एकाच जोडीदाराशी एकनिष्ठता म्हणजे ‘मोनोगॅमी’, एकाच कंपनीची मक्तेदारी म्हणजे ‘मोनोपॉली’, एकच एक सूर किंवा एकच चाकोरी म्हणजे ‘मोनोटोनी’.. तशी एकाच रुळावर चालणारी गाडी म्हणजे ‘मोनोरेल’. ती मुंबईत आधी वडाळा ते चेंबूपर्यंत  कशीबशी आली आणि ‘सातरस्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गाडगे महाराज चौकापर्यंत जाण्याचा टप्पा गाठेस्तोवर तिला चार वर्ष लागली.  या विलंबावर मुंबईकरांनी आगपाखड केली असं कुठंही दिसलं नसूनसुद्धा मध्येच या मोनोरेलनं पेट घेतला. तेव्हापासून पुन्हा महिनोन्महिने तिची सेवा बंदच पडली. गेलं वर्षभर ती दिमाखात वगैरे धावते, पण २,७०० कोटी खर्चून बांधलेल्या या मार्गाला  रोज एक लाख प्रवासी मिळाले तरी तोटा होणारच. चेंबूर ते वडाळा फेऱ्या वाढवून, ‘यापुढे दर पाच मिनिटाला गाडी’ अशी खुलासेबाजी करण्याचा मार्ग अधिकाऱ्यांनी आखून घेतला आहे इतकंच. मग या मोनोचं का एवढं कौतुक?

ते तर हवंच, कारण ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात आणि शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर असताना ही मोनोरेल हवी असं ठरवलं गेलं, तेच तिन्ही पक्ष आता राज्याची सत्ता सांभाळत असताना या मोनोला नवं रुपडं मिळतं आहे.. आता वाढदिवस, लग्न सोहळे आदींसाठी मोनो भाडय़ाने मिळेल! म्हणजे श्रमिकांच्या मुंबईत आता गगनचुंबी टॉवरसंस्कृतीच कशी वाढली हे ‘मोनो’तून पाहत-पाहत पाहुण्यांनी केक अथवा जिलब्या खाव्यात.. असा उदात्त विचार. तो जाहीर करताना, लग्नाच्या जेवणावळी कशा उठणार वा ‘बुफे’ कसा लावणार, वाढदिवस असल्यास केक कापण्याआधी मेणबत्त्या अथवा औक्षण करताना निरांजने पेटवल्यास चालेल का, याचा कोणताही खुलासा नसल्याने अंमळ गोंधळ आहे. त्यापेक्षा राजकीय पक्षांच्या कार्यकारिणी बैठकाच मोनोरेलमध्ये का घेऊ नयेत? चार डब्यांच्या या मोनोरेलमध्ये, तीन पक्षांच्या बैठका तीन निरनिराळ्या डब्यांत होत असताना चौथा डबा ‘मोनोरेल’ची दिव्य कल्पना मुंबईच्या माथी मारणाऱ्या ‘एमएमआरडीए’च्या माजी आणि आजी अधिकाऱ्यांसाठी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी कक्ष म्हणून किंवा गेलाबाजार तिन्ही पक्षांतल्या असंतुष्टांसाठीदेखील वापरता येईल. आम्ही निरनिराळे दिसलो तरी एकाच रुळावर आहोत, एकमेकांशी एकनिष्ठ आहोत, हे तिन्ही पक्षांना केवळ सांगता येईल, एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष दाखवूनही देता येईल. एकुलत्या मोनोच्या नाना कळा त्यामुळे आणखीच खुलतील.