ते एक शास्त्र असतं. आणि शास्त्र म्हटलं, की प्रश्न विचारायचे नसतात. शास्त्रानुसार ज्यांच्यावर जी कामे सोपविली गेलेली असतात, त्यांनी ती निमूटपणे पार पाडायची असतात. म्हणून चहापानाच्या वेळी नेहमी ज्यांनी ज्यांनी जे जे करावयाचे असते, ते ते त्यांनी केले. यात गैर काहीच नाही, आणि नवेही काहीच नाही. उलट, जनतेच्या ते एवढे अंगवळणी पडले आहे, की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्र्यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करावयाचा आणि विरोधकांनी त्यावर बहिष्कार घालावयाचा, हे अगोदरच जनतेसही ठाऊक झालेले असते. सत्तेवर कोण  आणि विरोधात कोण , हे महत्त्वाचे नसते. विरोधातून सत्तेवर बसले की चहापान आयोजित करावे आणि सत्तेवरून विरोधात गेले की त्यावर बहिष्कार घालावा हे ठरल्यासारखेच असते. यंदाही तसेच झाले, ते प्रथेनुसारच! मुळात, चहापान हा केवळ राजकीय उपचार. पण ते आयोजित केले नाही, तर विरोधक हे विरोधक आहेत, आणि त्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे, हे समजणार तरी कसे?.. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस ज्यांनी सत्ताधारी म्हणून प्रथेनुसार चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांच्या गळ्यात आता विरोधकाची भूमिका बजावणे आल्याने त्यांनी चहापानावर बहिष्कार घातला, आणि गेल्या वेळी ज्यांनी बहिष्कार घातला होता, त्यांनी सत्तेची माळ गळ्यात घातल्याने चहापान आयोजित केले.. हे असेच होत असल्यामुळे, चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे औचित्य काय, असा प्रश्न सामान्य जनतेस कधी पडत नाही, हे मात्र कौतुकास्पद आहे. पण असा प्रश्न पडला अथवा न पडला, तरी सत्ताधारी किंवा विरोधकांस त्याचे काही देणेघेणे असलेच पाहिजे असे नसल्याने, चहापान बहिष्काराचा कार्यक्रम ते प्रथेप्रमाणे पार पाडतात, याचेदेखील कौतुक केले पाहिजे. नऊ वर्षांपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येसही विरोधी पक्षांनी प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातला, तेव्हा आजच्या सत्ताधाऱ्यांनी चहापानाची प्रथा बंद करण्याची तयारी संतापाने सुरू केली होती. विरोधकांना चहापानात स्वारस्य नसेल, तर चहापान बंद करावे लागेल, असा खणखणीत इशारा तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर एक सत्तांतर होऊन गेले, पण चहापानाची आणि बहिष्काराची प्रथा मात्र सर्वानी पाळली. ही प्रथा खरोखरीच बंद झाली तर विरोधकांना बहिष्कार घालण्यासाठी निमित्त तरी कोणते मिळणार, हा चहापानामागचा मूलभूत विचार असला पाहिजे. चहापानावर विरोधक बहिष्कार घालत असतील तर चहापानाऐवजी ‘भोजनसंध्या’ सुरू करावी काय यावरही गंभीर विचार करावा अशीही एक टूम निघाली होती असे म्हणतात. पण त्यावरही विरोधकांनी बहिष्कार घातला, तर चहापानासाठी होणाऱ्या खर्चाहून जास्त पैसा वाया जाण्याचीच शक्यता. कदाचित, पूर्वसंध्येचे चहापान हे बहुधा संध्याकाळच्या वेळी असल्याने व संध्याकाळची वेळ सगळ्यांसाठीच ‘चहापानाची वेळ’ नसल्याने, चहापानाची जी सर्वमान्य वेळ असते, त्या वेळेस, म्हणजे, सकाळच्या पहिल्या चहाच्या वेळी हा कार्यक्रम आयोजित करून पाहावयास हरकत नाही. पण तसे सुचविणे म्हणजे, शास्त्र मोडणे असे होऊ शकते, त्यामुळे, जे चाललेय, तेच ठीकच आहे म्हणावे..