राजकारणी माणसं सहसा मनातलं बोलत नाहीत आणि बोलली तरी तसं वागत नाहीत! पण महाराष्ट्र याबाबतीत सुदैवी म्हणायला हवा. कोणताही संकोच न बाळगता पोटातलं ओठावर आणणारी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत. ‘माझं सरकार पारदर्शकपणे काम करेल,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर लगेचच जाहीर केले होते. लगेच त्याचे पुरावे मिळण्यास सुरुवातही केली, हा योगायोग अचंबित करावयास लावणारा आहे.. सरकार खरोखरीच पारदर्शक राहणार याचा जणू पहिला पुरावाच ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी देऊनही टाकला. शपथविधीनंतरचे पहिले काही दिवस मानापमानाचे सोहळे साजरे झाले, पण आता सरकार कामाला लागणार याचीच जणू ग्वाही यशोमती ठाकूर यांनी दिली. मंत्रिपद ही जनसेवेची संधी असल्याने त्या संधीचे अधिकाधिक सोने करावे यासाठी चांगल्या खात्यांचा आग्रह असतो. चांगली दालने, चांगले बंगले मिळविण्याचा आग्रहदेखील जनताजनार्दनाच्या सोयीसाठीच असतो. मंत्र्यांच्या भेटीसाठी बंगल्यावर किंवा मंत्रालयात येणाऱ्या जनतेस सहजपणे दालन किंवा सापडावे हा त्यामागचा हेतू असतो. त्यामुळेच सारे मंत्री चांगले बंगले, चांगल्या दालनांसाठी आग्रही असतात. मलईदार खाते हादेखील मंत्र्यांच्या सेवाभावाचाच एक अनोखा आविष्कार असतो. ज्या खात्यात सत्ता खऱ्या अर्थाने समाजासाठी राबविता येईल व ज्या खात्यामुळे जनतेला सुखाची मलई चाखण्याचे नशीब प्राप्त होईल ते खाते मलईदार असते. यासाठीच आपल्याला मलईदार खाते मिळावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्याशिवाय, पारदर्शक कारभार हा आणखी एक नवा पैलूदेखील प्रत्येकाच्या कारकीर्दीवर मोहोर उमटवत असतो. त्यामुळेच बंगला, दालने आणि मलईदार खात्यांची इच्छापूर्ती झाल्यावर मंत्रीगण खऱ्या अर्थाने कामाला लागतात. त्याची फळे दिसावयास काही काळ जावा लागतो. यशोमती ठाकूर यांनी तेच सांगितले. मंत्रिपदातून साधायचे काय, या गुपिताची त्यांनी ज्या पारदर्शकपणे उकल करून टाकली, ते पाहता, असे पारदर्शक मंत्री आपल्याला सहकारी म्हणून लाभल्याबद्दल उद्धव सरकारला वचनपूर्तीचा दुसरा आनंद झाला असेल यात शंका नाही. आपले सरकार पारदर्शकपणे काम करेल असे मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने जाहीर करावे आणि ‘अजून खिसा गरम व्हायचा आहे,’ असे जाहीरपणे मान्य करून यशोमती ठाकूर यांनी आपलीही मन की बात जनताजनार्दनासमोर पारदर्शकपणे कबूल करून टाकावी, हा महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांनी टाकलेल्या विश्वासाचाही आविष्कार आहे. ‘आत्ताच तर शपथ घेतली, अजून खिसे गरम व्हायचे आहेत,’ असे त्यांनी वाशीममध्ये एका जाहीर सभेत सांगून टाकले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण त्यांच्या या वक्तव्यामागील उदात्त भावना कुणाच्याच मनास शिवलीदेखील नाही. शेवटी सुखाच्या साऱ्या कल्पना खिशाभोवती रेंगाळत असतात, हे सर्वासच माहीत आहे. ज्याचा खिसा गरम, तो अधिक सुखी असतो. त्यामुळे, जनतेचा खिसा गरम व्हावा हा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असावा. जनता सुखी व्हावी यासाठी एवढय़ा उघडपणे पारदर्शक वक्तव्य करणाऱ्या त्यांच्यासारख्या उदार मंत्री महाराष्ट्राला लाभाव्यात, हे महाराष्ट्राचे सुदैवच!