‘पोरगं वाया गेलं’, या काळजीने खंगलेल्या आईचे डोळे पुसत बंडय़ाने मायेने तिच्याकडे पाहिले आणि आईच्या डोळ्यात आसवांचा पूर दाटला.. बंडय़ाला उपदेशाचे चार शब्द सांगावेत म्हणून तिने तोंड उघडले, तोच बंडय़ाने मायेने तिच्या खांद्यावर थोपटले. बंडय़ाचा आजचा अवतार त्या जन्मदात्रीला नवानवा वाटू लागला होता. उजाडताच पायात चपला अडकवून घराबाहेर पडणारा बंडय़ा दुपारच्या वेळी पोटात काही तरी ढकलण्यापुरता घरात येतो आणि पुन्हा बाहेर पडतो ते मध्यरात्रीनंतर कधी तरी घरी येतो, यामुळे तिचे काळीज बंडय़ाच्या काळजीने पोखरून निघाले होते. आपला पोरगा रात्री उशिरापर्यंत घराबाहेर कुठे असतो, काय करतो, याची चिंता तिला छळत होती. पण बंडय़ाने तिला कधीच उत्तर दिले नव्हते. आईने कधी विचारलेच, तर खांदे उडवून बंडय़ा हळूच सटकायचा.. आजही तसेच होणार असे वाटत असताना, बंडय़ाचा हा नवा प्रेमळ अवतार पाहून आईला बरे वाटले. डोळे कसेबसे पुसत तिने बंडय़ाकडे पाहिले आणि कधी नव्हे ते बंडय़ा बोलू लागला.. ‘कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे ते भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल!’ ..प्रथमच आईसमोर बसलेल्या बंडय़ाच्या मुखातून उमटलेला हा क्रांतीचा उद्गार ऐकून आईचा ऊरही प्रथमच भरून आला आणि आईच्या नजरेस नजर मिळवत बंडय़ाने ताजे वर्तमानपत्र तिच्यासमोर उघडले. ‘आता मुंबईत रात्रीचा दिवस होणार’.. बंडय़ा आनंदाने उद्गारला. आपल्या रात्रंदिवस भटकण्याला आता सरकारी मान्यता मिळाल्याचा आनंद त्याच्या सुरातून प्रकटला होता. त्याचे डोळे जणू, भविष्यातील रात्रीच्या मुंबईचे वेध घेत होते.. आता रोजगाराच्या संधी रात्रीदेखील चालून येऊ शकतात, या विचाराने बंडय़ा भारावला होता. रात्री भटकताना अनेकदा पोलिसांनी हटकल्यामुळे, खिसा रिकामा करून कशीबशी सुटका करून घेण्याची पाळी बंडय़ावर अनेकदा आली होती. आता ताठ मानेने आपण रात्री कोठेही हिंडू शकू.. या विचाराने बंडय़ा हरखला. रात्रजीवनाचे असंख्य अदृश्य फायदे त्याच्या नजरेसमोर नाचू लागले. विजेची मागणी वाढेल, मग वीजनिर्मितीही वाढेल, म्हणून वीजटंचाईही कायमची मिटेल. ‘रात्री झोप न झाल्याने दिवस उजाडल्यानंतरही अनेक जण अंथरुणावर लोळत राहतील त्यामुळे सकाळच्या वेळी उपनगरी गाडय़ांची गर्दी कमी होईल आणि बाबांना   कामावर जाताना आरामात बसून जाता येईल..’ आईच्या डोळ्यात पाहात बंडय़ा म्हणाला आणि आईचे डोळे पुन्हा भरून आले.. बंडय़ाच्या काळजात बापाच्या काळजीचा एक कप्पा आहे, या विचाराने तिला धन्य वाटले आणि तिने बंडय़ाच्या पाठीवर प्रेमाने थोपटले.. पुढचा  विचार बंडय़ाच्या मनात आला, पण त्याने त्याचा उच्चार केला नाही. ..आणि, रात्रीदेखील      मुंबई जागी राहणार असल्याने, लोकसंख्यावाढीस आळा बसेल, मुलांच्या शाळाप्रवेशाची गर्दी     कमी होईल, मग फीचे दर कमी होतील आणि शिक्षण स्वस्त होऊन सर्वाना त्याचा फायदा मिळेल, असा विधायक विचार करून बंडय़ा ताडकन उठला आणि पायात चप्पल सरकवून तो घराबाहेर पडला. आईने पाठमोऱ्या बंडय़ाकडे पाहिले, पण आज तिला त्याची काळजी वाटत नव्हती..