बदलत्या काळासोबत राजकारणाचे रंगदेखील कसे बदलतात पाहा.. महाराष्ट्र ज्यांना स्वातंत्र्यवीर या नावाने ओळखतो, त्या तात्याराव सावरकरांच्या अवमानाच्या मुद्दय़ावरून नागपुरात विधिमंडळाच्या परिसरावर सोमवारी, ‘मीपण सावरकर’ अशी अक्षरे असलेल्या ‘गांधी टोप्यां’ची ‘भगवी’ छटा दाटली. गांधी टोप्या आणि भगवा रंग, त्यावर मजल म्हणजे, गांधी टोपीवर सावरकरांचे नाव, असा एक अनपेक्षित आणि विचित्र असा त्रिवेणी संगम महाराष्ट्राच्या विधिमंडळात विरोधी बाकांवरील सदस्यांच्या डोक्यावर दिसू लागला, तेव्हा देशाच्या इतिहासास नक्की काय वाटले असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. पण प्रेम आणि युद्धाप्रमाणे, राजकारणातदेखील सारे काही माफ असते, हेच खरे.. विरोधकांनी सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसचे नेते असलेल्या राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी डोक्यावर गांधी टोप्या चढविल्या, पण आपल्या वेगळ्या रंगाची  जाणीव ठेवून गांधी टोप्यांना भगवा रंग चढविला. गांधी टोपी चढवून सावरकराभिमान व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या कंपूतील किती जणांनी सावरकर वाचले, किती जणांनी सावरकर पचविले, असे प्रश्न कुणा ‘समाज-माध्यमकर्मी’च्या मनात नक्कीच उभे राहिले असतील. पण डोक्यावर टोप्या चढल्या की टोपीखालच्या डोक्यात काय असायला हवे हे जाणण्याची गरज राजकारण्यांना नसते. टोपी हे काळाच्या प्रभावाचे प्रतीक असते. राजकारणात काळानुरूप डोक्यावरच्या टोपीचे रंग बदलतात. कालपर्यंत ज्यांनी डोक्यावर पांढऱ्या रंगाच्या गांधी टोप्या मिरविल्या, त्यांच्यातीलच अनेकांना गेल्या निवडणुकीच्या काळात अचानक अन्यायाची जाणीव वगैरे होऊ लागल्याने त्यांनी गयारामाच्या भूमिकेतून भाजपचा रस्ता पकडला. आपल्या डोक्यावर चढणाऱ्या टोपीचा रंग काळानुरूप बदलावा लागेल एवढी जाणीव राजकारण्यांमध्ये नेहमीच जागी असते. तसे नसते, तर भाजपचा उंबरठा ओलांडण्याआधी संघ-भाजपच्या नावाने लाखोली वाहणाऱ्या कोकणातल्या काँग्रेसी परिवारातील प्रत्येकास भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या कार्यक्रमात नवी टोपी डोक्यावर चढवून मांडी घालून आसनावस्थेत जमिनीवर बसण्याची वेळ आली नसती. ‘मीपण सावरकर’ अशी अक्षरे असलेली भगवी टोपी शिरावर घेऊन विधिमंडळाच्या आवारात छायाचित्र काढून घेणाऱ्या भाजपाई कंपूत नितेश राणे नावाचे आमदार कोणत्या तरी रांगेत नक्कीच असणार! राजकारणाचे रंग बदलल्यामुळे, ‘आपणही सावरकर आहोत’ असे त्यांना वाटू लागले असेल, तर तो राजकारणाच्या बदललेल्या रंगाचा परिणाम नव्हे काय?.. सावरकरांना माफीवीर म्हणून हिणविणाऱ्या राणेंना डोक्यावर भगवी टोपी चढवून सावरकरवादाचा पुरस्कार करताना पाहून इतिहासास काय वाटले असेल, ते सांगता येत नसले, तरी इतिहास मनातल्या मनात खदखदून हसला असेल, असे मानावयास जागा आहे. तसेही राजकारणाच्या सोयीसाठी स्वत:चे रंग बदलणाऱ्यांकडे पाहून समाजास जसे आजकाल काही वाटेनासे झाले आहे, तद्वतच तो इतिहासदेखील आता आपल्या डोळ्यावर कातडे ओढून बसण्यातच स्वत:स धन्य समजत असेल. सावरकराभिमान मिरविणाऱ्या भगव्या रंगाच्या गांधी टोप्या डोक्यावर मिरविताना राणेंसारख्याच इतरही अनेक आयारामांच्या मनात कोणत्या भावना दाटल्या असतील, याची कल्पना करणे हे मनोरंजक ठरेल. जमले तर, आपापल्या मनाशी तशी कल्पना प्रत्येकाने करून पाहावी..