ते व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला.. पद्धतच ती. एखाद्या मॉलमधले, पन्नासेक आसनांचे छोटेखानी ‘स्टँडअप कॉमेडी थिएटर’ असो की पुण्यातले आलिशान सभागृह.. कोणतेही प्रेक्षक ही पद्धत पाळतात. अर्थात, हे इथले प्रेक्षक साधेसुधे नव्हते. तरीही पद्धत पाळली गेली. कारण व्यासपीठावरील व्यक्तीदेखील साधीसुधी नव्हती! समोरच्या ध्वनिक्षेपकाला किंचितसा हस्तस्पर्श करत, एखाद्या कसदार, मुरब्बी अभिनेत्याच्या थाटात या व्यक्तीने सभोवार नजर फिरवली. आधीच उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना जिंकले. कुणी म्हणेल, हीदेखील पद्धतच. विनोदवीर म्हणवणारे ही पद्धत हल्ली वापरतातच. किंवा कुणी म्हणेल, नजर फिरवली हे खरे पण ध्वनिक्षेपकाला हस्तस्पर्श केलाच नाही. पण हे वादाचे मुद्दे आहेत का? हे तपशिलाचे फरक ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनानुसारही बदलत जातात, हे १०० टक्के खरे की नाही? आणि त्याहीपेक्षा, प्रेक्षक जिंकले गेलेच हे २०० टक्के खरे. अशा जिंकले गेलेल्या प्रेक्षकांवर व्यासपीठावरील व्यक्तीचा एक दबदबा निर्माण होतो, हे तर ३०० टक्के खरे.

वरील आकडेवारीवर कुणाचा विश्वास बसेल, कुणाचा बसणार नाही. हल्ली आकडेवारीवर विश्वास ठेवण्याचे दिवस उरले नाहीत. अशा वेळी, प्रेक्षकांना जिंकणाऱ्या त्या व्यक्तीने आकडेवारीचेच आख्यान लावले. समोरचे प्रेक्षक साधेसुधे नसले म्हणून काय झाले.. अशा उच्चभ्रू प्रेक्षकांचे जग ते केवढे? विमाने, मोटारगाडय़ा एवढेच ना? मग प्रेक्षकांशी, त्यांना अगदी आपलीच वाटतील अशी उदाहरणे देऊन बोलण्याची हातोटी साक्षात् सुरू झाली! आख्यान आकडेवारीचेच. त्यातही, प्रेक्षकांना त्यांच्या इवलाल्या जगात जे दिसते त्याबद्दलचेच. पण एखादा विनोदवीर जसा तुम्हाला कधीच न सुचलेल्या खाचाखोचा तुमच्यासमोर मांडतो, तसे वक्तव्य इथे साक्षात् उलगडले. उत्तम दर्जाची विनोदनिर्मिती ओळखण्याची एक मोठी कसोटी असते. एखादे विनोदी कथन ऐकणाऱ्या, एखादे विनोदी वाक्य वाचणाऱ्या प्रत्येकाने जर, ‘हे आता आपणही दुसऱ्याला सांगायचे’ असे ठरवले, तर ती उत्कृष्ट विनोदनिर्मिती. कविता जशीच्या तशी म्हणावी लागते, पण विनोद मात्र आपापल्या शब्दांतही सांगता येतो. त्या जबरदस्त यशस्वी कार्यक्रमातीलच एक उदाहरण हे वाहननिर्मिती क्षेत्रातील मंदीशी संबंधित होते. ते साधारण असे : काय म्हणता, मोटारगाडय़ांचा खप कमी दिसतो तुम्हाला.. थांबा थांबा, जरा दिल्लीकडे पाहा. मेट्रोची गर्दी दिसत नाही तुम्हाला? अहो अडीच वर्षांपूर्वी २४ लाख लोक प्रवास करायचे.. आता ६० लाख! शिवाय ओला वगैरेने फिरणारे निराळेच. मग का नाही होणार वाहनांचा खप कमी?

लोकसंख्या वाढणार म्हणजे घरबांधणी क्षेत्र आहे, विमाने वाढणार आहेत, विमानांमधले प्रवासी वाढणार आहेत, विमानतळांची संख्या तर आपण २०१४ पासून ऐकतोच आहोत त्याप्रमाणे १०० ने वाढणार आहे.. मग का म्हणायचे मंदी आहे? औद्योगिक उत्पादन कमी, बेरोजगारीचा दर ७.७८ टक्के वगैरे आकडय़ांपेक्षा या आकडय़ांकडे पाहिले तर अत्युच्च दर्जाच्या विनोदाने जे शांत असे समाधान मिळते, तेच मिळेल की नाही?

हे समाधान साक्षात् मिळाले! विनोदाचा हा इतका दर्जा कुणा कुणाल कामरा नामक ‘स्टँडअप कॉमेडी’ व्यावसायिकाकडे असू शकतो का? अर्थातच नाही. कुणाल कामराला तर विनोदवीरही म्हणता कामा नये. एका चित्रवाणी-वीरावर या कामराने सत्ताधारी पक्षधार्जिणेपणाचा आणि म्हणून भेदरटपणाचा आरोप करताच ज्यांच्या निव्वळ एका ट्वीटनंतर एक नव्हे, दोन नव्हे, चार विमानसेवांनी कायदे वगैरेंची पर्वा न करता कुणाल कामराला प्रवासबंदी केली, तेच खरे वीर! त्यांचे नाव हरदीपसिंग पुरी.. तेच पुण्यात बोलत होते, हे काय निराळे सांगायला हवे?