प्रिय पालक,

वयात आल्यावर उगीच मागे वळून वळून बघायचे नसते, हे शिकेल तुमचा मुलगा कधी ना कधी. महान संस्कृतीच्या देशात प्रेमाची ही असली थेरं हवीत कशाला? विरक्ती, त्यागाचे प्रतीक असणारा झेंडा असावा अशी धारणा घडविणारी आम्हा शिक्षकांची फळी हे मान्यच करू शकत नाही. सारीच मुले कशी ऐकतील पालकांचे? असतात काही बंडखोर. प्रेम करतात, न विचारता. पण त्यांना समजावून सांगायला हवे. द्वेषमूलकतेचे एवढे संदेश आता झपाटय़ाने पसरण्याच्या काळात प्रेम कसले यांचे? शरीराचे आकर्षण ते. मुळात अभ्यासक्रमातून नीतिमूल्ये हरवलीयत. ती मुळापासून बदलायला हवीत. म्हणून शाळेच्या अभ्यासक्रमात आणि परिपाठात बदल व्हायला हवेत. हे तुम्हाला घरात जमत नाही म्हणून केला प्रेम नाकारण्याच्या शपथेचा प्रयोग. बिघडले कोठे? या डाव्या मंडळींना प्रेमाचा भारी पुळका येतो. तिथेच सारे चुकते. पण काळजी करू नका. आम्ही बदल करतो आहोत. अगदी अभ्यासक्रमात केलेले छोटे-छोटे बदल तुम्हाला तरी कधी कळाले का? आता होतो एखाद्या गोष्टीचा बभ्रा. तेवढय़ा वेळेपुरती माफीही मागू. पण काळजी करू नका, तुमचे वांड मूल आम्ही बदलवून दाखवू.

माकडापासून माणूस झाला असे सांगणारा उत्क्रांतीचा सिद्धांत मुळीच चुकीचा आहे, हे डार्विनला ठणकावून सांगणारे त्या काळी कोणी नव्हते. म्हणून तोच विज्ञानाचा सिद्धांत खरा मानणारी माणसे मूर्ख असतात, हे कळेल तुमच्या मुलाला कधी ना कधी. सत्यपाल सिंग यांचे शिक्षण असेच आमच्या अभ्यासक्रमातील असल्यानेच ते मोठे झाले. तुमचीही मुले होतील मोठी.

आपला सगळा अभ्यासक्रम ठरला आहे. राज्यातील सरकार बदलले म्हणून काय झाले? शेवटी पाठय़क्रम आमच्या हातात असतो. म्हणूनच प्रेम करणार नाही, अशी शपथ द्यायला लावली. त्यात आमचेच चुकले? शिक्षक म्हणून आमचेही कर्तव्य आहे, दिशा देण्याचे, आम्ही ते विसरणार नाही. वयात आल्यावर मागे वळून वळून मुलांनी मुलीकडे आणि मुलींनी मुलाकडे बघायचे नसते. आवडलीच कोणी या वयात तर सांगायचेही नसते. मुलीला तर बंधनात ठेवलेच पाहिजे. तसे केले नाही तर अराजक माजेल. केवढी महान परंपरा आहे आपल्या देशाला? पण कोणाला ‘सोयर-सुतक’ नव्हते. अणूचा शोध म्हणे जॉन डाल्टनने लावला असे आठवीच्या पुस्तकात पूर्वी लिहिले होते. पण त्याचा खरा शोध कणाद ऋषींनी लावला, हे आता अभ्यासक्रमात आम्ही लिहून ठेवले आहे. आता वाचा म्हणावे काही.

त्यामुळे अभ्यासक्रम कसा महान परंपरेला साजेसा आणि संस्कारी असायला हवा. त्यात प्रेम चाळ्यांना कशाला महत्त्व द्यायचे? प्रेम करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी घ्यायला हवी. तसे न करणे म्हणजे एका महान परंपरेला नाकारणे.

ज्या देशात विमानाचा शोध लागला, जेथे ‘संजयदृष्टी’चे आंतरजाल होते, त्या देशात प्रेमाचे व्हॅलेंटाइन धडे म्हणजे तद्दन फालतूपणा. तर असल्या फालतूपणाकडे तुमचे मूल झुकणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. आम्ही त्या महान परंपरेतील आहोत जेथे प्रेमाशिवाय पुढे जाता येते हे सिद्ध झाले आहे. तुमचे मूल चांगलेच शिक्षण घेत आहे.

आपला, शिक्षक (चांदूर बाजार किंवा कोठेही) .