सोहळा संपताच हातातला बूम सांभाळत ती निवेदिका गर्दीत घुसली. गर्दीला मागे ढकलत ती पुढे सरकली.. कॅमेरा सेट झाला आणि तिने बोलायला सुरुवात केली. ‘‘आपण जर पाहायला गेलं तर दिसेल की शपथविधी आत्ताच संपला आहे. आपण त्यांनाच विचारू या की त्यांचा नव्या वर्षांचा संकल्प काय आहे.. आत्ता आपल्यासोबत दादा आहेत. त्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली आहे. आपण त्यांना विचारू या.. दादा, अभिनंदन तुमचं. नव्या सरकारमध्येही तुम्ही पुन्हा आला आहात.. काय वाटतंय? काय आहे तुमचा संकल्प नव्या वर्षांतला?’’.. तिने बूम दादांसमोर धरला. दादांनी स्वत:स सावरलं. बुब्बुळं आकाशाच्या दिशेने स्थिर केली आणि ते बोलू लागले.. ‘‘महिनाभरापूर्वी मी त्या ठिकाणी ज्या पदाची शपथ घेतली त्याच पदावर जनतेच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा आलो आहे. त्या वेळी दोन दिवसांत राजीनामा दिला तेव्हाच मी ठरवलं होतं, मी पुन्हा येईन.. आज तो संकल्प पूर्ण झाला. विरोधक म्हणतात की सरकार फार काळ टिकणार नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की काहीही असले तरी त्या ठिकाणी मी पुन्हा येईन. आज त्या ठिकाणी हाच माझा नव्या वर्षांचा संकल्प आहे’’.. दादांनी निवेदिकेकडे पाहिलं. ‘‘नक्कीच दादा, धन्यवाद तुम्हाला या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल’’.. हळूच बूम बाजूला करून ती वळली. समोर मुख्यमंत्री उभे होते. ‘‘आता आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री स्वत: समोर आहेत. आपण त्यांना विचारू या की त्यांचा नव्या वर्षांचा संकल्प काय आहे.. नमस्कार, काय आहे तुमचा नव्या वर्षांचा संकल्प.. काही सांगाल?’’.. मुख्यमंत्र्यांनी हलकंसं हसू चेहऱ्यावर आणलं. ते म्हणाले, ‘‘मी दिलेलं वचन पाळणारा माणूस आहे. रात्रीच्या अंधारात नव्हे तर दिवसाच्या उजेडात मी शपथ घेतली असल्याने आता आपलं सरकार म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे. हे सरकार लोकांशी नम्रतेने वागेल. खर्च होणारा पसा जनतेचा पसा आहे, प्रत्येक पशाचं उत्तरदायित्व मलाच घ्यायचं आहे.. हाच माझा नव्या वर्षांचा संकल्प,’’ असे म्हणून मुख्यमंत्री वळले. निवेदिकाही दुसरीकडे वळली. थोरल्या साहेबांचे विश्वासू युवा नेते विद्रोही चेहऱ्याने बाजूलाच कॅमेऱ्याकडे पाहात उभे होते. ‘‘अभिनंदन तुमचंही. काय वाटतं, काय सांगाल, नव्या वर्षांत काय संकल्प आहे तुमचा?’’.. एका झटक्यात बोलून निवेदिकेने बूम समोर धरला आणि कपाळावरच्या आठय़ांचे जाळे आणखी घट्ट करीत, मिशीखालचा ओठ आवळत युवा नेते बोलू लागले, ‘‘मी गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की, एकनिष्ठेचं फळ मिळालं आहे. त्यामुळे, तुम्हारा ही रहूंगा जबतलक दम है मेरे दम मे’’.. ‘‘नक्कीच. धन्यवाद तुम्हालाही.. आणखी काय सांगाल?’’.. तिने बूम न हटवता विचारलं आणि युवा नेत्यांच्या आठय़ा वाढल्या.. ‘‘गीता पाठ करणार.. पुन्हा जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा, यदायदासि धर्मस्य.. हे नीट म्हणता आलं पाहिजे. तेव्हा ट्रोल नाय व्हायला पायजे’’.. युवा नेते म्हणाले . निवेदिकेने पुढच्या नेत्यासमोर बूम धरला.. ‘‘काय सांगाल?’’.. ती म्हणाली आणि नवा नेता नव्या वर्षांचा संकल्प शोधू लागला.. ‘‘हेच, महाराष्ट्राला विकासाच्या नव्या वाटेवर न्यायचं.. नवं वर्ष सुरू होतंय. खातेवाटप झालं की कामाला लागायचं. हाच संकल्प!’’ निवेदिकेने बूम गुंडाळला. तिकडे टीव्हीवर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुरू झाली.