06 April 2020

News Flash

‘दंडबंधना’च्या उकलतां गाठी..

रंग ‘ओरिजिनल’ आहे, की ‘डुप्लिकेट’, याची चर्चा कधी तरी सवडीने होईलच!..

(संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणितांचे पूर्वसिद्धान्त पुरते बदलून बेरजेच्या वजाबाक्या आणि वजाबाक्यांचे गुणाकार होऊ लागल्याने जिभा पोळलेले राजकीय नेते ताक फुंकून पिऊ लागल्याने, या अनाकलनीय समीकरणांना तोंड देऊन प्रस्थापित व्हायचे कसे, यावर अनेकांच्या खलबतखान्यांत रात्रंदिवस सुरू असलेल्या खलबतांना फळे फुटू लागली आहेत. नव्या संकल्पना आणि कल्पनांचा जन्म होऊ लागला असून प्रदीर्घ विचारमंथनानंतर नवे काही करावयाचे असेल तर जुन्यांची ठिगळे जोडून वर रेशमी वस्त्राने झाकावे म्हणजे ते मूळच्या नव्याहूनही अधिक तेजस्वी दिसते हे नवेच सूत्र सिद्ध होणार असे दिसू लागले आहे. तुम्हाला आठवतंय?.. काही वर्षांपूर्वी, जेव्हा, ‘आता पुढे नेमके काय करावयाचे’ असा प्रश्न काही नेत्यांना पडला होता, तेव्हाच्या काहीशा उद्विग्न अवस्थेमुळे काही नेत्यांची झोपही उडाली होती, आणि, ‘मला ओरिजिनल व्हायला भाग पाडू नका’ असा सज्जड दम त्या नेत्यांनी आपल्या अनुयायांना- पक्षी : कार्यकर्त्यांना- ‘मनापासून’ भरला होता.. पण आपल्या नेत्याने ‘नकली’ राहायचे, ‘डुप्लिकेट’ म्हणून वावरायचे, की ‘ओरिजिनल’ व्हायचे हे ठरविण्याचे काम अखेर कार्यकर्त्यांनीच मनावर घेतले. ‘ओरिजिनल’ होण्याचीही एक प्रक्रिया असते. टप्प्याटप्प्याने पार पाडल्यास ती पचविणे सोपे जाते. त्याच्या राजकारणाचे टप्पे आखताना त्या काळाचे भान ठेवावे लागते, एवढेच! सध्याच्या वातावरणात बेरीज करावयास घेतल्यास वजाबाकीचे उत्तर पदरी पडण्याची भीती किंवा भलतीकडे कुठे त्याचा गुणाकार होण्याची शक्यता असल्याने, इकडच्या-तिकडच्याची काहीशी ‘गोळा-बेरीज’ करावी, म्हणजे गणितात कधीच नसलेला हा प्रकार सोडविणे कोणासच शक्य होणार नाही व त्याचीच ‘अनाकलनीय’ अशी मोट बांधून एक आगळे रसायन ‘नव्याने निर्माण’ करावे, हेच ‘शहा’णपणाचे असल्याचा निर्णय घेणे व ते रसायन ‘ओरिजिनल’ आहे हे भासविणे किती कष्टप्रद असते, याची कल्पना राजकारणाच्या पलीकडून त्याकडे पाहणाऱ्यास येणे अंमळ अवघडच.. म्हणूनच, नवनिर्माणाच्या अशा प्रयत्नांचे कौतुक करावे, त्यास ‘ओरिजिनल’ म्हणावे, की ‘डुप्लिकेट’ म्हणावे याचा संभ्रम काही पुढेही काळ महाराष्ट्रात माजलेला राहणार अशीच शक्यता अधिक!.. शिवरायांचा प्रताप आठवावा म्हणून एक इतिहास-वाक्य उचलावे, त्यामध्ये भगव्या वादळाची आठवण जिवंत ठेवणारा रंग मिसळावा, मनगटावरील बंधनास टक्कर देण्यासाठी ‘दंडबंधना’चा फंडा अंगीकारावा आणि सध्या वेगवान असलेल्या राष्ट्रभावनेच्या वाऱ्यांवर स्वार होता यावे यासाठी राष्ट्रप्रेमाची तुतारी फुंकून परदेशीयांच्या हकालपट्टीसाठी दंडबंधन थोपटून आव्हानाचा आव आणावा.. हे सारे जमून गेले की त्यास नवनिर्माण म्हणता येईल आणि सर्वपक्षीय धोरणांच्या या संमिश्र मिसळणीला ‘ओरिजिनल’ म्हणून जनतेने मान्यता दिली की पुन्हा एकदा राजकारणाच्या रणांगणात उतरता येईल, असा एक नवाच राजकीय प्रयोग सत्तामंचावर सादर होणार आहे. या प्रयोगाच्या पहिल्या खेळाकडे उभ्या महाराष्ट्राची मतदार जनता काहीशा उत्सुकतेने पाहात आहे, तर बेरजेची गणिते चुकल्याने हताशा पदरी आलेले पक्ष नव्या गणिताचे नेमके उत्तर काय असेल व त्याची वेगळी बेरीज घडविता येईल का याची प्रतीक्षा करू लागले आहेत. शिवबंधनाचे काय झाले ते अजून कळलेले नसल्याने या नव्या दंडबंधनाने काय साधणार, हे अद्याप नक्की झालेले नाही. पण राजकारणाला रंग मात्र आला आहे. तो रंग ‘ओरिजिनल’ आहे, की ‘डुप्लिकेट’, याची चर्चा कधी तरी सवडीने होईलच!..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 12:03 am

Web Title: article ulta chasma vidhan sabha election political circle political leader akp 94
Next Stories
1 ‘लोकनेत्यां’ची सुरक्षा..
2 आनंदी आनंद गडे..
3 अनंतवाणी..
Just Now!
X