कोण म्हनतंय शायरी म्हणता येत नाही दादांना. ते रेटून बोलायल्यावर नुसती मान डोलावावी लागतीय, नियमच तसा! (टीप : फक्त काकांना लागू नाही) महाराष्ट्राच्या अर्थकारणातलं बिनबुडाचं पिचकं गाडगं परवा तरतुदीनं पार भरून गेलं. मराठवाडा-विदर्भ हे शब्द तसे म्हणायलाच जरा जड हो. सातारा बगा बरं कसं सोपं नाव आणि गाव. तिथं नाय द्यायचं तर कुठं द्यायचं? तिथं ‘साहेब’ पावसात भिजले म्हणूनच हा दिवस दिसला. दिली तिथं चार हजार कोटींची औद्योगिक वसाहत तर बिघडलं कुठं? मराठवाडय़ाचं नाव पुढं करून विदर्भात न्यायचं सारं, असलं काय दादाचं धोरण नाय. त्यांचं सारं कसं थेट सरळसोट. सेना किती असली तरी गुबुगुबु म्हणून माना डोलावण्या पलीकडं करंल तरी काय? त्यांना बोलायलापण तोंड पायजे. इतिहासात कोणी दिलं होतं का, पर्यटनाला एवढं बजेट. भलेभले अर्थमंत्र्याकडं समस्या मांडून मागण्या करायचे. बाकी आमदारांसाठी आलं मनात तर पाच-पन्नास कोटी. पण राजपुत्राचं बजेट कमी नाही केलं दादांनी. इतिहास घडविलाय त्यांनी. इतिहासात प्रथमच हजार कोटी असा पर्यटनाचा उल्लेख ऐकला अन् मराठवाडा-विदर्भातील जनता खूश झाली. ऐतिहासिक वेरुळ, अजिंठा, बीबी का मकबरा, लोणारचं सरोवर किती तरी पर्यटनस्थळं झर्रकन नजरेसमोरनं गेली. आता पर्यटक येतील, अर्थकारणाचं चाक गरगरा फिरायला लागंल. त्यामुळेच आमच्या गावाकडंची पोरंही शायरी करू लागलीत -‘कौन कहता है की आसमां मे सुराग नही होता. एक पत्थर तबियत से उछालके देखो तो यारो.’

आकडे कमी होते म्हणे भाषणात. देवेंद्रभाऊंना ते जाहीर भाषण वाटलं म्हणे. पण इकडे मराठवाडय़ात आकडय़ांची काय कमी? वीज खांबावर आम्ही रोजच टाकतो. नाही तर आता ऑनलाइनवर ‘आकडे’ लावतो. मराठवाडय़ात तसा निवांतपणा, दादांचं बजेट साऱ्यांनी ऐकलं. मराठवाडय़ाला मिळंल काही तरी, असं उगीच अनेकांना वाटत होतं. वॉटरग्रीडवाले श्वास रोखून बसले होते. त्यांनी तरतुदीचा आकडा जाहीर केला. बारा हजारांच्या प्रयोगाला २०० कोटी. दुष्काळी मराठवाडय़ात पाऊस पडल्यासारखी ही घोषणा, अर्धीमुर्धी! अर्थसंकल्पापूर्वी मराठवाडय़ात भलती मशागत झालेली. बैठकावर बैठका घेतल्या गेल्या. पाणी परिषदा जंगी. भाजपची वेगळी, शिवसेनेची वेगळी. तज्ज्ञ भांडभांड भांडले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राने पूर्वीच चोरलेल्या पाण्याचे आकडे सांगून झाले. तरतूद करताना अनुशेष कसा डावलला जातो, याचा कंठशोषही करून झाला. पण अर्थसंकल्पानंतर सारं वातावरण मुख्य रुग्णालयात संपलेल्या औषधासारखं. म्हणजे आजार बरा होत नाही आणि औषधासाठी पैसे नाहीत. औषध घ्या बरे व्हाल, असं डॉक्टर सांगतात. असू दे आजार. चार दिवस फिरून आले की, बरं वाटेल. सिंचन, पाणी असले विचार सोडा आणि पर्यटनाला चला. हा, पण महापालिका निवडणुकीपूर्वी परत या! जिथं हिंदी बोलायची वांदेवाडी तिथं उर्दू शेर म्हटल्यावर काय होणार? पण ज्याची त्याची हौस. बजेटचं अगदी तसंच झालंय. काही मिळो ना मिळो, नुसतीच वाट बघायची. आता राज्यपालांच्या म्हणण्याप्रमाणे, अनुशेषाच्या नव्यानं अभ्यासाची वाट पाहायची!