अध्यक्ष महाराज, मूग म्हणजे काय हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. मोक्याच्या वेळी जे गिळल्यावर गप्प बसता येते, त्याला मूग असे म्हणतात. ही झाली मुगाची वैधानिक व्याख्या! यामुळे आता कोणत्या वेळी कोण कशा प्रकारे मुगाचा वापर करतील ते ओळखणेदेखील सोपे होणार असून सध्या जे कोणी वेगवेगळ्या कारणांसाठी वेळ येऊनही गप्प आहेत, त्यांनी मूग गिळले आहेत असे बिनदिक्कत समजावे लागेल. प्रसंगानुरूप मूग गिळणे हा आपला राष्ट्रीय बाणाच असल्यामुळे मागे कधी तरी मुगाच्या खिचडीस राष्ट्रीय खाद्यपदार्थाचा दर्जा मिळाला ते बरोबरच होते, असे वाटण्यासारखी परिस्थिती वारंवार सभोवती दिसत असते. ‘बाबरीच्या वेळी जे काही झालं, तेव्हा काही जण मूग गिळून बसले होते,’ असे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्याच आठवडय़ात विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना नमूद केले होते. त्यामुळे हे मूग प्रकरण पुन्हा एकदा ताजे झाले ते बरे झाले. कारण मूग गिळण्याचा एक हंगाम असतो. प्रत्येकास ती संधी मिळणे हा न्याय असतो. पण आपण मूग गिळून गप्प बसलो आहोत, हे कोणाच्या लक्षात येणार नाही एवढा बेमालूमपणा दाखविणे यात खरी गंमत असते. त्याला राजकीय शहाणपण म्हणतात. आता ते शहाणपण शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांना दाखवावे लागणार आहे. कारण वेळच तशी ओढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात समाजमाध्यमावर काही तरी टिप्पणी केली म्हणून मुंबईतील काही मावळ्यांचे रक्त खवळले आणि त्यांनी त्या समाजमाध्यमवीरास धडा शिकविण्यासाठी कायदा हातात घेऊन भर रस्त्यात त्याच्या कानाखाली बोटे उमटविली. एवढेच नव्हे, तर खुद्द मुख्यमंत्र्यांसंदर्भातच टिप्पणी करण्याच्या त्याच्या प्रमादाबद्दल त्यालाच नव्हे, तर असे केल्यास काय होईल याची चुणूक जगाला दाखविण्यासाठी भर रस्त्यात त्याचे मुंडणही केले. यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या संदर्भात कोणीही कोणतीही टिप्पणी करताना त्याचे परिणाम काय होतील हे प्रत्येकास वेगळे सांगण्याची गरज नाही, असा इशाराच शिवसेनेच्या मावळ्यांनी समाजास दिला आहे. या घटनेबद्दल खरे म्हणजे मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी मूग गिळून गप्प बसण्याऐवजी आपल्या सेनेच्या त्या मर्द मावळ्यांचे जाहीर आभार मानावयास हवे होते. कारण मुळातच अलीकडे आपल्याकडे पोलिसांची कामे वाढली असून आवश्यकतेपेक्षा कमी मनुष्यबळ असलेल्या या खात्यास अशा लहानसहान गोष्टींची दखल घेण्यास वेळ राहिलेला नाही. अशा परिस्थितीत, पोलिसांना साह्य़भूत होईल अशी एखादी समांतर यंत्रणा असणे गरजेचेच होते. आता सत्ता आल्यामुळे मावळ्यांनी कायदा हातात घेऊन राज्याला ‘सुतासारखे सरळ’ करण्यासाठी पुढाकार घेतला, तर ते सरकारी यंत्रणांसाठी चांगलेच की! इतिहासाच्या दाखल्यांचे बाळकडू पिऊन कडवट निष्ठावंत झालेल्या मावळ्यांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून हे काम स्वत:हून        शिरावर घेतले हे तर फारच चांगले. यापुढे    तरी समाजमाध्यमांवर मनाला येईल त्या अभिव्यक्तीला मोकळी वाट करून     देण्याचे लोकशाहीवादी धाडस कोणी करू नये हाच या घटनेचा संदेश आहे. समाजाने त्यापासून योग्य बोध घेतला तर ठीक.. अन्यथा, मुंडण करून घ्यायचे असेल तर हा मार्ग मोकळा आहेच!