरीरात टोचून घेण्यासाठी नाहीत’’ असे शहाजोग खुलासे या कंपन्यांनी केले. समाजमाध्यमांत थोर नेत्यांचे हसे नेहमी होत असतेच, ते सोडा.. पण खुद्द अमेरिकी माध्यमांनादेखील (त्यांच्या ‘स्वदेशा’तील) या द्रष्टय़ा थोर भारतमित्र नेत्याचे भले झालेले पाहावत नाही. त्यांनीही टोचा मारणे सुरू केले. अखेर ‘मी खरे तसे बोललो नव्हतो, उपरोधाने म्हणालो होतो’ असा खुलासा ट्रम्प यांना करावा लागला. हा सारा घटनाक्रम पाहून प्रश्न पडतो की, कीव ट्रम्प यांची करावी की त्यांच्या देशाची!

‘ट्रम्प यांनी खरोखरच सूचना केली होती.. आता ते खोटे बोलत आहेत, उपरोध वगैरे काही नव्हता. सारवासारव करताहेत’ अशी भाषा ‘सीएनएन’च्या कुणा डॅनियल डेल नामक वार्ताहराने केली. त्याच्यावर राजद्रोहाची कारवाई नाही की काही नाही. मोकळा फिरतो आहे हा डॅनियल डेल. राष्ट्रीय चारित्र्याचा विसर पडलेल्या देशात देशद्रोही मोकळे फिरतात ना, तसा.

निमूटपणा हा राष्ट्रीय चारित्र्याचा एक मोठा गुण आहे, हे अमेरिकेसारख्या देशांना कधी कळणार? निमूटपणा असेल तर अवघ्या चार वा पाच वर्षांत देश केवढीतरी मोठी मजल गाठू शकतो. निमूटपणा असेल तर फक्त प्रगतीच होते, अधोगती कध्धी म्हणजे कध्धी होत नाही. निमूटपणा अंगी बाणवलेले देशवासी हे सर्वानाच प्रिय असतात. निमूटपणा असेल तर जीव वाचतात. निमूटपणा नसेल तर लोक मरतात.. हे अमेरिकेची आकडेवारी पाहूनसुद्धा कळू शकेल. निमूटपणा नसल्याने एका भारतमित्र नेत्याचा देश असा नुकसान सोसतो आहे, हे खरोखरच पाहावत नाही..!