हातातलं वर्तमानपत्र हवेत फिरवत नेने घरात घुसले तेव्हा तात्यांनी चहाचा कप संपवून  नुकतीच सुपारी कातरायला घेतली होती. झोपाळ्याच्या मंद झोक्यावर झुलत सुपारी कातरताना तात्यांची तंद्री लागलेली असतानाच तरातरा येणाऱ्या नेन्यांना पाहून तात्यांच्या कपाळाला किंचित आठी पडली. नेने अलीकडे देशद्रोही होऊ लागले आहेत, याची तात्यांना खात्रीच वाटू लागली होती. आपण देशभक्त असल्यामुळे मोदीभक्त आहोत, हे ओळखून नेने नेहमीच काही तरी निमित्त काढून खिजवायचे, हेही तात्यांना माहीत होते. आज तात्या सावरून बसले. नेने समोर उभे राहिले. त्यांचे ओठ संतापाने थरथरत होते. डोळे गरागरा फिरवत नेन्यांनी तात्यांसमोर वर्तमानपत्र नाचविले.. ‘तात्या, ही बघा दिवाळखोरीची लक्षणं.. आम्ही कर भरायचे आणि यांनी तो पैसा भिंती  बांधण्यावर उधळायचा.. तेही, गरिबी झाकण्यासाठी!.. चेष्टा चालवलीय. संतापामुळे नेनेंना शब्द सुचत नव्हते. कातरलेली सुपारी शांतपणे तोंडात टाकून तात्यांनी तोंडात पिंक जमविली, आणि वर्तमानपत्रावर नजर टाकून ते छद्मी हसले. असे केले की नेने चवताळतात हेही तात्यांना ठाऊक होते. तसे झाले. तात्यांनी बसल्या जागेवरूनच झोपाळ्याला वेग दिला, आणि लांबवर नेम धरून अंगणाबाहेर पिंक टाकत ते पुन्हा हसले. ‘अहो नेने, किती रागावताय, याचं खरं तर तुम्ही कौतुक करायला हवं.. तो ट्रम्प, पहिल्यांदाच भारतात येणार. आपले मोदी     देशाचे नव्हे, जगाचे नेते आहेत, आणि त्यांच्या कौतुकाने जग भारावून गेलंय. ट्रम्पलासुद्धा    त्यांची भुरळ पडलीय.. मोदींनी पाच वर्षांत देशाला कुठल्या कुठे नेऊन ठेवलंय हे              ट्रम्पलाही माहीत आहे. मग, मोदींच्या गावातच गरिबी दिसली, तर जगासमोर आपली नाचक्की होईल. ते चालेल तुम्हाला? देशाची         प्रतिष्ठा जपण्यासाठी मोदी अमदावादेत झोपडपट्टीभोवती भिंत घालताहेत, हे तुम्हास समजत का नाही?.. मी तर म्हणतो, तब्बल ५० वर्षांनंतर आपल्याला गरिबी हटविण्याचा उपाय असा चुटकीसरशी सापडलाय, त्याचं कौतुक करायला हवं. तुमच्या इंदिराजींनी घोषणा दिली, गरिबी हटाव.. काय झालं पुढे?.. आहेच ना अजून गरिबी?.. नेने, तुम्हाला माहीत नाही, मोदींनी देशातल्या प्रत्येकाचं जीवनमान उंचावण्याची शपथ घेतली आहे. येत्या दोन  वर्षांत प्रत्येकाला घरं देणार आहेत.. आता फक्त भिंत बांधून झालीय, दोन वर्षांत त्यावर छप्पर बांधून होईल.. आज ट्रम्प येणार म्हणून गरिबी हटवायचा पहिला टप्पा पार पडतोय. सगळे     गरीब भिंतीपलीकडे हटविले जातील, आणि    दोन वर्षांनंतर त्या भिंतींवर छप्पर बांधून        गरिबांना पक्की घरे मिळतील.. आहात कुठे नेने?.. आणि मी म्हणतो, देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी, जगासमोर नाक कापले जाऊ नये यासाठी केलेल्या उपाययोजनांवर तुम्ही असा आक्षेप कसा घेऊ शकता? देशाच्या भल्यासाठी केलेल्या कामांवर प्रश्न उभे करणाऱ्यांना    आम्ही देशद्रोही म्हणतो, माहीत आहे ना नेने?.. आता बसा.. शांतपणे विचार करा, माहिती   घ्या. पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच गरिबी भिंतीआड हटविली जातेय. त्याचे स्वागत करा.. चहा घ्या, आणि दुसरा विषय शोधा!’.. एका दमात तात्यांनी नेनेंना चांगलेच फैलावर घेतले, आणि पेपर गुंडाळून त्याची घडी काखेत धरत    नेने चहाची वाट पाहू लागले. दोघांनी चहा घेतला, तोवर तात्यांनी नवी सुपारी कातरायला घेतली होती..