काळ मोठा कठीण आहे. देश खडतर परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी शांततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. परस्परांतील तंटे मिटविणे हा शांतता प्रस्थापित करण्याचा महत्त्वाचा मार्ग असतो. शांतता प्रस्थापित झाली, की मनेही तणावमुक्त राहतात, आणि खिलाडू वृत्ती वाढीस लागून परस्परांतील सौहार्द वाढते. पण हे काम सोपे नाही. समस्या ताटकळत राहिल्या की तणाव तयार होतो. त्या निकाली काढण्याचा वेग वाढविणे हाच त्यावरचा उपाय! वेगवान राहण्यासाठी मेंदूची निर्णयशक्ती गतिमान असणे आवश्यक असते. गतिमान निर्णयक्षमतेमुळे पुढे येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा यशस्वी सामना करण्यासाठी त्याच क्षणी योग्य निर्णय घेता येतो. क्रिकेटसारख्या खेळात, समोर येणारा चेंडू कसा टोलवावा याचा विचार करण्यात वेळ घालवून निर्णय घेण्यात विलंब लावला, तर तो चेंडूच यष्टींचा वेध घेऊन खेळाडूस तंबूत परत पाठवितो. त्रिफळा उडविणारा तो क्षण टाळण्यासाठी गतिमान निर्णय घेतला पाहिजे, हा क्रिकेटचा संदेश! कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करणाऱ्या खेळाडूची वाहवा होते, ते त्याच्या गतिमान निर्णयक्षमतेचे कौतुक असते. जास्तीत जास्त वेगाने धावा रचणारे खेळाडू व्यावहारिक जीवनातही याच गतिमान निर्णयक्षमतेस महत्त्व देतील, तेव्हा प्रलंबित प्रश्न वेगाने सोडविले जातील, आणि खिलाडूपणा वाढीस लागून सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. मग तंटामुक्त समाजव्यवस्था तयार करण्यास हातभार लागेल. समाजातील तंटे सोडविण्यासाठी न्यायव्यवस्था नावाचा लोकशाहीचा एक मजबूत स्तंभ अस्तित्वात आहे. परस्परांतील तंटे न्याय्य रीतीने सोडविण्याची, म्हणजेच, तंटामुक्त समाजनिर्मितीच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाची जबाबदारी लोकशाहीच्या या स्तंभावर असते. देशात सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालयांपासून कनिष्ठ न्यायालयांपर्यंत सर्वत्र कोटय़वधी खटले प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. ‘न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार’ हे वचन प्रसिद्धच असले तरी, ‘विलंब असेल, पण नकार नाही..’ हीच सामान्य जनतेची श्रद्धा असते. न्यायालयांची पायरी चढल्यानंतर पुढे वर्षांनुवर्षे खेटे घालूनही अनेक खटले न्यायाची प्रतीक्षा करीत दीर्घकाळ टांगणीवर लागलेले असले तरी ही श्रद्धा तसूभरही कमी होत नाही. परस्परांतील तंटे मिटविणे हा शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग असला, तरी गतिमान रीतीने त्या तंटय़ांचा निपटारा करणे हे एक चिवट आव्हान आहे. कित्येक वर्षांपासून या आव्हानांचा उच्चार होत असला, तरी ती गती मात्र सापडतच नाही. अशा वेळी क्रिकेटच्या मैदानावरील एखाद्या कसलेल्या खेळाडूकडे पाहावे. समोर आलेला प्रत्येक चेंडू टोलविण्यासाठी गतिमानतेने निर्णय घेतला नाही, तर त्रिफळा उडवून तो चेंडू आपल्याला तंबूत परत पाठविणार हे ज्या खेळाडूस उमगलेले असते, तो खेळाडू प्रत्येक चेंडूचा गतिमानतेने सामना करतो. प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या प्रश्नांचे चेंडू समोर उसळ्या मारत असतानाही ते टोलविण्यातच उदासीनता दाखविली, तर काय होणार हे सांगण्यासाठी मैदानावरच्या पंचाने बोट वर करण्याची गरजच नाही. सगळेच चेंडू वेगाने टोलवावेत अशी प्रेक्षकांची अपेक्षा नसतेच. प्रत्येक चेंडू टोलविणे शक्य होत नसेल, तर किमान तो चेंडू यष्टीचा वेध घेणार नाही यासाठी तरी वेगवान निर्णयक्षमता असायलाच हवी. ती विद्यमान सरन्यायाधीशांकडे आहे, हे रविवारी न्यायालयीन वर्तुळातच झालेल्या एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने दिसून आले. अवघ्या १५ चेंडूंत १८ धावा काढून सर्वाधिक धावा काढणारे एकमेव खेळाडू होते,- न्या.  शरद बोबडे!